Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९
जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
शेतकऱ्यांचा
शिल्लक राहिलेला कापूस १२ जूनपर्यंत
खरेदी करण्याचे न्यायालयाचे सरकारला
आदेश; कापूस खरेदीबाबत तक्रार असल्यास आपल्याकडे दाद मागण्याची न्यायालयाची सूचना
** राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्जाचं
वाटप करावं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** नैऋत्य मोसमी पाऊस येत्या ११ तारखेला मुंबईत दाखल होईल, - हवामान खात्याचा अंदाज
** कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या
४५ महापालिकांच्या अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
** राज्यात काल आणखी दोन हजार ५५३ कोरोना विषाणू बाधितांची नोंद
तर १०९ रुग्णांचा मृत्यू
** औरंगाबादमध्ये दोन कोरोना विषाणूग्रस्त कैदी कोविड
सुश्रुषा केंद्रातून पसार; बाधितांच्या संख्येत ४९ रुग्णांची
वाढ तर चार जणांचा मृत्यू
** जालना, बीड, लातूर आणि हिंगोलीतही कोविड रुग्णांच्या
संख्येत वाढ तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू
** आणि
** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात
सलग दुसऱ्या दिवशी प्रतिलिटर ६०
पैशांची वाढ
****
राज्यातल्या
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा
शिल्लक राहिलेला कापूस १२ जूनपर्यंत
खरेदी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्यशासन आणि पणन
विभागाला दिले आहेत. परभणी इथल्या काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी
केली नसल्यानं अशा शेतकऱ्यांचा
कापूस खरेदी न करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. याविरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका
दाखल केली आहे. शासनाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांना तक्रार असल्यास त्यांना आपल्या
सातबाऱ्यासह
खंडपीठात दाद मागता येईल, असंही
न्यायालयानं म्हटलं आहे. शासनानं जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं कापूस
खरेदी करणाऱ्या व्यापारी
आणि एजंटांवर शासनानं कारवाई करावी,
असे आदेशही खंडपीठानं
दिले आहेत याचबरोबर कापूस
खरेदीसंदर्भात राबवल्या जात असलेल्या प्रक्रियेबाबत न्यायालयाला माहिती देण्याचे आदेश खंडपीठानं सरकारला दिले आहेत.
****
राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्जाचं
वाटप करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत कृषी खरीप हंगाम कामांचा दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे त्यांनी काल आढावा घेतला, त्यावेळी
ते बोलत होते. पिक कर्ज मिळत नसल्याबाबत
शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याबाबत काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी
केली. बी बियाणे
तुटवडा पडू देऊ नका तसंच बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
****
नैऋत्य मोसमी पाऊस येत्या ११ तारखेला मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर
हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात
किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता असल्याचं, या वृत्तात म्हटलं
आहे. दरम्यान मराठवाड्यातही काही भागात पुढच्या दोन दिवसांत पावसाची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
कोरोना
विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशामधल्या दहा राज्यातल्या ४५ महापालिकांच्या
अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. त्याचबरोबर आजाराचा संसर्ग आणि मृत्यू दर वाढणार नाही
यासाठी त्वरीत चाचण्या करण्याबाबत उपाययोजना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव प्रिती सुदान आणि आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल
या ३८ जिल्ह्यातल्या ४५ महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा रुग्णालयांचे अधिक्षक
आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासोबत
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक केली. या दहा राज्यात महाराष्ट्राचाही
समावेश आहे. टाळेबंदीत शिथिलता देण्याच्या आणि निर्बंध कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर
आगामी महिन्यांसाठी संभाव्य आराखडा तयार करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या शहरी
भागात कोरोना विषाणूच्या होणाऱ्या संसर्गासह विविध विषयांवर चर्चा झाली.
आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार औरंगाबाद
शहरात महानगरपालिकेनं ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे. या कामासाठी
एकोणीसशे शिक्षक नेमण्यात आले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने राज्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कुणाल कुमार यांची नियुक्ती केली आहे. ते आज औरंगाबाद शहरातल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून आढावा घेणार आहेत.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ५५३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण
रुग्णसंख्या ८८ हजार ५२८ झाली आहे. तर काल या आजारानं
१०९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तीन हजार १६९ जणांचा
मृत्यू झाला आहे. काल राज्यभरात एक हजार ६६१ रुग्णांना बरे झाल्यानं
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४० हजार ९७५ रुग्ण
कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद इथं कोरोना विषाणूग्रस्त असलेले दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार
झाले. सय्यद सैफ सय्यद असद आणि अक्रमखान अयाजखान अशी
या दोघांची नावं आहेत. दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत असलेल्या या
दोघा कैद्यांनी रविवारी रात्री खिडकीचे गज वाकवून, चादरीच्या सहाय्याने खाली उतरून पलायन केलं, सुरक्षा
व्यवस्थेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हे दोघे पसार झाल्याचं, मध्यवर्ती
कारागृहाकडून सांगण्यात आलं. या दोन्ही कैद्यांविरोधात पोलिसांत
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका
कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं असून, नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
किले अर्क परिसरात उभारण्यात आलेल्या या कोविड सुश्रुषा केंद्रात,
१९ कैद्यांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत काल ४९ रुग्णांची वाढ
झाली. यामध्ये औरंगाबाद शहरातल्या पीर बाजार इथं आठ,
सिडको एन-नाईन संत ज्ञानेश्वर नगर इथं पाच,
सातारा परिसरात तीन, चिकलठाणा, सादाफ कॉलनी, कटकट गेट, विद्या
निकेतन कॉलनी, मिल कॉर्नर, आणि अन्य भागात
प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. शिवशंकर कॉलनी, बौद्ध नगर, पोलिस क्वार्टर, तिसगाव,
भोईवाडा, पद्मपुरा, फाजलपुरा,
मोहनलाल नगर, सिडको एन-ननाईन
रेणुका माता मंदिर, न्यू हनुमान नगर, मजनू हिल, दमडी मोहल्ला, ज्युबली
पार्क, गारखेडा परिसर, जवाहर कॉलनी,
पुंडलिक नगर, भोईवाडा, शिवाजी
नगर, सेंट्रल नाका, बायजीपुरा, एन-फोर सिडको, कैलास नगर,
आणि गणेश नगर, या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला
आहे. जिल्ह्यात पंढरपूर इथं चार, देवशी
पिंपळगाव, गंगापूर, सावरखेडा, आणि सोयगाव इथंही प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याचं वृत्त
आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दोन हजार ६९ झाली आहे.
दरम्यान,
औरंगाबाद शहरात काल कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये संजय नगर गल्ली
क्रमांक १३ मधल्या ४३ वर्षीय महिला, इंदिरा नगर मधल्या ७० वर्षी्य महिला, बायजीपुऱ्यातल्या ६३ वर्षी्य पुरुष आणि
शिवाजी नगर इथल्या ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०४ जणांचा
मृत्यू झाला आहे. एक हजार २२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ७४१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोनाविषाणू संसर्गामुळे एका ५५ वर्षाच्या
महिलेचा काल मृत्यू झाला. ही महिला गुलजार बाग भागातली रहिवासी होती.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडे चार
हजारावर संशयितांचे नमुने तपासण्यास आले असून, त्यापैकी आतापर्यंत
१९२ जण कोरोना विषाणूने बाधित आढळले होते, यापैकी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १३१ जण बरे होऊन घरी परतले
आहेत. सध्या ५२ रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
****
जालना
जिल्ह्यात काल आणखी १४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बाधितांमध्ये जालना
शहरातल्या बालाजी नगरमधले सात, मोदीखाना भागातले दोन, गुडलागल्ली, सरस्वती मंदिर, इथं
प्रत्येकी एक, तर जालना तालुक्यातल्या बेथल आणि अंबड तालुक्यातल्या सोनपिंपळगाव इथल्या
एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २१९ झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली. आंबेवडगाव तालुक्यातल्या धारुर इथल्या १० वर्षीय
मुलगा, गेवराई तालुक्यातल्या मालेगाव इथली १८ वर्षीय मुलगी,
बीड शहरातल्या मसरत नगर इथं तीन, तर आष्टी इथल्या
एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात काल एका बाधित रुग्णाचा मृत्यू
झाला.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं काल एका व्यक्तीचा अहवाल
बाधित असल्याचा आला आहे.
