Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
उद्यापासूनच्या
दोन आठवडे टाळेबंदीच्या अंमलबजावणीचे राज्य सरकारचे आदेश जारी; मुंबई, पुणे, पिंपरी
चिंचवड आणि मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातले निर्बंध कायम,
राज्याच्या इतर भागात व्यवहार सुरळीत होणार
**
खाजगी रुग्णालयांना आता मनमानी पद्धतीने शुल्क आकारता येणार नाही, राज्य
सरकारने जारी केले दरपत्रक
**
राज्यात काल
आणखी ७९० कोरोना विषाणू बाधित रुग्ण; ३६ जणांचा मृत्यू
**
औरंगाबाद शहरात आणखी एका महिलेचा मृत्यू,
दिवसभरात ४१ नवे रुग्ण आढळले, नांदेड शहरातही
२० जण बाधित सापडले
आणि
**
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन
खात्यांमधे प्रत्येकी ५०० रुपयांचा दुसरा हप्त्याला केंद्र
सरकारची मंजूरी
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा दुसरा टप्पा आज संपत आहे. उद्यापासून
दोन आठवडे टाळेबंदीत वाढ करण्यात आली आहे. या
काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात केंद्र सरकारनं
जारी केलेल्या आदेशानंतर काल राज्य शासनानं राज्यात करावयाच्या अंमलबजावणीचे आदेश जारी केले. मुंबई महानगर पालिका क्षेत्र, मालेगाव
महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, आणि
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळता राज्याच्या इतर भागातले
निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, मात्र
या भागात कोविड १९
प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. मुंबई, मालेगाव, पुणे, आणि
पिंपरी चिंचवड वगळता इतर क्षेत्रातले उद्योग सुरु होतील. यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्रे, निर्यातभिमुख
युनिट, औद्योगिक वसाहती आणि औद्योगिक वसाहतीमधील औषधे, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय
उपकरणं, त्यांचा कच्चा माल आणि मध्यस्थी यासह आवश्यक वस्तूंच्या
उत्पादनांचे युनिट्स; उत्पादन युनिट, सातत्याने
प्रक्रिया आवश्यक असणारे युनिट आणि त्यांची पुरवठा साखळी, माहिती
तंत्रज्ञान क्षेत्राला लागणारे हार्डवेअरचे उत्पादन आणि पॅकेजिंग मटेरियलच्या
मॅन्युफॅक्चरिंग युनिटस परवानगी आहे. मात्र, त्यासाठी
सामाजिक अंतर आणि योग्य शिफ्टची काळजी घेणं आवश्यक आहे. ग्रामीण भागातल्या सर्व
औद्योगिक उपक्रमांना परवानगी राहील. शहरात जेथे प्रत्यक्ष जागेवर कामगार उपलब्ध
असतील आणि बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही, त्याठिकाणची
बांधकामं आणि ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. शहरी भागातली
एकाकी दुकानं, संकुलाजवळील तसंच निवासी संकुलातली दुकानं खुली ठेवण्यास
परवानगी देण्यात आली आहे. आवश्यक आणि
अनावश्यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत पाच पेक्षा जास्त दुकाने खुली असू
नयेत. मुंबई, पुणे, मालेगाव
आणि पिंपरी चिंचवड वगळता इतर भागातली खासगी कार्यालयं ३३ टक्के मनुष्यबळाचा वापर
करून सुरू करू शकतील. इतर कर्मचारी हे आवश्यकतेनुसार घरून काम करू शकतील.
मान्सूनपूर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे.
****
खाजगी रुग्णालयांना आता कोरोना विषाणू बाधित आणि अन्य रुग्णांकडून मनमानी शुल्क वसूल करता येणार नाही. राज्य
सरकारने या रुग्णालयांना दरपत्रक ठरवून दिले असून, या
पत्रकानुसार रुग्णालयांना पैसै आकारता येणार आहे. खाजगी
रुग्णालयं कोरोनाग्रस्त रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे
आल्या होत्या. विमा पॉलिसी नसलेल्या रुग्णाकडून अतिरीक्त शुल्क आकारले जात
असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आरोग्य
विभागाचे हे दरपत्रक कोरोना आणि बिगर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागू होणार आहे. उपचारादरम्यान, पीपीई
कीटस, एन
95 मास्कचा भुर्दंडही रुग्णांवर लादता
येणार नाही, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टाळेबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक केली जाणार आहे. राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईत तीन ते चार ठिकाणी काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची चित्रफित
काल समोर आली. त्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली.
कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढ्यामधे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलिस आघाडीवर
असून त्यांच्यावरील हल्ले कोणत्याही परिस्थितीमधे सहन केलं जाणार नाहीत, असंही देसाई यांनी नमूद केलं आहे.
****
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २६ पूर्णांक ६५ शतांश टक्के झालं
आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल ही माहिती दिली. आतापर्यंत देशभरात सुमारे दहा
हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्र सरकार राज्याच्या साथीनं या आजाराला आळा
घालण्यासाठी अनेक पावलं उचलत असून त्याचा नियमित आढावा उच्च स्तरावरुन घेतला जात
असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी ७९० कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा १२ हजार २९६ झाली आहे. दिवसभरात ३६ रूग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय १२१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं
असून आतापर्यंत राज्यभरात २००० रुग्ण बरे झाले आहेत. एकूण नऊ हजार ७७५ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
****
औरंगाबाद इथं काल एका कोरोनाबाधित रुग्णाचं
निधन झालं. नूर कॉलनीतली ही महिला ६५ वर्षांची होती.
न्यूमोनिआ, मधुमेह, उच्च रक्तदाबानं त्रस्त असलेल्या या
महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्या लाळेचा नमुना घेतला, त्याच्या
चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे आता शहरात कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या
नऊ झाली आहे.
दरम्यान, काल दिवसभरात औरंगाबाद इथं कोरोना विषाणूचे
नवे २८ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरातली या रुग्णांची संख्या २४४
झाली आहे. शहरातील टाऊन हॉल भागात दोन, किले अर्क - संजय नगर आणि गौतमबुद्धनगर भागातील प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे.
****
औरंगाबाद तालुक्यातल हिरापूर इथल्या राज्य राखीव पोलिस दलाचा जवान कोरोना विषाणू बाधित आढळल्यानं संपूर्ण गाव प्रतिबंधित करण्यात आलं आहे. हा
जवान जालना इथं नेमणुकीला असून तो मालेगाव इथं बंदोबस्तासाठी तैनात होता. त्यानं
सुट्टी घेऊन हिरापूर इथं आपल्या घरी सहा दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे
या जवानाचे आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलासह सर्व कुटुंबियांना चिकलठाणा इथल्या जिल्हा
सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.
****
नांदेड शहरात २० नवे रुग्ण आढळले असून शहरातल्या बाधितांची संख्या २६ झाली आहे. दोन रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तीस एप्रिल आणि
एक मे रोजी नांदेड शहरातील लंगर साहेब गुरुद्वारा परिसरातून ९७ जणांचे नमुने तपासणीसाठी
पाठवण्यात आले होते, त्या चाचणीच्या अहवालात हे लोक बाधित झाल्याचं
स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.
