Wednesday, 10 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 10 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
                                     आकाशवाणी औरंगाबाद             
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र तसंच राज्य सरकारांना निर्देश
** राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत दोन हजार २५९ रुग्णांची वाढ, १२० रुग्णांचा मृत्यू 
** औरंगाबादमध्येही आठ रुग्णांचा मृत्यू तर ८१ नवे रुग्ण
** उस्मानाबादमध्ये १४, लातूर आठ, नांदेड आणि जालन्यात प्रत्येकी तीन तर परभणीत दोन नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण
** वीज क्षेत्रातल्या महानिर्मिती, महापारेषण, महावितरण आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपन्यांना २० हजार कोटी रुपयांची हमी देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
**  यवतमाळ जिल्ह्यातले ज्येष्ठ सर्वोदयी नेते माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचं निधन
** आणि
**  औरंगाबाद शहरातल्या सातारा परिसरात बहीण भावाची गळा चिरुन हत्या, सव्वा किलो सोन्याचीही चोरी
****
राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र तसंच राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या पीठानं काल या संदर्भात घेतलेल्या सुनावणी दरम्यान, स्थलांतरित कामगारांसाठी २४ तासांच्या आत विशेष श्रमिक रेल्वेची व्यवस्था करून, इच्छुक कामगारांना पुढच्या पंधरा दिवसांत त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यास सांगितलं. आपत्ती निवारण कायद्यानुसार ज्या कामगारांविरोधात टाळेबंदीच्या काळात नियमभंगाचे गुन्हे दाखल झाले असतील, त्यांच्याविरोधातले असे गुन्हे मागे घेण्यावरही संबंधित यंत्रणांनी विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं स्वत: दाखल करून घेतलेल्या या याचिकेवरचा निर्णय पाच जून रोजी राखून ठेवला होता, आता या प्रकरणी पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, गेल्या तीन तारखेपर्यंत देशभरात ४ हजार २०० विशेष श्रमिक रेल्वे चालवण्यात आल्या, त्यापैकी महाराष्ट्रातून ८०२ रेल्वे कामगारांना घेऊन देशाच्या विविध भागात गेल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात अजूनही अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांची नोंदणी करुन त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकारनं अधिक सजगतेनं आणि नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. याबाबतीत सरकारच्या धोरणांची आणि अंमलबाजावणी करताना राज्यातल्या यंत्रणांकडून मोठ्या त्रुटी राहिल्या असून सरकारचे दावे फक्त कागदावरच राहिले, त्यामुळे या स्थलांतरित मजुरांचे हाल झाले, या मजुरांसाठी अन्न आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था झाली नाही, असं आलेल्या विविध प्रतिज्ञापत्रांवरुन दिसतं, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
एन -९५ मास्कची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी दर नियंत्रण करणाऱ्या धोरणाचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. अत्यावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण कायद्याची मदत घेऊन ही किंमत ठरवावी, असं न्यायालयानं काल यासंदर्भातल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सांगितलं. राज्य सरकारनंही या मास्कच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केंद्रीय पथकानं केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विविध राज्यातल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी पथकं नेमली असून, या पथकातले अधिकारी आणि राज्यातले प्रभारी कुणाल कुमार यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून औरंगाबाद शहरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्यानं, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्या, लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सोय करावी, त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांची वेळोवेळी माहिती घ्यावी, असे निर्देश कुणाल कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्येनं ९० हजारांचा आकडा पार केला आहे. काल आणखी दोन हजार २५९ रुग्णांची नोंद झाल्यानं राज्यातली एकूण रुग्णसंख्या आता ९० हजार ७८७ झाली आहे. काल या आजारानं १२० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तीन हजार २८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात एक हजार ६६३ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रमा नगरमधला ८३ वर्षीय, युनुस कॉलनीतला ७० वर्षीय, जहागीरदार कॉलनीतला ६५ वर्षीय, जिन्सी परिसरातला ८० वर्षीय, रोशन गेट परिसरातल्या मुजीब कॉलनीतला ६७ वर्षीय, आरेफ कॉलनीतला ५५ वर्षीय, गारखेडा परिसरातला ७३ वर्षीय पुरूष आणि  जाधववाडीतल्या ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. औरंगाबाद इथं आतापर्यंत ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, काल जिल्ह्यात आणखी ८१ बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या दोन हजार १५० झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये गणेश कॉलनी, मोहनलाल नगर या भागात चार, रोशन गेट गारखेडा परिसर, बजाज नगर आणि समता नगर भागात प्रत्येकी तीन, मुकुंदवाडी, हर्सुल परिसर, बंजारा कॉलनी, नूतन कॉलनी, संजय नगर, एसटी कॉलनी, कटकट गेट, त्रिमूर्ती चौक, गादियाविहार, अशोक नगर, मसनतपूर, सिटी चौक या भागातले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. कोहिनूर कॉलनी, नागसेन नगर, उस्मानपुरा, जुन्या मोंढ्यातलं भवानी नगर, मिलकॉर्नर, आसेफिया कॉलनी, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी, जाधववाडी, पेठे नगर -निसर्ग कॉलनी, नारेगाव, हडको एन-११ मयूर नगर, बिस्मिला कॉलनी, एन -आठ सिडको, सिल्लेखाना, कटकट गेट शरीफ कॉलनी, बायजीपुरा, वसंत नगर, पडेगाव, रोहिणी नगर, न्यायनगर, शिवाजी नगर, व्हीआयपी रोड काळीवाडा, युनुस कॉलनी, रवींद्र नगर, दशमेश नगर, अरिहंत नगर, विद्या नगर, एन-फोर गुरुसहानी नगर, अंबिका नगर, एन सहा- सिडको, कैलास नगर, रोकडिया हनुमान कॉलनी, इंदिरा नगर, गादिया विहार, रमा नगर क्रांती चौक, कैसर पार्क, जटवाडा रोड परिसर, या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. पंढरपूर इथंही एक रुग्ण आढळला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २८३ जण बरे होऊन घरी परतले असून, सध्या ७५१ बाधितांवर उपचार सुरु आहेत.
****  
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीतून काल पळून गेलेला कोरोना विषाणू बाधित रुग्णाला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. या रुग्णाला पुन्हा घाटीत दाखल केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. अतिदक्षता विभागातून हा रुग्ण काल सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पसार झाला होता. शहरातल्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहातले दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णही रविवारी रात्री कोविड सुश्रुषा केंद्रातून पळून गेले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल १४ जणांचे अहवाल बाधित असल्याचे प्राप्त झाले आहेत. यापैकी १२ जण हे शहरातल्या उस्मानपुरा भागातले असून यापूर्वीच्या एका रुग्णाच्या संपर्कातले आहेत. दोन जण नळदुर्गचे असून  ते पुण्याहून आलेले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. लातूर शहरातल्या टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर, खाडगाव रोड इथला प्रत्येकी एक रुग्ण, तर लातूर तालुक्यातल्या भिसे वाघोली, औसा तालुक्यातल्या अंधोरी, चाकूर तालुक्यातल्या सुगाव आणि उदगीर शहरातल्या सराफ लाईन इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शाहू नगर इथल्या एका डॉक्टरचाही समावेश आहे. चौफाळा इथली ५० वर्षीय महिला आणि नायगाव तालुक्यातल्या टाकबीड इथल्या ४७ वर्षीय पुरुषाचा अहवालही काल बाधित असा आला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १९५ झाली आहे.
दरम्यान, काल तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत १३४ रुग्ण बरे झाले आहेत. 
****
जालना जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. बाधितांमध्ये आनंदनगर, लक्ष्मीनारायणपुरा, उडपी हॉटेल परिसरातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता २२२ झाली आहे.
दरम्यान, उपचारानंतर कोरोना विषाणू मुक्त झालेल्या तीन रुग्णांना काल घरी सोडण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात काल आणखी दोन रुग्ण कोरोना विषाणूने बाधित आढळले. मानवत तालुक्यातला एक ४४ वर्षीय पुरुष आणि सेलू तालुक्यातली एक ४५ वर्षीय महिला यांच्या घशातल्या स्त्रावाचे नमुने काल बाधित असे आले. दरम्यान, सेलू इथल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबईत काल एक हजार १५ आढळले, तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात २२० नवे  रुग्ण आढळले, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर २२ नवे रुग्ण आढळून आले. पालघर जिल्ह्यात १३, वर्धा जिल्ह्यात आणखी तीन रुग्णांची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात काल १४ बाधित रुग्ण बरे झाले. अहमदनगर जिल्ह्यात आणखी नऊ बाधित रुग्ण आढळले, दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले.
****  
टाळेबंदीच्या  काळात खासगी रुग्णालयं बंद असल्यानं नागरिकांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई- संजीवनी ओपीडी सेवेचा गेल्या महिन्याभरात १ हजार ४०३ रुग्णांनी  लाभ घेतला असून या सेवेसाठी मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यात पूर्णपणे कार्यान्वित झाली असून या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातला एखादा रुग्ण अन्य जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला संगणकाच्या माध्यमातून  घेऊ शकतो.
