Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जून २०२०
सायंकाळी ६.००
****
Ø
यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साधेपणाने साजरा
करावा - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Ø
जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध
रथयात्रेला यंदा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
Ø
जळगाव जिल्ह्यात एकशे पस्तीस नवे कोविडग्रस्त; औरंगाबाद
७३ तर नांदेडला १० नवे रुग्ण
Ø
जालन्यात एका कोविडग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू
आणि
Ø
तरुण उद्योजकांनी ग्रामीण
भागात प्रक्रिया उद्योग सुरु करावेत -उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं आवाहन
****
यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साधेपणाने साजरा
करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केली आहे. आगामी गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात
दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री
अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आणि यांच्या सह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राज्यातल्या
गणेश मंडळांचे तसंच मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेश मंडळांमार्फत
सामाजिक जनजागृती कशी केली जाईल, याचा विचार व्हावा, आणि यासाठी सर्वांनी सहकार्य करावं,
असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर ओडिशात जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध रथयात्रेला यंदा सर्वोच्च न्यायालयानं
स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं
आज हा निर्णय देताना, सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी यंदा रथयात्रेला परवानगी देता
येणार नसल्याचं सांगितलं. जर रथयात्रेला परवानगी दिली, तर भगवान जगन्नाथ आपल्याला क्षमा
करणार नाहीत, असं न्यायालयानं म्हटलं आहे. एका अशासकीय संस्थेने यासंदर्भात न्यायालयात
याचिका दाखल करत, यंदाची रथयात्रा रद्द किंवार पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यात्रेसंदर्भातली
धार्मिक आयोजनं, तसंच यात्रेकरूंच्या शोभायात्रांना परवानगी देऊ नये, अशी सूचना न्यायालयानं
ओडिशा राज्यसरकारला दिली आहे. येत्या मंगळवारी, २३ जूनपासून ही रथयात्रा सुरू होणार
होती.
****
जळगाव जिल्ह्यात आज एकशे पस्तीस कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दोन हजार वीस झाली आहे.
जिल्ह्यातल्या एकशे दहा रुग्णांना प्रकृती सुधारल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात
आलं. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार सत्तावन्न रुग्ण बरे झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ७३ नवीन कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना
विषाणू बाधितांची संख्या आता तीन हजार १०९ झाली आहे. आज सकाळी ७० तर दुपारनंतर एन
- सहा सिडको, कैसर कॉलनी आणि सादात कॉलनी या ठिकाणी प्रत्येकी एक असे तीन रुग्ण आढळले
असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये ३२ महिला आणि ४१ पुरूषांचा
समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातले एक हजार ७०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १६६ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, सध्या एक हजार २३४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू
असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने दहा कोरोनाविषाणू बाधित
रूग्ण आढळून आले. यामुळे नांदेड जिल्ह्यातली बाधित रुग्णांची संख्या २९६ झाली आहे.
आज १०२ रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर एकुण १८१ रूग्ण बरे झाले आहेत. १३ रूग्णांचा
कोरोनाविषाणूमुळे मृत्यू झाला.
****
जालना शहरातल्या लोधीमोहल्ला भागातल्या एका साठ वर्षीय
व्यक्तीचा आज जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जालना
जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृतांची संख्या आता दहा झाली आहे.
दरम्यान, शहरातल्या आणखी दहा जणांचा कोरोना विषाणू
चाचणी अहवाल बाधित आला. बाधितांमध्ये राज्य राखीव दलाच्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातल्या
कादराबाद भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण कोरोना विषाणू बाधित
रुग्णसंख्या तीनशे चोवीस झाली आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथल्या बावन्न वर्षाच्या
महिलेचा आज शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गावर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत त्रेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या चारशे बावन्न जणांना कोरोना
विषाणूची लागण झाली असून दोनशे पंचाऐंशी जण या आजारातून बरे झाले आहेत.