नांदेड शहरातील गुरुद्वारा लंगर साहेब परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून
जाहीर करण्यात आला आहे. या परिसरात निर्जंतुकीकरण
मोहिम कालपासून सुरू झाली. या भागात जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, पोलीस
अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी भेट देऊन कडकडीत
बंद पाळला जात असल्याची
खात्री केली.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
वाढत असला तरी, नांदेडमधले हे रुग्ण बाहेरुन आलेले असल्याचं पालकमंत्री अशोक चव्हाण
यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात शहरात अजून याचा प्रसार झाला नसून, नागरिकांनी घाबरुन
न जाता दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या २६ झाल्यामुळे
नांदेडमध्ये खळबळ माजली आहे. ही परिस्थिती
लक्षात घेता माझं सर्वांना आवाहन आहे की, अधिक खबरदारीने सरकारचे निर्देश social
distancing आवश्यकता आहे भयभीत होऊ नये, फक्त दक्षता घ्यावी आपल्याला त्रास होत असेल
तर तातडीने तपासणी करून घ्यावी ऐवढीच विनंती या निमित्ताने मी करतो.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चिखली इथला रहिवासी आणि सोलापूर इथं कार्यरत असलेल्या
एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तो गेल्या २४ तारखेला आपल्या गावी सुटीसाठी आला होता, त्यानंतर पुन्हा सोलापूरला कामावर रुजू झाल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये
त्याला याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पोलिस कर्मचाऱ्याच्या
संपर्कात आलेल्या नातेवाईंकांना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आलं असून
ते राहत असलेलं चिखली गाव प्रतिबंधित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दलातल्या पाच जवानांसह सहा जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं त्यांच्या तपासणी अहवालावरून
स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या
५३ वर पोहोचली आहे. एसआरपीएफच्या पाच जवानांव्यतिरिक्त सेनगाव तालुक्यातल्या
जांभरुण रोडगे इथल्या कोरोना विषाणूग्रस्त बालकाच्या संपर्कातला एक जणही
बाधित निघाला आहे. ४८ वर्षे वयाची
ही व्यक्ती आहे. आता हिंगोलीतल्या एकूण ४७ एसआरपीएफ जवानांना
कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ४ जवानांना रक्तदाब, मधुमेह आदींचा त्रास असल्यानं खबरदारी
म्हणून औरंगाबाद इथं हलवण्यात आलं आहे. जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी ही माहिती दिली.
****
सातारा जिल्ह्यात नवे पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती कारागृहातल्या दोन कैद्यांचा
समावेश आहे. हे कैदी पुण्याच्या कारागृहातून आले होते.
तसंच कराड मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला एक, कोरेगाव आणि
फलटण मध्ये प्रत्येकी एकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची
संख्या ३३३ झाली आहे. काल जिल्ह्यातल्या मागेलाव इथं १२, तर
नाशिक शहरासह इतर भागात १२ रुग्ण आढळले.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातल्या
मोहोज देवढे इथल्या ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं
आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेली होती. जिल्ह्यातली
कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे.
दरम्यान आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार
काल औरंगाबाद शहरात आणखी १३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले आहेत त्यांचा रात्री
उशिरा अहवाल प्राप्त झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितलं त्यामुळे काल औरंगाबाद शहरात
सापडलेल्या रुग्णांची संख्या ४१ झाली आहेत तर शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या २५७
झाली आहे
****
पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या एका आरोपीला
कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या हत्याकांड
प्रकरणी ११५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लागण झालेला आरोपी
वाड्याच्या पोलिस ठाण्यातील कोठडीत होता. त्याच्या सहवासात आलेले
इतर वीस सहआरोपी आणि तेवीस पोलिस कर्मचाऱ्यांचं अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनानं
दिल्या आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन खात्यांमधे प्रत्येकी ५००
रुपयांचा दुसरा हप्ता भरण्यासाठी केंद्र सरकारनं निधी मंजूर केला आहे. हा निधी आता
बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करतील. पैसे काढण्यासाठी बँकांमधे गर्दी होऊ नये
या दृष्टीनं निधी वाटपाच्या तारखाही ठरवून दिल्या आहेत. खातेक्रमांकाचा शेवटचा
आकडा शून्य किंवा एक असेल अशा खातेधारकांनी चार मे रोजी पैसे काढावे, दोन
किंवा तीन या आकड्यांनी संपणाऱ्या
खात्यातून पाच मे रोजी, तर चार किंवा पाच या आकड्यांनी संपणाऱ्या खात्यातून
सहा मे रोजी पैसे काढावेत, असं सरकारनं सुचवलं आहे. त्याचप्रमाणे आपला
खातेक्रमांक सहा किंवा सात क्रमांकाने संपत असेल तर आठ मे रोजी बँकेत जावं, आणि
आठ किंवा नऊ आकडा खातेक्रमांकात शेवटचा असेल तर ११ मे रोजी पैसे काढावेत, असं
सरकारनं सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना अशी योजना सरकारनं सुरु केली असल्याच्या
वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी ५०
हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची सरकारची योजना असल्याचं निराधार वृत्त
समाजमाध्यमांवर पसरलं होतं, त्यासंदर्भात पत्र सूचना कार्यालयानं हा
खुलासा केला आहे. अशा प्रकारची योजना असल्याचं सांगून वैयक्तिक माहिती आणि
शुल्काच्या नावे पैसा उकळणाऱ्या संस्थांपासून सावध रहावं, अफवांवर
विश्वास ठेवू नये असं सरकारी ट्वीटमधे म्हटलं आहे.
****
मुंबईला असलेलं देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं
आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांना प्रमाणित करणाऱ्या प्राधीकरणाची स्थापना गांधीनगरला
करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी
केली आहे. केंद्र सरकारनं या संदर्भातली अधिसूचना नुकतीच
जारी केली आहे. केंद्र सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी
मागणीही थोरात यांनी एका संदेशाद्वारे व्यक्त केली आहे. मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असताना राज्यातलं भाजप नेतृत्त्व या मुद्यावर मौन का,
असा प्रश्र्नही महसूलमंत्री थोरात यांनी उपस्थित केला आहे.
****
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी
लातूर जिल्ह्यातल्या खाजगी डॉक्टरांसाठी तीनशे स्व रक्षक साहित्य- पीपीई किट आणि सॅनिटायझरचं वाटप केलं. याबद्दल
इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष
डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी ऋण व्यक्त करत आणखी दोन ते तीन हजार
पीपीई किटची गरज असल्याचं सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात व्यापाऱ्यांनी
मास्क न लावणं तसंच दुकानासमोर भावपलक न लावल्याप्रकरणी नगरपालिका प्रशासनानं २४ दुकानदारांवर
कारवाई केली. प्रत्येक दुकानदाराकडून एक हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात
आला.
****
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे टाळेबंदी अधिक कडकपणे
अंमलात आणण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पोलिस उपआयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे यांनी याची अधिक
माहिती दिली.
मानमीय चिंरजीव प्रसाद साहेब यांनी सम आणि विषम तारखा विषम तयार केलेले
आहेत विषम तारखेला केला म्हणजे ३ ५ ७ ९ ११ १३ १५ आणि १७ तारखेला आणि total शहर लॉकडाउन होईल सम तारखेला सुद्धा होईल लॉकडाउन
पण सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवा करण्यासाठी सुट
देण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त रस्त्यावर आलं आणि नियमाचे उल्लंघन कोणी केलं तर त्याच्यावर
कायदेशीर कारवाई केली जाणार आहे वाहन जब्त केले जाणार आहे गुन्हा दाखल केला जाणार आहे
औरंगाबाद जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी अथवा अन्य ठिकाणांहून औरंगाबाद जिल्ह्यात
येण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची
माहिती उपायुक्त डॉ. कोडे यांनी दिली.
****
माध्यान्ह भोजन शिजवणाऱ्या कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून रोजगार मिळाला
नसल्यानं, राज्य आणि केंद्र सरकारनं त्यांना मदत जाहीर
करावी अशी मागणी नांदेड इथल्या शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीनं करण्यात आली
आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी शालेय पोषण कामगार शासनाचं काम
तत्परतेने करत आहेत, आर्थिक अडचणीत आलेल्या शालेय पोषण आहार कामगारांना
आर्थिक मदत करावी अशी मागणीही या संघटनेनं केली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीनं
शहर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या भटक्या विमुक्त जातींच्या आणि गोरगरीब लोकांना आठ
दिवस पुरेल एवढं धान्य वाटप करण्यात आलं. बिहारच्या अडकलेल्या
कामगारांना या संस्थेतर्फे मदत देण्यात आली.
