Monday, 15 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 15 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
                                     आकाशवाणी औरंगाबाद             
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात औद्योगिक गुंतवणीकीसंदर्भातल्या बारा सामंजस्य करारांवर आज स्वाक्षऱ्या
** येत्या नोव्हेंबरमध्ये देशात कोविड-19चा संसर्ग सर्वाधिक होण्याची शक्यता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून व्यक्त
** राज्यात आणखी तीन हजार ३९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १२० जणांचा मृत्यू
** औरंगाबादमध्ये सात रुग्णांचा मृत्यू तर १३० नवे रुग्ण, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ
** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ, पेट्रोल ६५ पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर ६४ पैशांनी वाढलं
** हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या
** आणि
** नाशिकचे माजी खासदार माधवराव पाटील तसंच सोलापूरचे माजी आमदार युनुस शेख यांचं निधन
****
राज्यात उद्योगांना चालना देत अर्थचक्र गतिमान करण्यासाठीच्या  ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र- २’ अभियानातर्गंत आज औद्योगिक गुंतवणीकीसंदर्भातल्या बारा सामंजस्य करार मुंबईत केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत यावर स्वाक्षऱ्या होणार असून उद्योग मंत्री सुभाष देसाई , उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरेंसह प्रशासकीय अधिकारी   यावेळी उपस्थिती असणार आहेत. जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक, प्रमुख देशांचे राजदूत आणि द्विपक्षीय गुंतवणूक संस्था यांसोबत दूर दृश्य प्रणालीवरील विशेष संवाद सत्रात सहभागी होतील.
अभियांत्रिकी, वाहन-वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया यासह  अन्य क्षेत्रात अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूरसह देशातले मोठे  उद्योग यातून  गुंतवणूक करणार आहेत.
****
कोविड-19चा फैलाव भारतात येत्या नोव्हेंबरच्या मध्यावर शिगेला पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. टाळेबंदीमुळे कोविड फैलावाला काहीशी खीळ बसली असून, त्याचा शिगेला पोहोचण्याचा काळ सुमारे आठ आठवड्यांनी पुढे गेला असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं नेमलेल्या संशोधन पथकाच्या अभ्यासात दिसून आलं आहे. टाळेबंदीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग ६९ ते ९७ टक्के रोखला गेला आणि त्यामुळे आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी पुरेसा अवकाश मिळाला, असं अहवालात नमूद केलं आहे.
कोविड-19 चा मृत्युदरही आटोक्यात राहिला असून, यापुढे या संकटाशी सामना करण्याच्या दृष्टीनं आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर देणारं सर्वंकष धोरण आवश्यक असल्याचं या पथकानं म्हटलं आहे.
देशात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात आल्या असून, सध्या ९५८ कोविड रुग्णालयं, दोन हजार ३१३ कोविड आरोग्यकेंद्र त्याचप्रमाणे दहा हजार ७४८ अतिदक्षता खाटा आणि ४६ हजार ६३५ ऑक्सिजनसुविधा असलेल्या खाटा उपलब्ध असल्याचं अलिकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा दर सहा पूर्णांक दोन दशांश टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता देशाच्या अर्थव्यवस्थेवर या महामारीमुळे होणाऱ्या परिणामांबद्दलच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
****
देशातला कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर गेला आहे. काल एका दिवसात आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ३७८ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. सध्या देशात एक लाख ४९ हजार ३४८ जणांवर उपचार सुरू आहेत.
