आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१० जून
२०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
एकशे चौदा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोना विषाणू बाधितांची
संख्या आता २ हजार दोनशे चौसष्ठ झाली आहे. यापैकी १ हजार दोनशे त्र्याऐंशी कोरोना विषाणू
बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ११६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी
८ जणांचा काल मृत्यू झाला. औरंगाबाद मध्ये सध्या ८६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
सांगली जिल्ह्यातल्या गोटखिंडीमध्ये
बोगस सातबारा उतारे जोडून कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, सांगलीचे
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अन्यत्र कोठे असा प्रकार
झाला आहे का, याचीही चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
गोटखिंडी इथल्या नऊ जणांच्या
नावावर गावात ७-१२ नाही. मात्र त्यांच्या बँक खात्यात शेतकरी कर्जमाफीची रक्कम जमा
झाली. हे सर्वजण शेतीशी संबंधित नसतानाही त्यांच्या खात्यात इतक्या मोठ्या रकमा कशा
जमा झाल्या, असा प्रश्न गावातल्या शेतकऱ्यांनी
उपस्थित केला आहे.
****
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या
कुलाबा-वांद्रे-सिप्झ भुयारी रेल्वे रुळांचा पहिला संच मुंबईत दाखल झाला आहे. जपानच्या
यावाटामधून मित्सुई कंपनीकडून हा रूळांचा संच सागरी मार्गानं मुंबईत आणण्यात आला.
‘रूळ यंत्रणा उच्च प्रतीची आणि अत्यल्प कंपनं देणारी असून भारतात ही यंत्रणा प्रथमच
वापरण्यात येत आहे. मुंबईतल्या प्राचीन वास्तूंना इजा न पोहोचण्याच्या दृष्टीनंही ही
यंत्रणा उपयुक्त आहे.
****
सरकार कोकणाला सापत्नपणाची
वागणूक देत असून निसर्ग चक़ीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी
असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर
यांनी माणगाव आणि श्रीवर्धन इथल्या नुकसानाची काल पाहणी केली. त्यावेळी बोलताना दरेकर
यांनी नुकसानग्रस्तांना तातडीनं १५ हजार रूपयांची मदत दोन दिवसात द्यावी अन्यथा आम्हाला
टोकाचं पाऊल उचलावे लागेल असा इशारा दिला.
****
नांदेड शहरात कोरोना विषाणू
प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचं पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूध्द गेल्या दोन दिवसात
महानगरपालिकेनं ७२ हजार ४०० रूपये दंड आकारला आहे. महापालिकेच्या सहा पथकांनी ही कारवाई
केली.
****
No comments:
Post a Comment