दरम्यान, शहरात काल
एकाच वेळी नऊ रुग्ण कोरोना विषाणू वर मात करून घरी परतले.
या व्यक्तींचं महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर
चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे यांनी पुष्प देवून
अभिनंदन केलं. यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील
केली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात जांब इथं एक बाधित रुग्ण आढळून आला. यामुळे जांब हे गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २०१ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल पाच रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १६८ जण बरे झाले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल बारा
बाधित रुग्ण बरे झाल्यांनं त्यांना रुग्णालयातून सुटी
देण्यात आली. जिल्हा रुग्णालयात सध्या रुग्णालयात ९३ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ४८२ संशयीत रुग्ण दाखल असून यापैकी
३९६ जणांचं घरी विलगीकरण करण्यात आलं आहे. .
****
मुंबईत एक हजार ३१४, सातारा जिल्ह्यात १८, सांगलीत ११, अहमदनगर शहरात दोन, सिंधुदुर्ग जिल्हात ९,
सांगली जिल्ह्यात
११, सोलापूर शहरात ३३, वाशिममध्ये दोन
तर गडचिरोली जिल्ह्यात
आणखी एक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे.
****
इंजिनातून उत्सर्जित
होणाऱ्या प्रदुषणकारी घटकांसंदर्भातील ‘भारत सहा- बी एस
सिक्स’ मानकाची पूर्तता करणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांकांच्या
पाटीवर वेगळी हिरवी पट्टी लावण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्रालयानं दिले आहेत. सध्या अशी पूर्तता करणाऱ्या वाहनांना ही अतिरिक्त पट्टी
असेल. पेट्रोल, डिझेल आणि गॅस यापैकी कोणत्याही इंधनावर
चालणाऱ्या वाहनांना हा एक सेंटीमीटर रुंदीचा स्टीकर लावावा लागणार आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात
जिल्ह्यातली पहिली कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या
हस्ते काल या प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. बीड जिल्ह्यातल्या संशयितांचे
नमुने आतापर्यंत लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. मात्र
कालपासून कार्यान्वीत झालेल्या या प्रयोगशाळेत बीड सह आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कोरोना
संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करता येईल. कोरोना विषाणूचा
संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होईल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त
केला. जिल्हाधिकारी राहुल
रेखावार, आ. संजय दौंड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद इथलं कोविड सुश्रुषा केंद्र येत्या आठवडाभरात तयार होईल, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं आहे. चिकलठाणा
औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या या रुग्णालयात अडीचशे खाटांची व्यवस्था असेल.
या रुग्णालयासाठी साठ आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, इथल्या आरोग्य सुविधांबाबत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाला प्रस्ताव पाठवल्याचं,
औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं.
सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात सर्व गरजेची
उपकरणं उद्यापर्यंत दाखल
होतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष यशस्वी ठरलं असून, कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द लढतांना अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरीब
लोकांना मदत केली असल्याचं, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील
चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. जिल्ह्यात रोजगार गेलेल्या गोरगरीब दिड लाख लोकांना
अन्नधान्याची पाकिटं, तसंच कम्युनिटी किचन या उपक्रमातून एक लाख
लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली.
