Friday, 1 May 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.05.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 May 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ मे २०२० सायंकाळी ६.००

****

·      टाळेबंदीसंदर्भात तीन मे नंतर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      देशाच्या विविध भागात अडकलेले कामगार, विद्यार्थी तसंच यात्रेकरूंना घरी परतण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी.

·      पालघर जमावहत्या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.

आणि

·      विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; ११ मे पर्यंत अर्ज भरता येणार, २१ मे रोजी मतदान.

****

टाळेबंदीसंदर्भात तीन मे नंतर परिस्थिती पाहून सतर्कता बाळगून निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त जनतेला सामाजिक संपर्क माध्यमांवरून शुभेच्छा देताना, मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील, ऑरेंज झोन मध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसंच ग्रीन झोनमधले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यात कोरोना संसर्गाच्या तीव्रतेनुसार सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत विभागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यातल्या उस्मानाबादसह वाशिम, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, आणि सिंधुदूर्ग हे सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. बीड, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि लातूरसह राज्यातले १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये, तर औरंगाबादसह चौदा जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यात यश मिळत असून, नागरिकांनी कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडावं, आजाराची काहीही लक्षणं आढळल्यास तत्काळ निदान करून घ्यावं आणि आवश्यकता असल्यास, उपचार करून घ्यावेत, उपचारानंतर रुग्ण बरा होतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

परराज्यातल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी राज्या-राज्यांमधील समन्वयातून शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांनाही परत आणले जाईल, परंतु त्यासाठी गर्दी करू नये, झुंडीने जमा होऊ नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले –

परराज्यामध्ये जे जाऊ इच्छित आहेत. त्यांना केंद्र सरकारनं जी परवानगी दिलेली आहे, ती सुध्दा अत्यंत शिस्तीनं. लगेच झुंबड केली तर ती सुध्दा परवानगी काढली जाईल. कारण हे खूप धोका दायक आहे. तर हे दोन्ही राज्य - राज्य सगळ्या देशभरामध्ये एकमेकांच्या संपर्कात राहून हा आदान प्रदान तुमची लोकं आमची लोकं ही जी काही आहे. त्याची वाहतूक व्यवस्था केल्या नंतर आपण वस्त्या - वस्त्या, गावं - गावं त्या ज्या कुठे असतील जे जाऊ इच्छितात त्यांना तशी सोय करतोय. आपल्या राज्यातल्या राज्यात जी लोकं गावी गेली होती. काही लोकं पर्यटनाला गेली होती. त्यांना सुध्दा तिथल्या - तिथल्या कलेक्टरशी बोलून पहिली प्राथमिकता, प्राधान्य ठरवून त्यांची जाण्या-येण्याची सोय आपण या काही दिवसांत तसा विचार करून ती सुरुवात करु.

****

लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेले कामगार, विद्यार्थी तसंच यात्रेकरूंना त्यांच्या घरी परतण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यास केंद्रीय गृहमंत्रालयानं परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट विक्रीसंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार असल्याचं, श्रीवास्तव यांनी सांगितलं. यापैकी सहा श्रमिक एक्सप्रेस आज जाहीर करण्यात आल्या, यामध्ये नाशिक ते भोपाळ, नाशिक ते लखनऊ या गाड्यांचा समावेश आहे.

****

देशात आज दुपारी संपलेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवे एक हजार ९९३ रुग्ण सापडले. आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या ३५ हजार त्रेचाळीस झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या चोवीस तासात ५६४ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत आठ हजार ८८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक ३७ शतांश टक्क्यांवर गेल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

****

राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या २२ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार सत्याऐंशी हजार तिनशे एक्कयाण्णव गुन्हे दाखल झाले असून सतरा हजार सहाशे बत्तीस जणांना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी तीन कोटी दहा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२४० वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पन्नास हजार आठशे सत्तावीस वाहनं जप्त करण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे पंधरा गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

****

पालघर जिल्ह्यात झालेल्या जमावहत्या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर सुनावणी झालेल्या या याचिकेत, या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीत करण्याची किंवा हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. सध्या सुरू असलेल्या तपासावर स्थगिती देण्यास, न्यायालयाने नकार देत, या याचिकेची प्रत महाराष्ट्र सरकारला देण्यास सांगितलं आहे, या प्रकरणी पुढची सुनावणी आता चार आठवड्यांनंतर होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात एवढा मोठा जमाव पोलिसांनी कसा काय जमा होऊ दिला, असा प्रश्नही याचिकाकर्त्यांने विचारला आहे. गेल्या महिन्यात १६ तारखेला पालघर जिल्ह्यात जमावाने केलेल्या मारहाणीत दोन साधूंसह एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकरणी आज आणखी पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या आता ११५ झाली आहे.

****

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठीची अधिसूचना सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे. येत्या अकरा मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून, २१ मे रोजी मतदानानंतर लगेचच मतमोजणी केली जाणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने आज बैठक घेऊन, ही निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

****

नांदेड इथला सचखंड गुरुद्वारा आणि लंगर सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे. या गुरुद्वारामध्ये अडकलेले पंजाबमधले काही भाविक नुकतेच परत पाठवण्यात आले, यापैकी १४८ भाविक कोरोना विषाणू बाधित आढळून आल्यानं, हा निर्णय घेतल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.

****

परभणी इथल्या कोरोना संसर्गामुळे मृत महिलेच्या कुटूंबातल्या तसंच या महिलेच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांसह एकूण ७१ जणांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सेलु इथं संचारबंदीत वाढ केली असून उद्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.

****

लातूर शहरात सध्या एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नसला तरी, धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याची मागणी मनपा सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे यांनी केली आहे. यासाठी १८ प्रभागात फिरता दवाखाना सुरू करून त्यात एक डॉक्टर आणि किमान तीन सहाय्यक नेमण्यात यावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबादच्या ग्रामीण भागामध्ये आज दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला. वैजापूर तालुक्यातल्या गारज इथं विनाकारण फिरणाऱ्या काही दुचाकीस्वारांना पोलिसांनी उठबशा काढण्याची शिक्षा दिली. झाल्टा फाटा इथं तपासणी नाक्यावर येणाऱ्या - जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात आली. तर दौलताबाद इथं सॅनिटारझरची फवारणी करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर इथले व्यापारी संदीप लकडे यांनी शहरातल्या शंभर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची पाकिटं वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. या पाकिटांमध्ये गव्हाचे पीठ, साखर, तेल, दाळ, मसाला आदी साहित्याचा समावेश आहे. जिंतूर इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्यामराव मते आणि दलमीर खाण पठाण यांच्याकडून आज दोनशे गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

****

नांदेड जिल्ह्यात क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक्कावन्न हजार रुपये देण्यात आले. नांदेड शहरातल्या भाजप सिडको मंडळाने पंतप्रधान केयर निधीत २८ हजार रुपये मदत केली आहे. या रकमेचा धनादेश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

****

No comments: