Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ जून २०२०
सायंकाळी ६.००
****
·
कोळसा
उत्पादनाद्वारे वीज निर्मितीचा प्रश्र्न सुटावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन.
·
कोरोना
विषाणू प्रादूर्भाव रोखण्यास शासन, प्रशासन सज्ज – अमित देशमुख यांची ग्वाही.
·
फळपीक
विमा योजना २०२३ पर्यंत राबवली जाणार.
आणि
·
रायगडावर
शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.
****
दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली
तर वीज निर्मितीचा प्रश्नही मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या
दरात आणि अखंडित वीज पुरवठा करता येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ते आज वेस्टर्न कोलफिल्डच्या वतीनं नागपूर जवळील आदासा इथं एक आणि मध्यप्रदेशातील दोन
कोळसा खाणींचं दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे उदघाटन करताना बोलत होते. अन्न, वस्त्र,
निवारा या जीवनावश्यक वस्तूंमधे आपल्याला आता उर्जेचाही समावेश करावा लागेल असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या विजेविषयीच्या मागण्या आणि अपेक्षा शंभर टक्के पूर्ण
झाल्या असं आजही म्हणता येत नसल्याबद्दल त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. भारनियमन
पूर्णपणे बंद करणं, परवडणाऱ्या दरात, अखंडित वीज पुरवठा देणं या गोष्टींची पूर्तता
आपल्याला करायची असून चांगल्या दर्जाच्या कोळशाचं उत्पादन झालं तर वीज निर्मितीच्या
अडचणी भविष्यात दूर होतील, असं ते म्हणाले. कोळसा खाणींमुळे होणारं प्रदूषण कमी व्हावं
तसंच या खाणी पर्यावरण पूरक असाव्यात, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
कोरोना विषाणू संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी
वेळेत सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यास सुरवात करण्यात आली असून या विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसंच प्रशासन सर्वतोपरी सज्ज असल्याचं राज्याचे वैद्यकीय
शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यात या संसर्गाबाबत
करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची आढावा बैठक घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत
ते बोलत होते. राज्याचे उद्योगमंत्री तसंच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या
नेतृत्वात औद्योगिक वसाहतीत दोनशे खाटांचं विशेष रुग्णालय तयार होत असून जिल्ह्यातील
आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी एक अधिकचं रुग्णालय यामुळे उपल्बध
होत असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूसंदर्भात ग्रामीण
स्तरापर्यंत योग्य पद्धतीनं जनजागृती तसंच प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा, स्थानिक
प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेमार्फत राबवण्यात येत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख
यांनी नमूद केलं.
****
राज्यात पुनररचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना तीन
वर्ष म्हणजे २०२३ पर्यंत राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती कृषी
मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना
ऐच्छिक असून शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. मृग बहारामधे
संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरु, लिंबू आणि चिकू या सहा फळ पिकांसाठी अठरा जिल्ह्यांमधे
ही योजना राबवली जाणार आहे. आंबिया बहारामधे द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी,
आंबा आणि काजू या सात फळ पिकांसाठी तेवीस जिल्ह्यांमधे आणि स्ट्रॉबेरी हे फळ पिक प्रायोगिक
तत्वावर फक्त सातारा जिल्ह्यात राबवण्यास मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
योजनेत सहभागासाठी एकूण विमा हप्त्याच्या केवळ पाच टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना द्यावा
लागणार असून उर्वरित विमा हप्ता राज्य आणि केंद्र शासन भरणार असल्याचं राज्याचे कृषी
मंत्री भुसे यांनी म्हटलं आहे.
****
कुटुंबप्रमुखाचा अनपेक्षितपणे मृत्यू झाल्यामुळे एकाकी
पडलेल्या महिलांसाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना लागू करण्यात आली आहे. त्या
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा, कामगार आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री
बच्चू कडू यांनी दिले आहेत. अमरावती इथं तहसील कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेताना
ते बोलत होते. या योजनेतून अचलपूर पंचायत समिती क्षेत्रात दोन लाख ८० हजार रूपयांच्या
धनादेशांचं वाटप करण्यात आलं असल्याची माहिती राज्यमंत्री कडू यांनी यावेळी दिली.