****
पेट्रोल
आणि डिझेलच्या दरात काल सलग दुसऱ्या
दिवशी लिटरमागे ६० पैशांची
वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्या असलेल्या भारतीय तेल महामंडळ, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन
आणि हिंदुस्थान ऑईल कॉर्पोरेशन यांनी गेले ८२ दिवस इंधनाच्या दरांचा दररोज घेतला जाणारा
आढावा बंद ठेवला होता, मात्र रविवारपासून पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात दररोज बदल
करण्यास सुरुवात केली
आहे.
****
लातूर
जिल्ह्यातल्या राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करत नसल्या बद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी नाराजी
व्यक्त केली आहे. लातूर इथं
काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांना दिलेल्या पिक कर्ज वाटपाची उद्दिष्ट
पुर्तता केलीच पाहिजे, असं ते म्हणाले. याच बैठकीत उदगीर आणि जळकोट
तालुक्यातल्या पाणी पुरवठा जलसंधारण विभागाचाही आढावा
घेण्यात आला. जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजनांची
कामं संबंधीत विभागानं वेळेत पूर्ण करण्याच्या
सूचना पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. या
दोन तालुक्यात जल
जीवन मिशन योजना राबवणार असल्याचं त्यांनी
यावेळी सूचित केलं.
****
राज्यातल्या
बंधपत्रित अधिपरिचारिकांनी सेवेत कायम करावं या मागणीसाठी काल काम बंद आंदोलन केलं.
२०१५ पासून या अधिपरिचारिका बंधपत्रावर कार्यरत आहेत. परभणीतल्या सर्व बंधपत्रित अधिपरिचारिका
या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
अहमदनगर कास्ट्राईब संघटनेचे महासचिव एस टी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन
करण्यात आलं. गोंदिया इथंही बंधपत्रित ४९ परिचारिकांनी याच
मागणीसाठी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात केलसुला गावातल्या महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वी सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊनही प्रशासनानं त्याची दखल घेतली
नाही. काल या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून,
उपोषणाचा इशारा दिला आहे.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात कावलगाव शिवारात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची
चोरी करणाऱ्या तस्करांविरूध्द पोलिसांनी काल धडक कारवाई केली. यामध्ये एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर, वाळू उपसा करणारी बोट, असा एकूण २१ लाख ७८ हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात
आले असून, त्यापैकी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं काल निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. १९६७ ते ७२ या काळात त्यांनी अंबड
मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. अंबड खरेदी-विक्री संघांचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक,
तसंच जालना जिल्हा आस्तित्वात येण्यापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य,
म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर
काल कंडारी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
परभणी जिल्ह्यात ५ लाख नागरिकांना आर्सेनिक
अल्बम-30 या
औषधीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितलं आहे. परभणी शहरात प्रभाग क्रमांक ४ च्या भारतीय बाल
विद्या मंदिर इथं शिवसेनेच्या वतीनं काल घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ते बोलत होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग इथं परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीनं काल गरीब, गरजू, विधवा, परित्यक्ता, तसंच निराधार कुटुंबाना अन्न धान्याचे १०० किट वाटप करण्यात आलं. संस्थेचे संस्थापक सचिव
मारुती बनसोडे यांनी यावेळी केलेल्या संबोधनात गरजूंना
अन्नदान करण्याचं आवाहन केलं.
****
बीड जिल्ह्यात परळी इथं, काल तीन भावंडांचा पाण्यात
बुडून मृत्यू झाला. शहराजवळ खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका
१५ वर्षीय मुलीसह तिची एक बहीण आणि एका भावाचा मृतांमध्ये समावेश आहे. लहान भावाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी दोघी बहिणी
पाण्यात उतरल्या, मात्र यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अडीच महिन्याच्या खंडानंतर लातूर इथल्या न्यायालयाचं काल नियमित कामकाज सुरु झालं. गेल्या अडीच महिन्यात फक्त अत्यावश्यक
कामापुरतेच न्यायालय सुरू होते. उच्च न्यायलयानं
दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत दोन पाळ्यामध्ये
कालपासून हे कामकाज सुरु झालं आहे. ज्यांचं
प्रत्यक्ष काम आहे, अशाच वकील आणि पक्षकारांनी
न्यायालयात यावे असे निर्देशही उच्च न्यायालयानी
दिले आहेत.