****
नांदेड इथल्या पोखरणीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
खरीप हंगाम पेरणी विषयी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आलं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. देविकांत देशमुख डोंगरगांवकर यांनी मार्गदर्शन केले. ३० गावातल्या ४७ शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथे मुदतबाह्य
परवान्यावर वाहतुक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. सातोना
इथं रेल्वेचं काम चालू असल्यानं, त्यांना वाहतुक परवाना देण्यात आला होता, मात्र
या परवान्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपली असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे
हे लोक मुदतबाह्य परवान्यावर प्रवास करत असल्याचं आढळून आलं, या
प्रकरणी तलाठी मुकुंद आष्टीकर यांनी पंचनामा केल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव
लक्षात घेता सहा मे पर्यंत हळद उत्पादक शेतकऱ्यांनी नांदेडच्या नवा मोंढा बाजार पेठेत
हळद विक्रीसाठी आणू नये असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलं आहे. नांदेड
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सभापती संभाजी पाटील पुयड यांच्या उपस्थितीत
काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सहा
मे नंतर शेतकऱ्यांनी आडत्यांशी संपर्क केल्याशिवाय आपली हळद विक्रीसाठी नांदेड
शहरात आणू नये असंही यावेळी सांगण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या
रेणा साखर कारखान्याच्या वतीनं कारखान्याचे संस्थापक दिलीप देशमुख यांच्या सुचनेनुसार
कारखान्याच्या सभासद बिगर सभासदांसाठी ऊस विकास योजना सुरू करण्यात आली आहे. ऊस
उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन कारखान्याचे संचालक आमदार धीरज देशमुख
यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत कारखाना कार्यक्षेत्रात ऊस बेणे, रोपं
वाटप करण्यात येणार आहे.
****
नाशिकमधे अडकलेल्या ८४७ उत्तर भारतीयांना घेऊन काल सकाळी एक रेल्वे उत्तरप्रदेशाकडे
रवाना झाली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. परवा रात्री
एक रेल्वे नाशिकहून भोपाळला सोडण्यात आली होती.
दरम्यान, येत्या १७ तारखेपर्यंत या विशेष गाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याचं
भारतीय रेल्वेनं स्पष्ट केलं
आहे.
****
राजस्थानमधल्या कोटा
इथं शिक्षणासाठी गेलेले लातूर जिल्ह्यातले ४३ विद्यार्थी काल पहाटे लातूरला पोहचले. या विद्यार्थांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना १४ दिवस घरातच
विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या
हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली आहे. परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी
एका विद्यार्थ्याच्या आईने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
रेणुका राजेश रामपूरकर लातूर येथे राहते दोन महिन्यापासून
आम्ही लॉकडाउनमध्ये अडकलेलो होतो आणि दुसरी सोय होती पण महाराष्ट्र राज्य सरकारने आमची
मदत केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी गाड्यांची सोय केली आणि आम्हाला त्यांच्यामुळे
आम्ही आमच्या घरी आहोत आणि खूप मला उपकार वाटतात महाराष्ट्र राज्य सरकारचे
उस्मानाबाद इथेही १६ विद्यार्थी काल कोट्याहून
परतले. या सर्वांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून, हातावर
होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. या सर्वांना १४ दिवस घरी विलगीकरणात
राहावं लागणार आहे.
कोटाहून काल सत्तरहून अधिक विद्यार्थी
पुण्यात तर रत्नागिरीचे १८ विद्यार्थीही काल आपल्या घरी परतले आहेत. या सर्वांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू अडकून पडलेल्या
मध्य प्रदेशातल्या सात कामगारांना काल त्यांच्या गावी रवाना करण्यात आलं. हे
सर्वजण पायी जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून विलगीकरणात ठेवलं होतं.
****
हिंगोली वाहतूक शाखेनं वयोवृद्ध, अपंग, गर्भवतींना
रुग्णालयात जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था केली आहे. या
सेवेचं उद्घाटन काल पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते झालं. या
रुग्णांच्या प्रवासाचा खर्च वाहतूक शाखा उचलत आहे. गरजू
व्यक्तींनी वाहतूक शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहन सहायक पोलिस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर
यांनी केलं आहे.
