Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ जून २०२०
सायंकाळी ६.००
****
Ø
निसर्ग चक्रीवादळाचा कोकणातल्या शेती उत्पन्नावर
पुढचे दहा वर्ष परिणाम - खासदार शरद पवार यांचं
मत
Ø
देशभरातल्या पन्नासहून अधिक कोविडबाधित जिल्हा मुख्यालय
आणि महानगरपालिका क्षेत्रात केंद्रीय आरोग्य विभागाकडून उच्चस्तरीय समित्या नियुक्त
Ø
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ७९ नवे कोविडग्रस्त;
नांदेडमध्ये रुग्णसंख्या १९३ वर
आणि
Ø
बदनापूर इथल्या कृषी सहायकाला चार हजार रुपये लाच
घेताना रंगेहाथ अटक
****
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा कोकणातल्या
शेती उत्पन्नावर पुढचे दहा वर्ष परिणाम जाणवणार असल्याचं मत, राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्तवलं आहे. आज रायगड जिल्ह्याला भेट देऊन
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत
होते. आंबा नारळाच्या नुकसानग्रस्त बागा स्वच्छ करणं आणि या बागा पुन्हा लावणं, हे
मोठं आव्हान असल्याचं, पवार म्हणाले. पुढच्या चार पाच दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे
प्रयत्न करावेत, सरकारने वाटलेलं धान्यही या वादळामुळे खराब झाल्याने पुन्हा धान्यवाटप
करावं, असं पवार यावेळी म्हणाले.
या दौऱ्यात पवार यांनी आज माणगाव इथं मुख्य बाजारपेठेतल्या
नागरिकांशी संवाद साधून पवार यांनी माहिती घेतली. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे
आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते. पवार यांनी जिल्ह्यात म्हसळा
इथंही भेट देऊन नुकसानाची पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पवार उद्या रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन चक्रीवादळामुळे
झालेल्या नुकसानाची पाहणी करणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाने सहा जणांचा
मृत्यू झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशभरातल्या पन्नासहून अधिक कोविडबाधित जिल्हा मुख्यालय
आणि महानगरपालिका क्षेत्रात केंद्रीय आरोग्य विभागाने उच्चस्तरीय समित्या नेमल्या आहेत.
या समित्या कोविडग्रस्त असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राचं व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधासाठी
स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात
आली. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत प्रत्येकी सात, आसाममध्ये सहा, मध्यप्रदेश, राजस्थान,
आणि ओडिशात प्रत्येकी पाच, हरयाणा, कर्नाटक, बिहार आणि उत्तरप्रदेशात प्रत्येकी चार,
उत्तराखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी तीन समित्या कार्यरत असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ७९ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची वाढ झाली. आता जिल्ह्यातली
कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार १४८ झाली आहे. नव्या रुग्णांपैकी ७२
रुग्ण सकाळी तर ७ रुग्ण दुपारच्या सत्रात सापडले. यापैकी कोहिनूर कॉलनी, नागसेन नगर,
उस्मानपुरा, जुन्या मोंढ्यातलं भवानी नगर, मिलकॉर्नर, आसेफिया कॉलनी, बुद्ध नगर, जवाहर
कॉलनी, जाधववाडी, पेठे नगर -निसर्ग कॉलनी, नारेगाव, एन-११ मयूर नगर, हडको, बिस्मिला कॉलनी, एन -आठ सिडको, सिल्लेखाना, कटकट
गेट शरीफ कॉलनी, बायजीपुरा, वसंत नगर, पडेगाव, रोहिणी नगर, न्यायनगर, शिवाजी नगर, व्हीआयपी
रोड काळीवाडा, युनुस कॉलनी, रवींद्र नगर, दशमेश नगर, अरिहंत नगर, विद्या नगर, एन-४
गुरुसहानी नगर, अंबिका नगर, एन सहा- सिडको, कैलास नगर, रोकडिया हनुमान कॉलनी, इंदिरा
नगर, गादिया विहार, रमा नगर क्रांती चौक, कैसर पार्क, जटवाडा रोड परिसर, या ठिकाणी
प्रत्येकी एक, रोशन गेट गारखेडा परिसर आणि समता नगर भागात प्रत्येकी तीन, मुकुंदवाडी,
हर्सुल परिसर, बंजारा कॉलनी, नूतन कॉलनी, संजय नगर, एसटी कॉलनी, कटकट गेट, त्रिमूर्ती
चौक, गादिया विहार, अशोक नगर, मसनतपूर, सिटी चौक या भागात प्रत्येकी २, गणेश कॉलनी,
मोहनलाल नगर या भागात चार, आणि अन्य ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद इथून
आतापर्यंत १ हजार २५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला आहे. सध्या ७८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात आज एका डॉक्टरांना कोरोना विषाणूची
बाधा झाल्याचं आढळून आलं. शहरातल्या शाहूनगर
इथला रहिवासी असलेल्या या डॉक्टरसह शहरात आतापर्यंत चार डॉक्टर कोरोनाविषाणू बाधित
झाले आहेत. जिल्हयात कोरोना विषाणू बाधित रुग्णसंख्या १९३ झाली असून, यापैकी बरे झालेल्या
रुग्णांची एकूण संख्या १३४ झाली आहे. आज तीन रूग्ण उपचारानंतर बरे झाले तर सध्या तर
५० रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे.