****
राज्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्याभागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात नविन उद्योग आणताना त्याचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा कोकणातल्या शेती उत्पन्नावर पुढचे दहा वर्ष परिणाम जाणवणार असल्याचं मत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. काल रायगड जिल्ह्याला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आंबा, नारळाच्या नुकसानग्रस्त बागा स्वच्छ करणं आणि या बागा पुन्हा लावणं, हे मोठं आव्हान असल्याचं, पवार म्हणाले.
या दौऱ्यात पवार यांनी काल माणगाव इथं मुख्य बाजारपेठेतल्या नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली.
रायगड जिल्ह्यात काल आणखी दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एक व्यक्ती म्हसळा तालुक्यातली होती, अंगावर झाडं पडल्यानं ती जखमी झाली होती. तर दुसरी व्यक्ती पेण तालुक्यातली होती, मानेला पत्रा लागल्यानं ते जखमी झाले होते. यामुळे रायगड जिल्ह्यात चक्रीवादळानं मृत्यू झालेल्यांची संख्या सहा झाली आहे.
दरम्यान, पवार आज रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
****
वीज क्षेत्रातल्या महानिर्मिती, महापारेषण, महावितरण आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या सूत्रधारी कंपन्यांना निधीची आवश्यकता आहे. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ, ऊर्जा वित्त महामंडळ किंवा राष्ट्रीयकृत बँका आणि वित्तीय संस्था यांच्याशी करण्यात येणाऱ्या विविध करारास शासन हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल. कोरोना विषाणु आणि टाळेबंदीमुळे राज्यातले सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता घरी असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांकडून विजेचा जास्त वापर झाला. परिणामी औद्योगिक ग्राहकांची विजेची मागणी कमी झाली त्यामुळे विजेच्या क्षेत्रातल्या कंपन्यांची रोकडसुलभता घटली. त्यामुळे या कंपन्यांनाही शासन हमीच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
****
लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद आणि परभणी इथल्या कौंटुंबिक न्यायालयांना पुढचे पाच वर्ष मंजुरी देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या न्यायालयांकरता पुढच्या पाच वर्षांसाठी ३३ कोटी ६० लाख इतक्या खर्चासही मंजुरी दिली आहे. 
कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली. यामध्ये औरंगाबाद आणि नागपूर इथल्या एक तर मुंबईतल्या दोन कला महाविद्यालयांचा समावेश आहे.
****
पर्यावरण विभागाच्या नावात बदल करून ते आता पर्यावरण आणि वातावरणीय विभाग असे करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पर्यावरण विभागामध्ये वातावरणातल्या बदलांशी निगडीत कामं पार पाडण्यासाठी हवामान परीवर्तनशी संबंधित राज्य ज्ञान व्यवस्थापन केंद्र -स्टेट नॉलेज मॅनेजमेंट सेंटर ऑन क्लायमेट चेंज हा कक्ष मदत करत असून हा विषय पर्यावरण विभागाचा अविभाज्य घटक आहे.  यातील कामाचा आवाका यापुढे वाढत जाणार असून जनमाणसांमध्येही जागरुकता वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आता. 
