Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
*****
**पैठणचं संतपीठ येत्या जानेवारीपासून
सुरू - उच्च शिक्षणमंत्री सामंत यांची घोषणा
**कनिष्ठ न्यायालयांचं कामकाज सोमवारपासून दोन सत्रांमधे चालणार
**मराठा
समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गात समावेश करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
आणि
**औरंगाबादमधे
कोरोना विषाणू संसर्गामुळे तीन रुग्णांचा मृत्यू, एकूण रुग्ण संख्या ३० हजार २१३
****
औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठणचं संतपीठ येत्या जानेवारी
पासून होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र
शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आढावा घेतला त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत
होते. ते म्हणाले...
येत्या जानेवारीमध्ये महाराष्ट्र
शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांची स्वायत्त संस्था म्हणून जगतगुरु
संत एकनाथ महाराजांच्या नावानं संतपीठ सुरु करण्याचा निर्णय आज आमच्या झालेल्या बैठकीमध्ये
आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे. येत्या महिनाभरामध्ये यासंबंधी जो जीआर आहे तो देखील
काढण्याची जबाबदरी मंत्री या नात्यानं स्वत:मी स्विकारली आहे. संपूर्ण प्रोजेक्टला
२२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आणि जेव्हाढा खर्च विद्यापीठ करेल तेव्हढ्याचा तेव्हढा
पैसा हा शासनाकडून पुन्हा एकदा विद्यापीठाला दिला जाईल.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे प्रचंड कष्टानंतर निर्माण झालेलं विद्यापीठ आहे. ही
प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांचं नाव अबादित ठेवणे. ही माझ्यासगट प्रत्येकाची जबाबदारी
आहे. विद्यापीठामध्ये दोन भाग करण्याचा प्रयत्न
आमचा आजिबात नाही. अशा कुठल्याही गैरसमजाला आपण बळी पडू नये आणि अशा मागण्या
करुन कोणी जर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला देखील मला नम्रतेची विनंती
करायची आहे की अस कुठलंही राजकारण महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेलं नाही. या विद्यापीठाबद्दल
आणि विशेषत: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नितांत निष्ठा असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत,
त्यामुळे असा गैरसमज कोणी पसरवू नये.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतीम
वर्षाच्या `ऑनलाईन` परीक्षेसाठी
९० टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १० टक्के विद्यार्थी `ऑफलाईन` परीक्षा देणार असल्याची माहितीही उच्च आणि तंत्र
शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. दरम्यान, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आज
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वाहनांचा ताफा अडवणाऱ्या `ऑल इंडीया मजलीस-ए-इत्तेहादूल-मूस्लीमीन` अर्थात
`एमआयएमच्या` कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. विद्यापीठाच्या
कथित विभाजनाविरोधात हे आंदोलन होतं. विद्यापीठ विभाजन, नामांतर हुतात्मा स्मारकास होत असलेली दिरंगाई,
परीक्षेचा घोळ, शिक्षण -परीक्षा शुल्क पन्नास टक्के माफ करावं आदी मागण्या या कार्यकर्त्यांनी यावेळी केल्या.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यात सर्व कनिष्ठ न्यायालयांचं कामकाज
सोमवारपासून दोन सत्रांमधे चालणार आहे. सकाळी साडेदहा ते
दीडवाजेपर्यंत पहिलं सत्र तर दुसरं सत्र दुपारी
दोन ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत
असेल. उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे.
संबंधित वकील किंवा पक्षकार हेतुपुरस्सर गैरहजर राहिल्याचं लक्षात आल्यास कारवाईचा
इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे. सोमवारपासूनच्या कामकाजात पत्नी, मुलं, पालक यांच्या देखभालीच्या खर्चासंबंधी दाखल
करण्यात आलेले अर्ज, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयानं काही
खटले ठराविक काळात निकाली काढण्याचे आदेश दिले असतील तर अशा खटल्यांची
प्राधान्यानं सुनावणी होणार आहे. तसंच ज्या प्रकरणांत आरोपी तीन किंवा त्याहून
अधिक वर्षं कारागृहात आहेत आणि दंडाधिकारी न्यायालयापुढे सुरू असलेल्या खटल्यांतील
जे आरोपी सहा महिन्यांपासून तुरूंगात आहेत, त्या खटल्यांवरील सुनावणी घेण्यात यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय
समितीनं दिले आहेत.