****
धुळे जिल्हा रुग्णालयातून आज ३ अधिपरिचरिकांसह एकूण
५ जणांना १० दिवसाच्या उपचारानंतर सुटी देण्यात आली. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी
फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप दिला. शिरपूर इथल्या
उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दहा जणांनी या आजारावर मात केली आहे. हे सर्वजण
एकाच कुटुंबातले आहेत. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २७५ झाली
आहे. यापैकी २६ जणांचा मृत्यू
झाला असून, १२३ जण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त होऊन घरी परतले आहेत.
****
रत्नागिरी इथल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उभारण्यात
आलेल्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते
आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. एक कोटी ७ लाख
रुपये खर्चून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे, या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यात आरोग्य
विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली असून आता कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांची गती वाढेल,
याचा जिल्हयातील सर्वांना फायदा होणार असल्याचं, ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
औरंगाबाद इथं आज आणखी
एका कोरोना विषाणू बाधित रुग्ण पळून गेला. शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय
- घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेला हा रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होता, आज सकाळी
साडे सहा वाजेच्या दरम्यान तो सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पसार झाल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. शहरातली गेल्या तीन दिवसांतली ही दुसरी घटना आहे. शहरातल्या हर्सुल
मध्यवर्ती कारागृहातले दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण परवा रविवारी रात्री कोविड सुश्रुषा
केंद्रातून पळून गेले आहेत.
****
औरंगाबाद इथं मद्याची
अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी
विदेशी मद्याचा सुमारे २५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संतोष बन्सवाल आणि
नरेंद्र बरतुने अशी या दोघांची नावं असून, त्यांच्याविरोधात दारुबंदी कायद्यान्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यात बदनापूर
इथं कृषी कार्यालयात कार्यरत कृषी सहायक चंद्रशेखर काकडे याला चार हजार रुपये लाच घेताना
आज रंगेहाथ अटक करण्यात आली. फळबाग लागवडीसाठी मंजूर रकमेचा धनादेश देण्यासाठी काकडे
याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती, यापैकी चार हजार रुपये घेताना,
त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बदनापूर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून
अटक केली.
****
पुण्यात रविवारी रात्री
झालेल्या एका हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी चौघांविरोधात
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली
असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्वांनी विराज जगताप नावाच्या
२० वर्षीय तरुणाला पुण्यात पिंपळे सौदागर इथं केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला
होता.
****
टाळेबंदीच्या कालावधीत उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या
संकटात सापडलेल्या या व्यापाऱ्यांचं गाळाभाडं, व्यवसाय कर, वीजबिल माफ करावे यासह
अन्य मागण्या जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे
एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी उद्योगवाहिनी ठरणार्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद
रेल्वेमार्गाचं काम त्वरीत सुरू करावं, अशी महत्वपूर्ण मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांना
दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे
दिलं.
****
परभणी इथले शिवसेनेचे
आमदार राहूल पाटील यांनी आज शहरातल्या प्रभाग चार इथं कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
आरोग्य शिबिर घेतलं. या शिबीरास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दहा
हजारांहून अधिक नागरिकांना औषधीचं आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. कालपासून या शिबिराला
सुरूवात झाली आहे.
****
वर्धा जिल्ह्यात आणखी
३ रुग्ण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. हे तिन्ही रुग्ण पूर्वीच्या कोराना विषाणू
बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातले आहेत. वर्ध्यातल्या कोरोना विषाणू बाधितांचा आकडा
२५ वर पोहोचला आहे. यात वर्धा जिल्ह्यातल्या १३ रुग्णांचा समावेश असून इतर जण बाहेरच्या
जिल्ह्यातले आहेत.
****
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव
रोखण्यासह प्रभावी उपाययोजनाच्या अंमलबजावणीत राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय
जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या
दुसऱ्या कार्यकाळातल्या प्रथम वर्षपुर्ती निमित्तानं आणि भाजपाच्या कामकाजासंदर्भात
माहिती देण्यासाठी आज परभणी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाबाधित
रुग्णांच्या संख्येत अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्र आघाडीवर आहे. या गोष्टीस राज्य सरकारचे
अपयशच कारणीभूत असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षापासून अनेक लोककल्याणकारी
अनेक योजना राबवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव शहरात आज दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळात दमदार
पाऊस झाला. या पावसामुळे शहरातला वीज पुरवठा खंडीत झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात
अनाधिकृत बियाणे विक्रेत्यांवर धाड टाकून कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
एम.डी. सिंह यांनी कृषी विभागाला दिले आहेत. ते आज कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत
होते. अशा कारवाईसाठी कृषी विभागास जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत देण्यात
येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र टिचर्स
असोसिएशनच्या वतीनं अनुदानासह विविध मागण्यासाठी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर
मूक मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली
काढण्यात आलेल्या या मूकमोर्चात तोंडाला मास्क, हातात मागणी फलक घेत शारीरिक अंतराच्या
नियमाचं पालन करत शिक्षकांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
*****
No comments:
Post a Comment