औरंगाबाद इथं मद्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी विदेशी मद्याचा सुमारे २५ हजार रुपयांचा साठा जप्त केला. संतोष बन्सवाल आणि नरेंद्र बरतुने अशी या दोघांची नावं असून, त्यांच्याविरोधात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राज्यातल्या वकीलांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याची मागणी लातूर जिल्ह्यातल्या वकीलांनी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेकडे केली आहे. न्यायालयानं कामकाज सुरु झालं असून, वकीलांना दररोज न्यायालयात येऊन, अनेकांच्या उपस्थितीत काम करावं लागतं, त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता वकीलांनाही विमा संरक्षण मिळावं, असं वकीलांच्या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
टाळेबंदीच्या कालावधीत उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या संकटात सापडलेल्या या व्यापाऱ्यांचं गाळाभाडं, व्यवसाय कर, वीज बिल माफ करावं यासह अन्य मागण्या जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी उद्योगवाहिनी ठरणाऱ्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचं काम त्वरीत सुरू करावं, अशी महत्त्वपूर्ण मागणीही व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 
****
परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी काल शहरातल्या प्रभाग क्रमांक चार इथं कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शिबिर घेतलं. या शिबीरास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दहा हजारांहून अधिक नागरिकांना औषधीचं आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. कालपासून या शिबिराला सुरूवात झाली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीनं टाळेबंदीच्या काळात शंभर गरजू कुटुंबाना किराणा किटचं वाटप करण्यात आलं. आतापर्यंत एक हजार ३३० जणांना डबे वाटप आणि एक हजार कुटुंबाना किराणा किटचं जिल्ह्यात वाटप झाल्याचं जिल्हा अध्यक्ष डॉ किशोर रत्नपारखी यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासह प्रभावी उपाय योजनाच्या अंमलबजावणीत राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या प्रथम वर्षपूर्ती निमित्तानं आणि भाजपाच्या कामकाजासंदर्भात माहिती देण्यासाठी काल परभणी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्र आघाडीवर आहे. या गोष्टीस राज्य सरकारचे अपयशच कारणीभूत असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षापासून अनेक लोककल्याणकारी अनेक योजना राबवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या पेठशिवणी इथं लोकसहभागातून लेंडी नदीवरच्या पुलाचं बांधकाम करण्यात येत आहे. सेवानिवृत्त अभियंता के एस शेटे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या कामामुळे ८४ शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

लेंडी नदीला पुर आल्यावर पेठशिवणी इथंल्या ८४ शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचा मार्ग बंद होत असे पावसाळ्यातील नेहमीची समस्या सोडविण्यासाठी अभियंता शेटे
यांनी पुढाकार घेतला लोकसहभागातून आणि श्रमदानातून शेतकऱ्यांच्या मदतीने केलेले सुरु केलेले पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे शेतकऱ्यांच्या शेतीला पावसाळ्यातील जाण्याचा मार्ग कायम स्वरुपी मोकळा झाला.
आकाशवाणी बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
ज्येष्ठ सर्वोदयी नेते यवतमाळ जिल्ह्याचे माजी खासदार आणि आमदार सदाशिवराव ठाकरे यांचं काल निधन झालं, ते ९७ वर्षांचे होते. खासदार तसंच आमदार यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अनेक वर्षे जिल्हा काँग्रेस मितीचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. ठाकरे यांनी जिल्ह्यात सपत्नीक भूदान पदयात्रा करून विदर्भात सर्वाधिक जमिनीचं दान मिळवलं होतं.
****
औरंगाबाद शहरातल्या सातारा परिसरात राहणाऱ्या बहीण भावाची काल गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं. १९ वर्षीय किरण राजपूत आणि १७ वर्षीय सौरभ राजपूत अशी मृतांची नावं आहेत. या दोघांची हत्या करुन घरातून सव्वा किलो सोनं आणि दहा हजार रुपये पळवण्यात आल्याचं पोलिसांनी सागितलं.
****
औरंगाबाद- मुंबई महामार्गावर साजापूर इथल्या पेट्रोल पंपासमोर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वाळूज परिसरातल्या साईनगर इथले विठ्ठल गोडसे यांचा समावेश आहे. काल रात्री हा अपघात झाला.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरातल्या गजानन डापलवार या १९ वर्षीय तरुणाचा काल विहिरीत बुडून मृत्यू झाला. मित्रांबरोबर तो काल सकाळी पोहण्यासाठी गेला होता.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव शहरात काल दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातला वीज पुरवठा खंडीत झाला होता.
****
परभणी शहरात मध्यवस्तीतल्या व्यापारी संघटनेच्या इमारतीच्या आवारात जुगार खेळणाऱ्या पाच प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांविरुध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री हे पाच जण जुगार खेळतांना सापडले होते. त्यांच्याकडून एक लाख ४२ हजार ६० रूपये रोख पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच मोबाईल, चार मोटारसायकल, आणि इतर असा एकूण ५ लाख ५३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
जालना जिल्ह्यात बदनापूर इथं कृषी कार्यालयात कार्यरत कृषी सहायक चंद्रशेखर काकडे याला चार हजार रुपये लाच घेताना काल अटक करण्यात आली. फळबाग लागवडीसाठी मंजूर रकमेचा धनादेश देण्यासाठी काकडे यानं तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती, यापैकी चार हजार रुपये घेताना, त्याला बदनापूर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून अटक करण्यात आली.
****
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिड कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणाची लेखा परीक्षकामार्फत चौकशी करण्यात येईल, असं जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितलं. कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळानं जिल्हा उपनिबंधकाच्या संगनमतानं गरजूंना किट्स, सॅनिटायझर वाटप आणि फवारणीच्या नावाखाली दीड कोटी रुपये हपल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी केला आहे. यावर बोलताना सुरवसे यांनी, चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं.  
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...