Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 June
2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १५ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात कोरोना विषाणूच्या
संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. ही टक्केवारी आता ५१ टक्के असल्याची
माहिती आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयानं दिली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले
सुमारे १ लाख ७० हजार रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमधे ७ हजार ४१९ रुग्ण
यातून बरे झाले आहेत. देशात यावर उपचार घेत असलेल्यांची संख्या १ लाख ५३ हजार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
५० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये १८ महिला
आणि ३२ पुरूष रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार
८०६ झाली आहे. यापैकी १ हजार ५०२ रुग्णांची तब्येत सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं असून १ हजार १५४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत १५० जणांचा उपचारांदरम्यान
मृत्यू झाल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये आंबेडकर नगर इथं
६, अंबिका नगर इथं ५, दुधड, गल्ली क्रमांक ४, गजानन नगर इथं प्रत्येकी ४ नवे रुग्ण
आढळले असल्याची माहितीही प्रशासनानं दिली आहे.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचे
१४ नवे रूग्ण आज आढळले आहेत. यामधे मुंबईहून परतलेले राज्य राखीव दलाचे चार पोलीस कर्मचारी,
शहरातल्या भाग्यनगर परिसरातील दोन, कादराबाद भागातील तीन रुग्ण आहेत. वाल्मिकनगर, शंकरनगर,
समर्थनगर इथं तसंच अंबड शहरातील मदिना चौक परिसरात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे.
भाग्यनगरमधल्या बाधितांमधील एकजण जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात
कार्यरत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. जालना
जिल्ह्यात कोरोना विषाणू रुग्णसंख्या आता २९१ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज कोरोना
विषाणूचे नवे ६ रूग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये शहरातील बरकतपुरा इथला एक ३२ वर्षीय
तरूण तसंच मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी इथले ३ पुरूष आणि मुखेड शहरातील दोन महिलांचा
समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाविषाणू
बाधित रुग्णांची संख्या २६२ झाली आहे. आता पर्यत १७७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून
७२ रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत १३ रूग्णांचा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
चंद्रपूर जिल्हयात कोरोना
विषाणूचे ३ नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्हातील या रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. आतापर्यत
२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून २३ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात आज सकाळी
कोरोना विषाणूचे नवे बारा रुग्ण आढळल्यानं या रुग्णांची संख्या एक हजार ९८५ झाली आहे.
सर्व नवे रुग्ण मालेगाव शहरातील आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी ८८७ मालेगांवचे
तर ६७३ रुग्ण नाशिक शहरातील असून उर्वरित भागातील ३५३ रुग्ण आहेत. जिल्ह्याबाहेरून
आलेल्या ७२ रुग्णांवरही नाशिकच्या रुग्णालयांमधे उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनानं
दिली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे वीस आहे.
****
धुळे शहरातील शासकीय वैद्यकीय
महाविदयालय आणि रुग्णालयात काल रात्री ७० वर्षीय पुरुषाचा कोरोनाविषाणू संसर्गामुळे
मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत
याचा श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झालं आहे. तीन डॉक्टरांच्या
समितीनं या संदर्भातील अहवाल वांद्रे पोलिसांना सादर केला आहे. सुशांतसिंह राजपूत यानं
काल मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या पार्थीव देहावर
आज मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
अमरावती जिल्ह्यात या वर्षी
मागील वर्षाच्या तुलनेत पहिल्या पाच महिन्यांमधे शेतकरी आत्महत्यांमधे घट झाली आहे.
गेल्या वर्षी ३१ मे पर्यंत एकशे पाच आत्महत्यांची नोंद झाली होती तर यंदाच्या पाच महिन्यांत
८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. या पैकी फक्त
७ शेतकऱ्यांच्या परिवाराला शासनाची आर्थिक मदत मिळाली आहे तर चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अपात्र ठरल्या असून ७० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चौकशी प्रलंबित असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्यावर
गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात
उपचार सुरू होते.
****
No comments:
Post a Comment