*****
चीनसंदर्भात केंद्र सरकार नमतं
धोरण घेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वाड्रा यांनी केला आहे. दिल्ली
मेरठ रेल्वे प्रकल्पाचं कंत्राट चिनी कंपनीला दिल्याच्या संदर्भाने त्यांनी ही टीका
केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतानं चीनला स्पष्ट इशारा देण्याची गरज
असताना, भारतानं चीनसमोर गुडघे टेकले, असं त्यांनी म्हटलं आहे. सीमेवर चीनसोबत संघर्ष
होत असताना, १ हजार १२६ कोटी रुपयांचं कंत्राट चिनी कंपनीला देण्यात आलं, हा रेल्वे
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देशातल्या कंपन्या सक्षम असल्याचं, प्रियंका वाड्रा यांनी
नमूद केलं.
****
लद्दाखच्या गलवान खोऱ्यात चीनने
केलेल्या आगळीकीबद्दल कोणत्याही देशाची प्रतिक्रिया आलेली नाही, यावरून भारताचं परदेश
धोरण अपयशी ठरल्याचं दिसून येतं, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं
आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत भारताचे २० सैनिक नुकतेच हुतात्मा
झाले, या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. नागरिकांनी
एकजुटीने चीनच्या या कारवायांना विरोध दर्शवून भारतीय सैन्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं
राहण्याचं आवाहन आव्हाड यांनी केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यसरकारसंदर्भात काँग्रेस
पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं
आहे. ते आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी
बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचं थोरात यांनी यावेळी सांगितलं.
****
तरुण उद्योजकांनी ग्रामीण भागात
प्रक्रिया उद्योग सुरु करावेत, असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी
केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठानं स्मार्ट अन्न प्रक्रियेचं
प्रगत तंत्रज्ञान या विषयावर दोन आठवड्याचा ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग घेतला, आज या वर्गाचा
समारोप झाला, त्यावेळी देसाई बोलत होते. प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही.
प्रत्येक तालुक्यात मुल्यवर्धनाची साखळी तयार होणे गरजेचं आहे. प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी
लागणारी जमीन, कच्चा माल ग्रामीण भागात कमी दराने उपलब्ध असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
या प्रशिक्षण वर्गासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही ३२० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींनी
सहभाग नोंदवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाला टाळेबंदीनंतर पुन्हा सुरुवात
झाली आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात आजपर्यंत
एक लाख २८ हजार ६२१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून एक लाख ७ हजार ५७
शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे ७११ कोटी २३ लाख रुपये जमा झाले आहेत. सर्व शेतकऱ्यांनी
आपलं आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावं, असं आवाहन जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी केलं
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणू
संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाच्या अनुषंगानं गाव, वाडी, वस्ती, तांडा इथं कोरोना विषाणूचा
संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांने ‘कोरोना दूत’ म्हणून वैयक्तिक जबाबदारी पार
पाडण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केलं आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयानं
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलिस
अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं सात पथकं पाठवण्यात आली होती. या पथकांनी सिल्लोड, सोयगाव,
फुलंब्री, वडोदबाजार, खुलताबाद, वैजापूर, शिल्लेगाव, पैठण या ठिकाणच्या प्रतिबंधित
क्षेत्राचा आढावा घेऊन, नागरिकांना वैयक्तिक खबरदारी घेण्याबाबत माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रासाठी
मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात यावा अशी मागणी औस्याचे आमदार अभिमन्यू
पवार यांनी केली आहे, या मागणीचं पत्र लातूरचे
जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे त्यांनी सादर केलं. हरभरा उत्पादन करणाऱ्या पन्नास
हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदीसाठी नोंदणी केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथला पोलिस हवालदार
सुरेश बाजीराव पाटील यांना लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा पोलिस प्रशासनाने शासकीय सेवेतून
बडतर्फ केलं आहे. वीज जोडणीचं काम करणाऱ्या एका कामगाराच्या कुटुंबियांविरूध्द दाखल
प्रकरण मिटवण्यासाठी सुरेश पाटील याने एक हजार रुपये लाच मागितली होती. लाच घेताना
त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
****
लातूर इथल्या एम आय एम एस आर वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण
ग्रामीण रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकातल्या रुग्णांसाठी ५४०
खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाचे डॉ. एन. पी. जमादार यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून
ही माहिती दिली.
*****
No comments:
Post a Comment