Tuesday, 9 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 09 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र तसंच राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या पीठानं आज या संदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान, स्थलांतरित कामगारांसाठी २४ तासांच्या आत विशेष श्रमिक रेल्वेंची व्यवस्था करून, इच्छुक कामगारांना पुढच्या पंधरा दिवसांत त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यास सांगितलं. आपत्ती निवारण कायद्यानुसार ज्या कामगारांविरोधात टाळेबंदीच्या काळात नियमभंगाचे गुन्हे दाखल झाले असतील, त्यांच्याविरोधातले असे गुन्हे मागे घेण्यावरही संबंधित यंत्रणांनी विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं स्वत: दाखल करून घेतलेल्या या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता.
गेल्या तीन तारखेपर्यंत देशभरात ४ हजार २०० विशेष श्रमिक रेल्वे देशभरात चालवण्यात आल्या, त्यापैकी महाराष्ट्रातून ८०२ रेल्वे कामगारांना घेऊन देशाच्या विविध भागात गेल्याचं, पीटीआयच्या बातमीत सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार १४१ झाली आहे. यापैकी १ हजार २५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ७८० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ७२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये २६ महिला आणि ४६ पुरुषांचा समावेश आहे. कोहिनूर कॉलनी, नागसेन नगर, उस्मानपुरा, जुन्या मोंढ्यातलं भवानी नगर, मिलकॉर्नर,  आसेफिया कॉलनी, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी, जाधववाडी, पेठे नगर -निसर्ग कॉलनी, नारेगाव, एन-११ मयूर नगर, हडको,  बिस्मिला कॉलनी, एन -आठ सिडको, सिल्लेखाना, कटकट गेट शरीफ कॉलनी, संजय नगर, बायजीपुरा, वसंत नगर, पडेगाव, रोहिणी नगर, न्यायनगर, शिवाजी नगर, व्हीआयपी रोड काळीवाडा, युनुस कॉलनी, नूतन कॉलनी, रवींद्र नगर, दशमेश नगर, अरिहंत नगर, विद्या नगर, एन-४ गुरुसहानी नगर, अंबिका नगर, पोलिस कॉलनी मुकुंदवाडी, एन सहा- सिडको, कैलास नगर, रोकडिया हनुमान कॉलनी, जटवाडा रोड परिसर, या ठिकाणी प्रत्येकी एक, रोशन गेट गारखेडा परिसर प्रत्येकी तीन, मुकुंदवाडी, हर्सुल परिसर, बंजारा कॉलनी, एसटी कॉलनी, कटकट गेट, त्रिमूर्ती चौक, समता नगर, गादिया ‍विहार, अशोक नगर, मसनतपूर, सिटी चौक या भागात प्रत्येकी २, गणेश कॉलनी, मोहनलाल नगर या भागात चार, आणि अन्य ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात वडगाव कोल्हाटी- पंढरपूर परिसरात एक तर बजाज नगर, मोरे चौक या भागात तीन रुग्ण आढळले आहेत
****
परभणी जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण कोरोना विषाणूने बाधित आढळले आहेत. मानवत तालुक्यातला एक ४४ वर्षीय पुरुष आणि सेलू तालुक्यातली एक ४५ वर्षीय महिला यांच्या घशातल्या स्त्रावाचे नमुने आज पॉझिटिव्ह  आले. सेलू इथल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विदर्भातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात वनरक्षक आणि वनपाल यांनी तब्बल सव्वा पाच लाख किलोमीटर गस्त घातली आहे. गेल्या तीन वर्षातल्या पायदळ गस्तीचा हा सर्वात मोठा टप्पा ठरला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातल्या वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं, तसंच संवेदनशील भागात अवैध चराई, अतिक्रमण, आगीच्या घटना, या बाबीवर अंकुश राहावा या दृष्टीनं ही पावलं उचलण्यात आली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
****
परभणी इथं मध्यवस्तीतल्या व्यापारी संघटनेच्या इमारतीच्या आवारात जुगार खेळणाऱ्या पाच प्रतिष्ठीत व्यापारांविरुध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या  पथकाला काल रात्री हे पाच जण जुगार खेळतांना सापडले. त्यांच्याकडून पथकानं एक लाख ४२ हजार ६० रूपये रोख जप्त केले. आहेत. तसेच मोबाईल, चार मोटारसायकल, आणि इतर असा एकूण ५ लाख ५३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तब्बल नऊ लाख रुपयांचे बोगस बीटी बियाणे जप्त केलं. धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाटा इथं ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे.
****
पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहारातला आरोपी नीरव मोदी याची संपत्ती जप्त करण्यास, मुंबईतल्या विशेष न्यायालयानं मंजूरी दिली आहे. सक्तवसुली संचालनालयाने नीरव मोदीच्या सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीची यादी तयार केली आहे, यामध्ये काही महागडी चित्रं, चारचाकी वाहनं, आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह इतर पक्षकारांकडे तारण म्हणून ठेवलेल्या संपत्तीचा समावेश करण्यात आलेला नाही. या संस्थांना वसुलीसाठी स्वतंत्र दावा करता येणार आहे. ही संपत्ती जप्त करण्याला आक्षेप घेणारी नीरव मोदी याची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. ही संपत्ती आता कायद्यानुसार केंद्र सरकारच्या अधीन असेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...