भारतीय औषध संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्याच्या क्षमतेतही वाढ केली आहे. या चाचण्या करण्याची परवानगी मिळालेल्या शासकीय प्रयोगशाळांची संख्या ६४६, तर खासगी प्रयोगशाळांची संख्या २४७ वर गेली आहे. काल एका दिवसात एक लाख ५१ हजारांहून अधिक जणांचे नमुने तपासण्यात आल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी तीन हजार ३९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या एक लाख सात हजार ९५८ झाली आहे. तर काल या आजारानं १२० जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तीन हजार ९५० कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबाद शहरात काल सात बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये मयूर नगरधली ७१ वर्षीय पुरूष, रहेमानिया कॉलनीतला ५० वर्षीय पुरूष, रोशन गेट भागातल्या बारी कॉलनीमधील एक ६२ वर्षीय महिला आणि ५२ वर्षाचा पुरूष, जहांगीर कॉलनीतला ५५ वर्षीय पुरूष, सिडकोतल्या एन सहामधल्या साई नगरमधला ५८ वर्षीय आणि रेल्वे स्टेशन परिसरातल्या सिल्क मिल कॉलनीतल्या ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, काल जिल्ह्यात काल दिवसभरात १३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या दोन हजार ७५६ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये ८० रुग्ण शहरी भागातले ५० रुग्ण ग्रामीण भागातले आहेत.
ग्रामीण भागात बजाज नगर मध्ये १५, पंढरपूर मधल्या सलामपूर इथं ११ तर गणेशनगरमध्ये एक, फुले नगरमध्ये चार, वाळूजमधल्या बकलवाल नगर, अज्वानगरमध्ये प्रत्येकी दोन, सिडको वाळूज आणि वाळूज गावात प्रत्येकी एक, वळदगावमध्ये एक, कमलापूर साईसमृद्धीनगरमध्ये दोन, कन्नडमध्ये पाच, सिल्लोडच्या शाहूनगरमध्ये एक, वैजापूरच्या मुस्तफा पार्कमध्ये एक,  दुधडला एक, तर वडगाव कोल्हाटी मध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५०२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १५० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, काल जिल्ह्यात आणखी तीन नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये एक तुळजापूरचा तर दुसरा तामलवाडीचा आहे, तिसरा रुग्ण हा लोहारा तालुक्यातल्या फनेपूरचा आहे. हे तिघेही अनुक्रमे मुंबई, सोलापूर आणि पुण्याहून आलेले आहेत.  एकूण रुग्णांची संख्या १४७ असून, एकशे चार जण बरे झाले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये भुसार लाईन, मोती नगर आणि सरस्वती कॉलनीतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 
****
नांदेड जिल्ह्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १७७ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. हे तिघेही सेनगाव इथल्या विलगीकरण कक्षात दाखल होते. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २२८ झाली आहे. त्यापैकी १८६ रुग्ण बरे झाले असून, सध्या ४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्हा रुग्णालयासह मंठा इथल्या कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या १५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना काल बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १६५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या बाधित ९६ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आतापर्यंत आठ जणांचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या विलगीकरणाच्या नियमांचं पालन न करणाऱ्या सात जणांविरूद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादहून आलेल्या पाच जणांना प्रशासनानं विलगीकरणात राहण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी एका लग्न समारंभाला हजेरी लावली, पाहुण्यांचं आदरातिथ्यंही केलं, एवढेचं नव्हे तर शहरातल्या एका बँक आणि दस्ताऐवज नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन खरेदी विक्रीचे व्यवहारही केले. दरम्यान त्यांचे लाळेचे नमुने बाधित असल्याचे आढळून आले.  विलगीकरणात न राहिल्यामुळे आता या सर्वांच्या संपर्कात आलेल्या जवळपास दिडशे व्यक्तीना शोधावे लागले असून यातील काही जणांचे लाळेचे नमुने हे तपासणीस पाठवण्यात आले आहेत.
****
अकोला जिल्ह्यात काल पाच जणांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तर बारा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. अकोल्यात गेल्या आठ दिवसांत १७ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक हजार सात झाली आहे. तर मृतांचा आकडा एकावन्नवर पोहोचला आहे. सध्या अकोल्यात ३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
अमरावती इथं काल आणखी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३३३ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्यानं २३७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या ६६ रुग्ण उपचार घेत आहेत. अमरावतीमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथल्या चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं काल स्पष्ट झालं. हे सर्वजण अमरावती इथल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातले आहेत. वाशिम जिल्ह्यात सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
सांगली जिल्ह्यात काल आणखी २० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २४२ झाली आहे.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग आठव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलिटर ६५ पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर ६४ पैशांनी वाढलं आहे. गेल्या आठ दिवसात पेट्रोलच्या दरात चार रुपये ५२ पैशांनी तर डिझेलच्या दरात चार रुपये ६४ पैशानी वाढ झाली आहे. जून २०१७ पासून दररोज आढावा घेण्याची पद्धत सुरू झाल्यानंतर प्रथमच एका दिवसात पेट्रोलच्या दरात सर्वाधिक ६५ आणि डिझेलचा दरात  ६४ पैशांची वाढ झाली.