****
‘शिवराज्याभिषेक दिन’ हा ‘संकल्प दिन’ मानून शिवछत्रपतींनी
दिलेला वसा पुढं नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या, असं नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी शिव राज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
लोक कल्याणकारी कारभाराचा जगापुढं आदर्श असून शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या
हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, राज्य कारभाराचा आदर्श
राज्याला सदैव मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संदेशात म्हटलं आहे. शिवाजी महाराजांनी राज्यात रयतेचं
राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार
केल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
रायगडावर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर गर्दी
टाळून शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक
महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती
यांच्या हस्ते मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा
अभिषेक यावेळी करण्यात आला. शहाजीराजे यांच्या हस्ते नगारखान्यासमोर ध्वजवंदन करण्यात
आलं.
****
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज नांदेड इथं खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आलं. धुळे इथं छावा संघटना तसंच मराठा क्रांती मोर्चातर्फे शिवाजी
महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करून अभिवादन करण्यात आलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांसाठी
अर्ज दाखल करण्याची मुदत टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीमुळे बारा जूनपर्यंत वाढवण्यात
आली आहे. संगणकीकृत पद्धतीनं हे अर्ज दाखल करायचे असून संबंधितांनी याची नोंद घ्यावी,
असं विद्यापीठानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमुद केलं आहे.
****
जालना शहरातल्या मोदीखाना परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग
वाढत असल्यानं हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी आज या भागाची पाहणी केली. नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातून
बाहेर पडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना
दिल्या आहेत.
****
माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचं आज मुंबईतील राहत्या
घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या अठ्ठ्याऐंशी
वर्षांच्या होत्या. त्यांचे पुत्र, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती
दिली आहे. चंद्रकांता गोयल या आणिबाणीनंतरच्या काळात मुंबईतील माटुंगा मतदारसंघातून
तीन वेळा विधानसभेवर निवडून आल्या होत्या.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या सर्वांना उपचार मोफत
मिळावेत, आणि उपचारात गरीब श्रीमंत असा भेदभाव नसावा, असं राज्यातल्या साहित्यकांच्या
एका शिष्टमंडळानं म्हटलं आहे. याबाबतचं निवेदन काल जारी करण्यात आलं. वैद्यकीय सेवांचं
राष्ट्रीयीकरण व्हावं, आरोग्य विम्यावरच अवलंबित्व बंद करावं, सरकारी दवाखान्यांची
संख्या आणि दर्जात वाढ करावी, सर्वांना रोजगाराचा मूलभूत अधिकार असावा,आदी मागण्याही
या साहित्यकांनी केल्या आहेत. याशिवाय नागरिकांनी आपल्या परिसरातल्या गरजूंना मदत करावी,
तसंच साहित्यिकांनी आपल्या उत्पन्नातून मदत निधीत योगदान करण्याचं आवाहनही करण्यात
आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज एक कोरोना विषाणूचा रुग्ण आढल्यामुळे
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एकशे नव्वद झाली आहे. यापैकी एकशे सव्वीस रुग्ण
बरे होऊन घऱी परतले आहेत. नांदेड जिल्ह्यात यामुळे आतापर्यंत आठ रुग्ण मृत्यूमुखी पडले
असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
सांगली जिल्ह्यात आज एका अठ्ठावण्ण वर्षीय कोरोना विषाणू
बाधीत महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या
आता पाच झाली आहे. सध्या सत्तावन्न रुग्णांवर उपचार सुरू असून एक्क्याऐंशी रुग्ण आतापर्यंत
बरे झाले असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
राज्य सरकारनं विद्यार्थ्यांचं थकीत आणि चालू वर्षाचं
शैक्षणिक शुल्क माफ करावं अशी मागणी जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण
भोसले यांनी आज उस्मानाबाद इथं केली आहे.
****
No comments:
Post a Comment