Tuesday, 16 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 16 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16   June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
                             आकाशवाणी   औरंगाबाद             
प्रादेशिक   बातम्या
दिनांक  – १६ जून   २०२०   सकाळी   ७.१०   मि.
****
** राज्यातल्या शाळा टप्प्या-टप्प्यानं सुरु करायला राज्य सरकारची मान्यता; १ जुलैपासून शाळा सुरू होणार
** ऑनलाईन आणि डिजीटल शिक्षण पद्धतीचे पथदर्शी प्रकल्प तातडीनं राबवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
** उद्योग क्षेत्रात १६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे विविध सामंजस्य करार
** राज्यात काल आणखी दोन हजार ७८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १७८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
** औरंगाबादमध्येही आठ रुग्णांचा मृत्यू तर ६९ नवे रुग्ण, लातूर, जालना नांदेड आणि बीडमध्येही रुग्णांच्या संख्येत वाढ
** पेट्रोलच्या दरात काल सलग नवव्या दिवशी ४८ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २३ पैशांची वृद्धी
** आणि
** ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ लीला पाटील, पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक- नाटककार यशवंत रांजणकर आणि दिग्दर्शक कांचन नायक यांचं निधन
****
राज्यातल्या शाळा टप्प्या-टप्प्यानं सुरु करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मान्यता दिली. त्यानुसार कालपासून राज्यातलं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसंच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण पद्धतीच्या अवलंबाचे पथदर्शी प्रकल्प तातडीनं राबवण्यास सुरूवात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला निर्णय जाहीर केला. ‘शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या, तरी शिक्षण सुरु झालं पाहिजे’ या विधानाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
कोरोना विषाणुचे रुग्ण नसलेल्या भागात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून, तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून, आणि पहिली तसंच दुसरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनं सुरू करण्याचे आणि अकरावीचे वर्ग पुढील महिन्यात दहावीच्या निकालानंतर सुरु करण्यात यावेत, असं शिक्षण विभागानं यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय केली जाईल, शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा घेतली जाईल, गावातली कोविड प्रतिबंध समिती तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग प्राधान्यानं करून घेण्याची विनंती केली. यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण लगेच बोलून ही माध्यमं देखील उपलब्ध करून घेतली जातील असं  मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पहिली-दुसरीच्या मुलांना ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. मात्र तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास आणि पुढच्या वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचं नियोजन आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. वर्गात कमी मुलं बसवणं, व्हॉटसऍप ग्रुप्सवरून शिक्षकांनी मुलांचं शंका समाधान करणं, एक दिवसाआड शाळा तसंच  सम-विषम पर्यायावर देखील बैठकीत विचार करण्यात आला.
****
राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीचे १६ हजार ३० कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार काल करण्यात आले, त्याचबरोबर मॅग्नेटीक महाराष्ट्र- दोन चा शुभारंभही झाला.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती यांचा ऑनलाईन सहभाग असलेल्या दृकश्राव्य बैठकीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांसह काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. राज्यात येणाऱ्या लहान-मोठ्या उद्योगांना स्थापन करण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ही गुंतवणूक केली जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आज दुपारी तीन वाजता २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तर उद्या दुपारी तीन वाजता महाराष्ट्रासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत.
****
कोविड -१९चा जास्त प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात, ‘स्टँडर्ड क्यू कोविड-१९’, या जलदगती चाचणीच्या पर्यायाचा वापर करण्याची शिफारस, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं केली, यासाठी नवी तपासणी उपकरणंही उपलब्ध झाली आहेत. या जलदगती चाचणीत केवळ नाकातला स्त्राव घेऊन बाधित रुग्ण शोधता येईल. या चाचणीत ज्या रग्णांचे अहवाल नकारात्मक येतील त्याच रुग्णांची फक्त आर.टी.पी.सी.आर. ही अतिरिक्त चाचणी करण्याची आवश्यकता राहील.
दरम्यान, देशात कोविड-१९ चा प्रादुर्भाव येत्या नोव्हेंबरमध्ये शिगेला पोहचण्याच्या वृत्ताचं, भारतीय वैद्यक संशोधन परिषद -आय.सी.एम. आर. नं खंडन केलं आहे. संबंधित वृत्तात आय.सी.एम. आर.च्या अभ्यासाचा हवाला देण्यात आला होता. मात्र तो आय.सी.एम.आर.चा अधिकृत निष्कर्ष नसल्याचं, परिषदेनं ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ७८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख १० हजार ७४४ इतकी झाली आहे. काल या आजारानं १७८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतल्या ६८ जणांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत चार हजार १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात पाच हजार ७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ५० हजार ५५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद शहरात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये सिडको एन सहा मधली ९० वर्षीय महिला, मन्सुरी कॉलनीतला ६० वर्षीय पुरूष,  रोशनगेट भागातला ५६ वर्षीय पुरूष, शिवशंकर कॉलनीतली ७० वर्षीय महिला, बायजीपुऱ्यातला ७६ वर्षीय पुरूष, रहीमनगरमधील ४० वर्षीय महिला, आसेफिया कॉलनीतला ४७ वर्षीय आणि जुना बाजार भागातल्या ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात या आजारानं १५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
     दरम्यान, जिल्ह्यात काल एकूण ६९ रुग्ण आढळले, यामध्ये ५९ रुग्ण औरंगाबाद शहरातले तर नऊ रुग्ण हे ग्रामीण भागातले आहेत. यात दुधड चार, बजाजनगरमध्ये दोन तर वाळूज, सोयगाव, पळशी आणि तुर्काबाद खराडीमध्यल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या दोन हजार ८२५ झाली आहे. यापैकी  एक हजार ५४९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी सहा उदगीरमधले आणि एक रुग्ण लातूर शहरातला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १९८ झाली आहे. दरम्यान, खाडगाव रोड इथल्या बाधित रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.  
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे चौदा रुग्ण आढळले. यात शहरातल्या भाग्यनगर परिसरात दोन रुग्ण आढळले असल्यामुळं या भागाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये नऊ जण मुखेड इथले तर एक जण नांदेड शहरातल्या बरकतपुरा इथला आहे. नांदेड जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या २६६ झाली आहे. यापैकी १८० रूग्ण बरे झाले असून, सध्या ७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू संदर्भात जनतेनं अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केलं आहे. नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. शहरातल्या झमझम कॉलनी आणि मसरत नगर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. बीड जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ९० झाली आहे.
****
हिंगोलीत सहा बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना काल घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात एकूण २२८ पैकी १९२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
अमरावती जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यवतमाळ जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.  सोलापूरमध्ये १६ रुग्ण वाढल्यानं जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे. नाशिक शहरात काल सात रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे ६५ रुग्ण आढळले. पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे ११ रुग्ण आढळले आहेत. सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात ६ नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या २५३ झाली आहे.  सातारा जिल्ह्यात सात, रत्नागिरी जिल्ह्यात १३, नंदुरबार जिल्ह्यात ६, रायगड जिल्ह्यात ६३, गोंदिया जिल्ह्यात चौदा नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
****
कोरोना विषाणूबाधित रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या सोलापूरच्या चिडगुपकर हॉस्पि टलमधल्या आठ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड -19 संनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी ही माहिती दिली.
****
राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात आलेल्या दहावी- बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख  अद्याप जाहीर झाली नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. याबाबत विविध समाजिक मध्यमांवर प्रसारित होत असलेले  संदेश खोटे असल्यानं त्यावर विश्वास ठेऊ नये असही मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. काल पेट्रोलच्या दरात लिटरमागे ४८ पैशांनी तर डिझेलच्या दरात लिटरमागे २३ पैशांची वाढ झाली आहे.
****
मराठवाड्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारी मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु होती.

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि बदनापूर तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या नांजा, जैनपूर कोठारा, तांदुळवाडी, सुभानपूर, मालखेडा, आव्हाणा, पेरजापूर, सेलू, पारध, राजूर, सिपोरा बाजार जवखेडा, हसनाबाद या भागात दीड तास पाऊस झाल्यामुळे शेतांमधून पाणी वाहिलं. बदनापूर परिसरातून वाहणाऱ्या दुधना नदीला पूर आला होता. तालुक्यातल्या सोमठाणा, पीरवाडी, डावरगाव, भराडखेडा, राजेवाडी, केळीगव्हाण या भागातही दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील मणापुर शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांनी लागवड केलेली बी बियाणे वाहून  गेलं आहे. या प्रकरणी शासनानं तातडीने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी साचले तर नाले भरून वाहू लागले आहेत. मानवत तालुक्यातल्या माडेवडगाव इथं नाल्याच्या पुरात मुरलीधर शेळके आणि पंकजा शेळके हे दोघे वाहून गेले. काल संध्याकाळी ही घटना घडल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनी सांगितलं.

नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मुखेड, हदगाव या तालुक्यात चांगला पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यात काल सरासरी ५ पूर्णांक ४१ शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेला हा पाऊस जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या १३ पूर्णांक ६५ टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, हसत खेळत रचनावादी शिक्षणाच्या प्रणेत्या लीला पाटील यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं, त्या ९३ वर्षांच्या होत्या. पाटील यांनी सृजन आनंद शाळेच्या नावाने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात नवा प्रयोग रुजवला. स्वातंत्र्यलढ्यातही पाटील यांचा सहभाग होता. दिवंगत लेखक ना. सी. फडके यांच्या त्या कन्या, तर अस्पृश्यता उद्धाराच्या चळवळीतले आघाडीचे नेते दलितमित्र बापुसाहेब पाटील यांच्या त्या पत्नी होत.
****
ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध साहित्यिक- नाटककार यशवंत रांजणकर यांचं काल दुपारी मुंबईच्या हिरानंदानी रुगणालयात प्रदीर्घ आजारासह वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. ‘सर्जा’, ‘धाकटी सून’ या चित्रपटांची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांनी लिहिलेले ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’, ‘कशासाठी प्रेमासाठी’ हे चित्रपटही गाजले. ‘गर्भ श्रीमंत’ नाटक तसंच लॉरेंन्स ऑफ अरेबिया, ‘आल्फ्रेड हिचकॉक’, ‘वॉल्ड डिस्नी’ यांची त्यांनी लिहिलेली चरित्र लोकप्रिय आहेत.
****
दिग्दर्शक कांचन नायक यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. नायक यांनी दिग्दर्शीत केलेल्या `कळत नकळत` या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार राष्ट्रीय पारितोषिकं आणि नऊ राज्य पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांनी अनेक चित्रपट तसंच मालिकांचे दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
****
गंगाखेड येथील व्यंकटेश विद्यालयाचे संस्थापक जयंत दत्तात्रय राखे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. १९६८ पासून निवृत्तीपर्यंत त्यांनी  औरंगाबाद शहरातल्या सरस्वती भुवन इथं गणित विषयाचे तज्ञशिक्षक म्हणून कार्य केलं.
****
हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या पार्थिवावर काल मुंबईतल्या विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि मोजके निकटवर्ती उपस्थीत होते. त्यांच्या मृत्यूबाबत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सुशांतसिंह यांनी दोन दिवसांपूवी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
****
परभणी जिल्ह्यातल्या दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी ८० टन रेशीम कोषाची निर्मिती केली. टाळेबंदीमुळे रेल्वे सेवा बंद असल्याकारणाने हे कोष बेंगलुरूला विक्रीसाठी पाठवणे शक्य नव्हते. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची .चिन्हे दिसत असताना जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांनी हे कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना मदत केली. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -

लॉकडाउनच्या काळात ८० टन रेशीम कोष विक्री करण्यास सहकार्य करून परभणी जिल्हा रेशीम विकास कार्यालयाने २५० शेतकऱ्यांना न्याय दिला यासंदर्भात जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी.आर कदम म्हणाले
परभणी जिल्ह्यामध्ये ८५० शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग सुरू केला त्यापैकी २५० शेतकऱ्यांचा कोष लॉकडाउनच्या काळामध्ये तयार झाला रेल्वे सेवा बंद असल्यामुळे कोष विक्रीचा प्रश्न निर्माण झाला त्यातच पूर्णा येथील बाजारपेठेने सर्व शेतकऱ्यांचा ८०% टन खरेदी केला त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले
रेशीम उद्योग हा कायम स्वरुपी आर्थिक उत्पन्न देणारा असल्यामुळे शेतीला जोड धंदा म्हणून तरुण शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कदम यांनी केले
आकाशवाणीबातम्यासाठी परभणीहून  विनोद कापसीकर
****
परभणी महापालिकेनं तोंडाला मास्क न लावणं तसंच शारिरिक अंतर न राखण्याबाबत २८ नागरिकांविरुद्ध काल दंडात्मक कारवाई केली. त्यांच्यांकडून दोन हजार आठशे  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
हिंगोली इथं राजपत्रित अधिकारी महासंघानं कालपासून कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना चुकीची वागणूक देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे जिल्ह्यात पोलिस विभाग वगळता सर्वच कार्यालयांचं कामकाज ठप्प झालं होतं.