****
मुंबईमध्ये आजपासून अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक उपनगरीय  रेल्वे  परिवहन  - लोकल रेल्वे सेवेला प्रारंभ होत आहे. खाजगी, सरकारी तसंच आरोग्य सेवेतले कर्मचारीच फक्त यातून प्रवास करु शकणार आहेत. यासाठी क्यु आर कोड आधारित ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर फक्त जलद थांबे घेत सकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरा या वेळेत ही लोकल धावणार आहे. टाळेबंदीच्या ८६ दिवसांनी ही सेवा सुरु होत आहे.
****
भारत-पाकिस्तान सीमेच्या जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून एक जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजार ४७ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यात मार्च महिन्यात सर्वाधिक ४११ वेळा पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. संरक्षण दलांच्या विश्लेषणानुसार, गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढलं आहे. काश्मीरच्या नियंत्रण रेषेलगत असलेल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांवर दीडशे ते अडीचशे दहशतवादी, तर जम्मू परिसरातली आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगतच्या तळांवर सव्वाशे ते दीडशे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे. या घुसखोरांना वाट मोकळी करून देण्यासाठीच पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात असल्याचं सुरक्षा दलांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी,‘मन की बात ’या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून येत्या २८ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. कोविड-१९चा सामना करण्यासह अन्य विषयांवर सांगण्यासारख्या नव्या कल्पना, सूचना पाठवून जास्तीत जास्त जणांनी यात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. यासाठी नागरिकांना एक आठ शुन्य शुन्य अकरा सात आठ सुन्य शुन्य या मोफत दूरध्वनी क्रमांकावर  किंवा नमो भ्रमणध्वनी ॲपद्वारे तसंच माय जीओव्ही ओपन फोरमचा वापर करता येईल.
****
नैऋत्य मोसमी पाऊस काल संपूर्ण राज्यभरात पोहोचला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
परभणी शहरासह पालम, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा तालुक्यात आणि परिसरात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला असून काही नदीपात्रात पाणी भरलं आहे.
गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या मानवत ते आंबेगांव रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हिंगोली -सेनगाव रोडवरील गोमती नदीवरचा पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.
नाशिक परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नांदूर-मधमेश्वर धरणातून काल दुपारी गोदावरी नदीपात्रात सहा हजार चारशे छप्पन्न घनफूट प्रतिसेकंद इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला असून, पावसाची वार्षिक सरासरी आठ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळामुळे नुकसानही झालं आहे. या पावसामुळे मलकापूर शहरात मोठं नुकसान झालं आहे. शहराचा विद्युत पुरवठा त्यामुळे खंडीत झाला असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मलकापूर तालुक्यतल्या जांभूळ धाबा इथला एक शेतकरी पावसादरम्यान नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. धाड भागात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
बुलडाणा शहरानजीक चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलवड नजीक पैनगंगा नदीवरील पुलाचं काम सुरू असल्यानं नदीपात्रात उभारलेला पर्यायी कच्चा पूल रात्री पडलेल्या पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा-धाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी काल अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या गोळेगाव, उंडणगाव, अंभई आणि अजिंठा मंडळातल्या विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये शेतकऱ्यांचे ठिबक संच, नदीकाठच्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेले मिरची आणि अद्रक पीक वाहून गेले. घरांची पडझड झाली. बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेले असल्यामुळे त्वरित पंचनामे होणे गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं काल मुंबईत वांद्रे इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ३४ वर्षीय सुशांतनं छोट्या पडद्यावरील मालिकांमधून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. २०१३ साली ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. याशिवाय, एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, राबता, छिछोरे, पीके, शुद्ध देसी रोमान्स्, डिटेक्टीव ब्योमकेश बक्षी अशा चित्रपटांतही त्यानं काम केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी सुशांत प्रसिद्ध होता.