****
टाळेबंदीमुळे चंद्रपूर इथं अडकलेले
१५०० मजूर काल रस्त्यावर उतरले. बांधकामासाठी उत्तर प्रदेश-बिहार-बंगाल इथून आलेल्या या मजुरांना आपापल्या प्रांतात
परत जायचं आहे, त्यासाठी प्रशासनावर रोष व्यक्त करत त्यांनी काल
महामार्ग अडवून धरला. परवा तेलंगणातून झारखंडसाठी विशेष रेल्वेगाडी
सोडली तशीच आपली व्यवस्था करावी अशी मागणी या मजुरांनी यावेळी केली.
****
लातूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी घरी जाण्यासाठी
गर्दी न करता अर्ज करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
यांनी केलं आहे. जिल्ह्यांतर्गत एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात
जाण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावेत अशी सूचना त्यांनी केली आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी सर्व आरोग्य चाचण्या केल्यावरच जिल्हाधिकाऱ्यांच्या
परवानगीनं जाता येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं
काल जुना मोंढा परिसरात व्यापारी, कर्मचारी आणि हमाल बांधवांसाठी
आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
****
नांदेड इथं टाळेबंदी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रविण साले यांच्या
प्रयत्नांतून सामुदायिक स्वयंपाकघर उपक्रम सुरू झाला आहे. या अंतर्गत शहरातील पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना
नाश्ता दिला जात आहे. गेल्या चोवीस तारखेपासून हा उपक्रम राबवला
जात आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानदारांना आमदार राणाजगजितसिंह पाटील
यांच्यातर्फे सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आलं. या दुकानदारांचा
अनेक ग्राहकांशी थेट संपर्क येतो त्यामुळे खबरदारीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशीला
देशमुख यांच्याकडे हे साहित्य सोपवण्यात आलं. उस्मानाबाद शहरातील
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांजा मार्ग परिसरात गरजू कुटुंबांना
अन्न धान्याची पाकिटं वितरित करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथं काल
गंगापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघात हरबरा खरेदी केंद्राचं उद्घाटन आमदार प्रशांत
बंब यांच्या हस्ते झालं. या केंद्रात आतापर्यंत ३५५ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली
असून, हरबर्याला प्रती क्विंटल चार हजार ८७५ रुपये दर निश्चित केला
आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन
गंगापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघानं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर
गुट्टे यांनी गोदाकाठावरच्या शेतकर्ऱ्यांची वीज जोडणी म तोडण्याचं आवाहन ग्रामस्थांना
केलं आहे. डिग्रस बंधार्यातून नांदेडच्या विष्णुपुरी बंधार्यात २५ दशलक्ष
घनमीटर पाणी सोडल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डिग्रस
बंधार्यातलं उर्वरित पाणी पालम, पूर्णा, गंगाखेड तालुक्यातल्या शेतकर्यांच्या
बागायती पिकासाठी राखीव ठेवण्यात आलं असून, कायद्याचं
पालन करुन हे पाणी सोडल्याचं गुट्टे यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या
वतीनं गाव पातळीवर काम करत असलेल्या स्वच्छाग्रही आणि इतर स्वयंसेवकांना काल दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आलं. एक
हजार ३७० स्वच्छाग्रही प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
****
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात योगदान
देणाऱ्या योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नांदेड इथं आनंदवन मित्र परिवाराच्या वतीनं ऑनलाईन
चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ८० जण या स्पर्धेत सहभागी झाले होते.
****
बीड
जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या महार टाकळी
या सीमेवरच्या चेकपोस्टवर पोलिसांनी काल अवैध गुटाख्याची वाहतुक करणारा ट्रक पकडला.
हैद्राबाद इथून नाशिक कडे जाणार्या या ट्रक मध्ये पिठाच्या पोत्यातून गुटखा नेत असल्याचं
उघडकीस आलं. पोलिसांनी गाडी चालकासह अन्य एकाला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
****
No comments:
Post a Comment