****
परभणी इथल्या बालविद्या मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी २५ हजार रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिकारी
दिपक मुगळीकर यांच्याकडे या निधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
मूळ परभणीचे रहिवाशी आणि सध्या बंगलोर इथं कार्यरत असलेले डॉ. शशीन शोभणे
यांनी परभणी जिल्हा प्रशासनाला ५० पीपीई किटस प्रदान केल्या आहेत.
****
औरंगाबादनजिक असलेल्या स्कोडा या चारचाकी वाहनांच्या कंपनीतर्फे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय -घाटीला जवळपास चौदाशे वैयक्तिक सुरक्षा प्रावरण- पीपीई
किट, पाच व्हेटींलेटर आणि पाच मल्टीपॅरामॉनिटर यंत्र देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातल्या वाटेफळ आणि
भूम तालुक्यातल्या सोनेवाडी इथं
कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानं या गावांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट
देऊन प्रशासनातर्फे केलेल्या आवश्यक
उपायोजनांची पाहणी काल केली.
****
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळानं
जिल्हा उपनिबंधकाच्या संगनमतानं दीड कोटी रुपये हडप केल्याचा
आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना
निवेदन देऊन केला आहे. कोरोना
विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीनं गरजू व्यक्तींना जेवण,
धान्याचे किट्स, व्यापाऱ्यांना सॅनिटायझर आणि परिसरात फवारणी इत्यादी कामासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च
केल्याचं दाखवलं असून त्यापैकी
बहुतांश खर्च कागदोपत्रीच आहे त्यासाठी बनावट दस्तावेज तयार करण्यात आले असल्याचं देशमुख यांचं म्हणणं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तहसील
चे मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे याला खाजगी इसमामार्फत तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना
काल रंगेहात पकडण्यात आलं. वाळूची वाहतूक करणा-या
ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
सातारा नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना काल २ लाख ३० हजार रूपयांची
लाच घेताना सातारा लाच लुचपत विभागानं अटक केली.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड शहरातले व्यापारी विजय शर्मा यांच्या गोदामावर धाड टाकून १० लाख ८९
हजार रुपयांचा ऐवज परभणी पोलिसांनी जप्त केला आहे. या संपूर्ण कारवाईत स्वस्त धान्य
दुकानातला २० टन गहू आणि
२९ क्विंटल तांदूळ यासह गोदामातील ३८ क्विंटल गहू आणि शासनाच्या स्वस्त धान्यचा ट्रेडमार्क असणारे ३६ बारदानेही
पोलिसांनी जप्त केले. याठिकाणी
काही बनावट पावत्याही आढळून आल्या असून संबंधिताविरूद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या जालना रस्त्यावरील सिडको उड्डाणपुलावर काल सायंकाळी पेट्रोल टँकरच्या केबिनला आग लागली. मात्र अग्निशमन बंबानं
आग तत्काळ विझवल्याने अनर्थ टळला. मनमाडहून १५ हजार लीटर डिझेल
आणि ५ हजार लीटर पेट्रोल घेवून निघालेलं हे टँकर जालना जवळच्या नागेवाडी पेट्रोल पंपावर पुरवठा करण्यासाठी जात होतं. दरम्यान, या
घटनेमुळं जालना रस्त्यावरची वाहतूक काही काळ
खोळंबली होती.
****
नांदेड
इथं टाळेबंदीच्या
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूध्द कारवाई करत महापालिकेनं ४२ हजार ६०० रूपये दंडाची रक्कम वसूल
केली. दुकानात एकमेकांपासून सुरक्षित अंतर न
राखणं, सॅनिटायझरचा वापर न करणं, मास्क न वापरणं आदी कारणांवरून ही कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment