Saturday, 2 May 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.05.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मे २०२० सायंकाळी ६.००

****

औरंगाबाद इथं आज दिवसभरात कोरोना विषाणूचे नवे २८ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरातली या रुग्णांची संख्या २४४ झाली आहे. शहरातील टाऊन हॉल भागात दोन, किले अर्क - संजय नगर आणि गौतमबुध्दनगर भागातील प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे.

औरंगाबाद तालुक्यातील हिरापूरच्या राज्य राखीव पोलिस दलाचा जवान कोरोना विषाणू बाधित आढळल्यानं आज संपूर्ण गाव प्रतिबंधित करण्यात आलं आहे. हा जवान जालना इथं नेमणुकीला असून तो मालेगावला बंदोबस्तासाठी गेला होता. या जवानानं सुट्टी घेवून हिरापूर इथल्या आपल्या घरी सहा दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे त्याची आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलासह सर्व कुटुंबियांना चिकलठाणा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे टाळेबंदी अधिक कडकपणे अंमलात आणण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पोलिस उपआयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे यांनी याची अधिक माहिती दिली आहे.

पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद साहेबांनी आदेश काढले आहेत की, शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून Odd आणि Even तारखा decide केलेल्या आहेत. विषम तारखेला तीन तारीख आहे पाच, सात, नऊ, अकरा, तेरा, पंधरा आणि सतरा तारखेला पूर्ण आस्थापना बंद राहणार आहेत. फक्त परमिटेड जे आहे मेडीकल दुकानं वगैरे तेव्हढेच चालू राहतील. आणि शहरामध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. आणि जर का कोणी नागरिक रस्त्यावर आले घरामधून बाहेर तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, त्यांचं वाहन जप्त केलं जाईल.  

औरंगाबाद जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी अथवा अन्य ठिकाणांहून जिल्ह्यात येण्यासाठी किंवा पोलिस आयुक्त कार्यालयाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती पोलिस उप आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी दिली आहे.

****

मुंबईला असलेलं देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांना प्रमाणित करणाऱ्या प्राधीकरणाची स्थापना गांधीनगरला करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारनं या संदर्भातील अधिसूचना अलिकडेच जारी केली आहे. केंद्र सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी अपेक्षाही त्यांनी एका संदेशाद्वारे व्यक्त केली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याचं नमूद करताना राज्यातील भाजप नेतृत्त्व या मुद्दावर मौन का, असा प्रश्र्नही महसूलमंत्री थोरात यांनी उपस्थित केला आहे.

****

टाळेबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक केली जाणार असल्याचं राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे. मुंबईतील तीन ते चार ठिकाणी काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची चित्रफित आज समोर आली आहे. त्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यामधे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलिस आघाडीवर असून त्यांच्यावरील हल्ले कोणत्याही परिस्थितीमधे सहन केले जाणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. 

****

अमरावती इथल्या संत गाडगेबाबा विद्यापीठात कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करायला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून मान्यता मिळाली आहे. ही प्रयोगशाळा परवा सोमवारपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. प्रयोगशाळेसाठी स्वसंरक्षण साहित्य संच – ‘पीपीई किट’ आणि इतर आवश्यक साहित्य जिल्हा नियोजन निधीतून दिलं जाणार असून या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...