****
प्रख्यात नाट्यकर्मी आणि दिग्दर्शक प्राध्यापक केशव देशपांडे यांचं बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं काल निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातले रहिवासी असलेल्या प्राध्यापक देशपांडे यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे पहिले विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम पाहिलं. अंबाजोगाई शहराची नाट्यसंस्कृती जोपासण्यात आणि वृध्दींगत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
****
नाशिकचे माजी खासदार आणि जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव बळवंतराव पाटील यांचं काल मूत्रपिंडाच्या विकारामुळे नाशिक इथं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. गेली ४० वर्षे ते जनलक्ष्मी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम पाहत होते. १९९५ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी शिखर बँकेचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं.
****
सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचं काल सकाळी निधन झालं. ते ऐंशी वर्षांचे होते. तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. १९९० झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले.
****
बीड जिल्ह्यात रायमोह ते शिरूर कासार रस्त्यावच्या ताकडगाव फाट्यावर काल रात्री जीप आणि कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. अपघातात मृत झालेले प्रशांत कुलकर्णी हे लोणी इथल्या शाळेत शिक्षक होते. तसंच , सध्या कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सुरू असलेल्या मानूर तपासणी नाक्यावर कार्यरत होते. काम आटोपल्यानंतर गावी जातांना ही दुर्घटना घडली. 
****
पैठणच्या जायकवाडी जलाशयातून औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीवरील फारोळा पंपगृहाचा वीज पुरवठा काल सकाळपासून सात तास बंद होता. महावितरणनं दुरुस्तीच्या कारणास्तव हा विद्युत पुरवठा बंद ठेवल्यामुळे शहर आणि सिडकोच्या पाणी वितरणावर परिणाम होणार असल्याचं महापालिकेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
जागतिक रक्तदान दिनानिमित्त काल लातूर इथं दिव्यांगांनी रक्तदान केलं. दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या सक्षम संस्था, केंद्र सरकारच्या सामजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. अकोला शहरातही दोन ठिकाणी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं घेतलेल्या शिबीराला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी काल रक्तदान केलं.
****
लातूर महापालिकेचा अखर्चित राहिलेला १५ कोटी रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च करण्याकरता मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी म्हटलं आहे. २०१७-१८ या वर्षासाठी मूलभूत सोयी सुविधा विकास योजनांतर्गत १० कोटी रुपये, तसंच विशेष रस्ता अनुदान योजनेत पाच कोटी रुपयांचा निधी लातूर शहर महानगरपालिकेला मिळाला होता. मात्र तत्कालीन परिस्थितीत निर्णयाच्या अभावामुळे हा निधी अखर्चित राहिलेला होता. दोन वर्ष उलटूनही निधी खर्च न झाल्यानं राज्य शासनानं हा निधी वापराकरिता स्थगिती दिली होती.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे कोर्टा आणि चोंडी गावाजवळ पावसाचं पाणी अडून सोयाबीन आणि हळद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली आहे. तसंच, हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना या भागातील पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
लातूर शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिऑपॅथिक गोळ्यांच्या वाटपाला काल पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर इथं महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेकडून शहरातल्या पत्रकारांना अर्सेनिक अल्बम ३० या औषधाचं वाटप करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या वालूर इथं विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख ५१ हजार ९५२ रुपयाचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल उदगीर तालुक्यात शेती बांधांवर प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. खरीप पेरणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळेत बियाणे आणि खते प्रशासनानं उपलब्ध  करून द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक होऊ नये असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. 
****
परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या हमदापूर इथं स्वावलंबी भारत अभियान प्रेरित ग्रामविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत मंजूर विहीर खोदकामास प्रारंभ करण्यात आला. यामुळे बेरोजगार मजुरांना काम मिळालं आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...