****
कोरोना विषाणूमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या परभणी शहरातल्या नागरिकांचा सहा महिन्यांचा मालमत्ता कर आणि व्यापाऱ्यांचे गाळेभाडे माफ करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या परभणी महानगर शाखेनं केली आहे. याबाबतचे निवेदन  आयुक्त देविदास पवार यांना देण्यात आलं आहे. याशिवाय ज्या लोकांनी नळ घेतांना अनामत रक्कम भरलेली आहे, त्यांना नवीन जोडणी घेतांना पुन्हा अनामत रक्कम आकारण्यात येऊ नये अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 
****
औरंगाबादच्या एमजीएम अभिमत विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांना अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ पीसने डॉक्टरेट ऑफ गांधीयन फिलॉसॉफी ही मानद पदवी जाहीर केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला कापूस खरेदी केला जाईल असं आमदार डॉ. राहुल पाटील यांनी म्हटलं आहे. सुरूवातीला कोरोना विषाणूचं संकट आणि आता पावसामुळे कापूस खरेदीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे चिंतित झालेल्या शेतकऱ्यांना पाटील यांनी दिलासा दिला आहे.
****
बीड तालुक्यातल्या लिंबागणेशजवळ मुळूक पुलावर दुचाकी आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरचे तीन शेतकरी ठार झाले. हे शेतकरी बियाणे खरेदी करुन गावी जात होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तहसील कार्यालयात काल आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत गुट्टे यांनी तालुक्यातील कोरोना विषाणू आजाराविषयीची सद्यस्थिती आणि राबवत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांनी मिळून ३१ हजार १४७ शेतकऱ्यांना १४६ कोटी एक लाख ३० हजार रुपयांच्या खरीप पीककर्जाचं वाटप केलं आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याचं पीककर्ज वाटपाचं एकूण उद्दिष्ट १ हजार ११५ कोटी ३१ लाख ९० हजार रुपये इतके असून आजपर्यंत केवळ १३ टक्केच पीक कर्जाचे वाटप पूर्ण झालं आहे. बँकांनी कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करता तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात खरीप हंगामासाठी लागणारी बी-बियाणं शेतकऱ्यांना गावातच उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाच्यावतीनं गावातच बीजप्रक्रिया आणि बीज प्रात्यक्षिकं घेतली जात आहेत. उस्मानाबाद हा  अनियमित पावसाचा जिल्हा असल्यामुळे पेरणीसाठी सरी-वरंबा पद्धतीनं म्हणजेच बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिप्राय अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पक्षाची भुमिका याबाबत कार्यकर्ते, सामान्य जनतेचं मत जाणून घेण्यासासह जनतेच्या आपापल्या भागातील समस्यांविषयी आपलं मत नोंदवायचं आहे. येत्या २५ जूनपर्यंत हे अभियान सुरु राहणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबादमध्येही हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****
हिंगोली इथल्या कृषी कार्यालयातला कृषी सहायक प्रदीप शिंदे याला तेराशे रुपयाची लाच घेताना काल लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं. एका दुकानदाराला परवाना देण्यासाठी तेराशे रुपयाची मागणी शिंदे यानी केली होती.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड पोलिस ठाण्याचे हवालदार सुरेश पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं एक हजार रुपयांची लाच स्वीकारतांना काल अटक केली. तक्रारदार आणि त्याच्या भावामधला शेतीसंबंधित वाद मिटवण्यासाठी तक्रारदाराकडं एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी हवालदार पाटील यानं केली होती.
****
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथल्या जैन स्थानकात जैन मुनींच्या प्रवचनासाठी गर्दी जमवल्या प्रकरणी श्रीरामपूर जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष रमेश लोढा यांच्याविरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब मुनी यांच्या प्रवचनासाठी नागरिकांना आवाहन करून गर्दी जमवल्याचा त्यांच्याविरूद्ध आरोप आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...