****
मराठा
समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्ग `ओबीसीत` समावेश करण्याची मागणी संभाजी ब्रिगडेनं
केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी आज औरंगाबाद
इथं प्रत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं
राज्य घटनेच्या ३४० कलमानुसार इतर मागास प्रवर्ग `ओबीसीत` सरसकट समावेश करावा अशी शिफारस
केली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य शासनानं काढलेली पोलीस भरती रद्द करावी असंही
ते यावेळी म्हणाले. यामागणी यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना
निवेदन देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यासंदर्भात सरकारनं निर्णय न घेतल्यास
आंदोलनाचा इशारा डॉ. भानुसे यांनी यावेळी दिला.
****
मराठा समाज आरक्षणासंबधी स्थगिती उठवण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, यासाठी सोलापूर इथल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आज
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना
निवेदन सादर करण्यात आलं.
आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतीही भरती करण्यात
येऊ नये अन्यथा गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ८५४ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू
झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेनं शहर प्रवेश नाक्यांवर कोरोना विषाणू
संसर्गासाठी घेतलेल्या २१२ चाचण्यांमधे १९ नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यात हा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता ३०
हजार २१३ झाली आहे.
****
लातूर जिल्ह्यात
आजपासून तयार कापडाची दुकाने नेहमीकरीता सकाळी
नऊ ते सायंकाळी सात पर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती लातूर
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी दिली आहे. कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, लातूर शहरातील रेडिमेड
कापड व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानं परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरातला गोवर्धन
घाट पाण्यानं
वेढला असून पात्रातल्या नृसिंह
मंदिराच्या कळसावर पाणी पोहचलं आहे. नाथसागर
आणि माजलगाव प्रकल्पातून
मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
****
जालना शहर तसंच जिल्ह्यातल्या अंबड, जालना आणि बदनापूर तालुक्यातल्या
काही भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.
****
नांदेड इथल्या
डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाची सात दारं आज उघडण्यात आली. यामुळे
गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नदीकाठच्या
गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नांदेड शहरातल्या दासगणू महाराज पुलावरून कालपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे
****
लातूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यात
अतिवृष्टीमुळं पिकं वाया गेली असल्यानं शेतकऱ्यांना पीकविम्याची २५ टक्के
रक्कम आगाऊ द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते संभाजीराव पाटील
निलंगेकर यांनी केली आहे. त्यांनी या
मागणीचं निवेदन विधानसभेतले विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सरकारला दिले आहे. मागच्या काही दिवसात निलंगा,देवणी,शिरूर अनंतपाळ,लातूर तालुक्यांसह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली त्यात सोयाबीन आणि
खरीपाची पिकं वाया गेली. पिकं पूर्णपणे गेली असतील तर
शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याची तरतूद असून विमा कंपन्यांसोबत तसा करार झालेला असल्याचंही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या
वाढदिवसानिमित्तानं सेवा
सप्ताहांतर्गत उस्मानाबाद इथल्या
उमरगा तालुक्यातील मुरूम शहरात फंडस या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं असंघटीतांचे विमे उतरवण्यात आले आहेत.
असंघटित कामगार, युवक आणि
वाहन चालक यांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा यासाठी संस्थेनं स्वखर्चातुन १७० लाभार्थ्यांचे विमे उतरवले
आहेत. फंडस स्वयंसेवी
संस्थेचे जिल्हाध्यक्ष धनाजी धोतरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, धुळे इथंही भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीच्या वतीनं `सेवा
सप्ताहानिमित्त` जिल्हा रूग्णालय आणि कोव्हीड रूग्णालयाच्या संपूर्ण परिसरात आज स्वच्छता अभियान
राबविण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment