Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 September 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २०
सप्टेंबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यसभेत आज तीन कृषी विधेयकं मांडली जाणार, सर्व सदस्यांना सदनात उपस्थित राहण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा व्हीप जारी
** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं विभाजन
नाही, उस्मानाबाद उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्यासाठी अभ्यासगट
** पैठण
संतपीठ जानेवारी महिन्यापासून सुरू होणार
**
राज्यात आणखी २१ हजार ९०७ कोविड बाधितांची नोंद,
४२५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
** मराठवाड्यात ४७ बाधितांचा
मृत्यू, तर
नव्या एक हजार ६१४ रुग्णांची नोंद
** मराठा
समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गात
समावेश करण्याची संभाजी ब्रिगडेची मागणी
आणि
** आयपीएल
क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा
मुंबई इंडियन्स संघावर पाच गडी राखून विजय
****
राज्यसभेत
आज तीन कृषी विधेयकं मांडली जाणार आहे. शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन
आणि सुविधा विधेयक, शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता
येण्याची तरतूद असलेलं विधेयकं आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयकाचा यात समावेश
आहे. ही तिन्ही विधेयकं यापूर्वीच लोकसभेत पारित झाली आहेत. या विधेयकांना विरोधी पक्षांचा
विरोध असून, त्यामुळे शेतकऱ्यांचं
नुकसान होईल, असं मत अनेक सदस्यांनी व्यक्त केलं आहे. याच विधेयकांच्या विरोधात शिरोमणी
अकाली दलाच्या नेत्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी
आपल्या मंत्रीपदाचा
राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी केला असून,
सदनात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
****
राज्य सरकारांचं मत लक्षात न घेता, केंद्र
सरकार शेतीसंदर्भात महत्त्वाची विधेयक संसदेत आणत असल्याची टीका राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारनं संसदेत
आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या अनुषंगानं ते काल पत्रकारांशी
बोलत होते. शेती हा राज्यांशी निगडित विषय असल्याकडे त्यांनी
यावेळी लक्ष वेधलं. लोकसभेत या विधेयकांवर मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी
काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केल्याचं पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल सांगण्यास पवार यांनी नकार दिला, मात्र सर्वोच्च न्यायालयात
सुरू असलेलं मराठा आरक्षण प्रकरण, वस्तु आणि सेवा कराचा
केंद्र सरकारकडून येणारा परतावा, कृषी
विधेयकं, कोविड परिस्थिती त्याचबरोबर राज्यातल्या प्रशासकीय तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या
बदल्या आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं विभाजन
केलं जाणार नाही, असं उच्च आणि
तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी
काल स्पष्ट केलं. औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठांतर्गत परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. उस्मानाबाद उपकेंद्राचे
सक्षमीकरण करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. या गटाला स्वतंत्र विद्यापीठाच्या
दृष्टीने कोणताही अभ्यास करण्यास सांगितलेले नाही. उस्मानाबाद इथं विद्यापीठाचं उपकेंद्रच कार्यरत राहील, असं सामंत म्हणाले.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे प्रचंड कष्टानंतर निर्माण झालेलं विद्यापीठ आहे. त्यांचं
नाव अबादित ठेवणे. ही माझ्यासगट प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यापीठामध्ये दोन भाग
करण्याचा प्रयत्न आमचा आजिबात नाही. अशा कुठल्याही
गैरसमजाला आपण बळी पडू नये आणि अशा मागण्या करुन कोणी जर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
करत असेल तर त्याला देखील मला नम्रतेची विनंती करायची आहे की अस कुठलंही राजकारण महाविकास
आघाडीच्या सरकारनं केलेलं नाही. त्यामुळे असा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करु
नये.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व विभागांच्या पदवी परीक्षा एक ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत, एक लाख १६ हजार ४००
परीक्षार्थ्यांपैकी ९० टक्के परीक्षार्थी ऑनलाईन पद्धतीने तर १० टक्के परीक्षार्थी
ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या परीक्षा एक महिन्याच्या आत घेण्यात येतील,
असं सामंत यांनी सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथलं नियोजित संतपीठ जानेवारी
महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं, सामंत यांनी
जाहीर केलं. यासाठी सुरुवातीला २२ कोटी रुपये खर्च येईल, सुरुवातीला
विद्यापीठाने हा खर्च करायचा आहे, आणि नंतर सरकार हा खर्च
परत करेल, अशी माहिती सामंत यांनी दिली, ते म्हणाले...
येणाऱ्या
जानेवारीपासून महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांची
स्वायत्त संस्था म्हणून जगतगुरु संत एकनाथ महाराजांच्या नावानं संतपीठ सुरु करण्याचा
निर्णय आज आमच्या झालेल्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे. येत्या महिनाभरामध्ये
यासंबंधी जो जीआर आहे तो देखील काढण्याची जबाबदरी मंत्री या नात्यानं स्वत:मी स्विकारलेली
आहे. संपूर्ण प्रोजेक्टला २२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आणि जेव्हाढा खर्च विद्यापीठ
करेल तेव्हढ्याचा तेव्हढा पैसा हा शासनाकडून पुन्हा एकदा विद्यापीठाला दिला जाईल.
दरम्यान, औरंगाबाद इथं विद्यापीठाच्या
प्रवेशद्वारासमोर मंत्री सामंत यांच्या वाहनांचा ताफा अडवणाऱ्या `ऑल इंडीया मजलीस-ए-इत्तेहादूल-मुसलमीन` -`एआयएमआयएमच्या` कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
विद्यापीठाच्या कथित विभाजनाविरोधात हे आंदोलन असल्याचं सांगण्यात आलं.
विद्यापीठाचं कथित विभाजन, नामांतर हुतात्मा स्मारकास होत
असलेली दिरंगाई, परीक्षेचा घोळ, शिक्षण
तसंच परीक्षा शुल्क पन्नास टक्के माफ करावं आदी मागण्या या कार्यकर्त्यांनी यावेळी
केल्या.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व कनिष्ठ न्यायालयांचं
कामकाज उद्यापासून सकाळी साडेदहा ते दुपारी दीड आणि दुपारी दोन ते सायंकाळी साडे
पाच असं दोन सत्रात चालेल. उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं याबाबतचं पत्रक
जारी केलं आहे. संबंधित वकील किंवा पक्षकार हेतुपुरस्परर
गैरहजर राहिल्याचं लक्षात आल्यास कारवाईचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.
****
राज्यात एक ऑक्टोबर पासून मूग खरेदीला सुरुवात होणार असून, पुढचे तीन महिने ही खरेदी प्रक्रिया
सुरू राहणार आहे, या खरेदीसाठी राज्यात १८१ खरेदी केंद्र
सुरु करण्यात आली असल्याची माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. किमान
आधारभूत किंमत योजनेंतर्गत मुगाचा हमी भाव सात हजार १९६
रुपये प्रति क्विंटल असून, सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार
असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी २१ हजार ९०७ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या ११ लाख ८८ हजार १५ झाली आहे. काल ४२५
जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३२ हजार
२१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २३ हजार ५०१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत आठ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६१४ रुग्णांची
नोंद झाली.
उस्मानाबाद जिल्ह्यात १५ कोविड बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी २१६ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ११ रुग्णांचा मृत्यू झाला,
तर नव्या २८५ रुग्णांची भर पडली. नांदेड जिल्ह्यात सात रुग्णांचा
मृत्यू झाला, तर नव्या ३३२ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात पाच बाधितांचा
मृत्यू झाला, तर नवे ३२३ रुग्ण आढळले. बीड आणि परभणी
जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात १५५ तर परभणी
जिल्ह्यात नव्या १०८ बाधितांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू
झाला, तर आणखी १२६ रुग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यात एका
रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ६९ रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे
जिल्ह्यात काल आणखी चार हजार ९३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ८५ जणांचा मृत्यू
झाला. मुंबईत दोन हजार २११ नवे रुग्ण आणि ५० मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात
एक हजार ३८७ रुग्ण आढळले, तर १६ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ६२९,
सातारा ९७७, सांगली ८३०, अहमदनगर ७०३, रायगड ५७५, गोंदिया २२६, वाशिम
१५०, रत्नागिरी ६९, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी २८ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाली.
****
मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्ग - `ओबीसीत`
समावेश करण्याची मागणी संभाजी ब्रिगडेनं केली आहे. संभाजी ब्रिगेडचे
प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही
मागणी केली. न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं राज्य घटनेच्या ३४० व्या कलमानुसार मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्ग `ओबीसीत`
सरसकट समावेश करावा अशी शिफारस केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य शासनानं काढलेली पोलीस भरती रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. या मागणी
संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सरकारनं निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा डॉ.
भानुसे यांनी यावेळी दिला.
****
लातूर जिल्ह्यात तयार कपड्यांची दुकानं कायमस्वरुपी सकाळी नऊ ते सायंकाळी सात
या वेळेतच चालू ठेवण्यात येणार आहेत. लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप
सोलंकी यांनी काल ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
पैठणच्या नाथसागर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने
गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल
गोदावरी नदी परिसरात पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत
सूचना दिल्या. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी शेतमाल, औजारे,
जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावीत, असं आवाहन
टोपे यांनी केलं आहे.
****
गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानं परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरातला गोवर्धन
घाट पाण्यानं वेढला असून पात्रातल्या नृसिंह मंदिराच्या कळसापर्यंत पाणी पोहोचलं
आहे. पैठण इथल्या नाथसागर आणि माजलगाव प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर गोदावरी
नदीच्या पात्रात पाणी सोडल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
****
नांदेड इथल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाचे आठ
दरवाजे उघडून, दोन हजार १८४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
प्रशासनानं दिला आहे. नांदेड शहरातल्या दासगणू महाराज पुलावरून कालपासून वाहतूक
बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात
काल रात्री मुखेड, धर्माबाद, उमरी, आणि नांदेड शहरात जोरदार पाऊस झाला.
जालना शहरात काल दुपारी तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं. रस्त्यांवर
पावसाचं पाणी आल्यानं नागरिकांची गैरसोय झाली. अंबड, परतूर,
मंठा, बदनापूर या तालुक्यातही मेघगर्जनेसह
जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरातही काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसानं सर्वाधिक
प्रमाणात लागवड असलेल्या सोयाबीन पिकाचं मोठ्या
प्रमाणात नुकसान झालं आहे. वसमत, सेनगाव, तसंच कळमनुरी तालुक्यात उभ्या पिकाला कोंब फुटले आहेत. काल झालेल्या पावसानं नदीकाठच्या शेतात पाणी साचलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्या पावसामुळे उमरगा तालुक्यातील माडज कलदेव निंबाळा
परिसरात काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेले असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे या बाधित क्षेत्रातील पिकांचे
पंचनामे त्वरित करून मदत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकं वाया गेली असल्यानं
शेतकऱ्यांना पीकविम्याची २५ टक्के रक्कम आगाऊ द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली
आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या
मार्फत सरकारला दिलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्तानं सेवा
सप्ताहांतर्गत उस्मानाबाद इथल्या उमरगा तालुक्यातल्या
मुरूम शहरात फंड्स या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं असंघटित
कामगारांचे विमे उतरवण्यात आले. असंघटित कामगार, युवक आणि
वाहन चालक यांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा यासाठी संस्थेनं
स्वखर्चातून १७० लाभार्थ्यांचे विमे उतरवले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात मुरूम कृषी
उत्पन्न बाजार समितीत केंद्र सरकारच्या ई - नाम योजनेअंतर्गत शेतीमाल खरेदी सुरु करण्यात
आली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या
शेतमालाला नागपूर, मद्रास, दिल्ली, हैदराबाद यासारख्या मोठ्या बाजारपेठांकडे व्यापाऱ्यांकडून
विक्रीला पाठवलं जात आहे. विशेष म्हणजे देशांतर्गतच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना स्वत:हून
शेतमालाची विक्री करता यावी यासाठी केंद्र शासनानं सुरु केलेली ई - नाम सेवेची सुविधा
बाजारसमितीनं नुकतीच सुरु केल्यामुळे चांगली सोय झाली आहे. याबाजार समितीत या हंगामात
आतापर्यंत तीन हजार क्विंटल मूग आणि पंचवीसशे क्विटल उडीदाची आवक झाली असून यंदाच्या
वर्षी गतीवर्षीपेक्षा दुप्पट आवक होईल असं बाजार समितीच्या वतीनं सांगण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या या ई - नाम बाजार समितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव
मिळत असल्यामुळे शेतकरी केंद्र सरकारचे आभार मानत आहेत.
देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर
उस्मानाबाद
****
ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन
झालं, त्या ९१ वर्षांच्या होत्या. संयुक्त
महाराष्ट्र चळवळ तसंच गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झालेल्या रोझा देशपांडे, १९७४ मध्ये दक्षिण मुंबई मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
महिलांची प्रसुती रजा, आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी
त्यांनी मोठं काम केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशपांडे यांच्या
निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं काल सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजारानं
निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी मुंलुंड विधानसभा मतदार संघाचं
प्रतिनिधित्त्व केलं होतं.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथले महानुभाव संप्रदायाचे संत वैराग्यमूर्ती दत्ता
बापू यांचं काल निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. दत्ता बापू यांनी
विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, गरीबांसाठी अन्नछत्र, गोरगरीबांच्या मुलामुलींचे विवाह, यासह अनेक सामाजिक
उपक्रम निस्वार्थ भावनेनं राबवले. मराठवाडा आणि विदर्भासह तेलंगणा, कर्नाटक या राज्यात त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आहे. दत्ता बापू यांच्या
पार्थिव देहावर काल दुपारी हदगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
अबुधाबी इथं सुरु असलेल्या
तेराव्या इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या कालच्या पहिल्या
सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्स संघावर पाच गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघानं २० षटकात नऊ बाद १६२ भावा केल्या, चेन्नई
संघानं हे आव्हान वीसाव्या षटकात पाच गडी राखत पूर्ण केलं. यंदा आयपीएल स्पर्धेत
६०सामने होणार असून, सर्व सामने दुबई, अबुधाबी
आणि शारजा इथं होणार आहेत. यंदा कोविड प्रादुर्भावामुळे हे सामने फक्त टीव्हीवरच
पाहता येणार आहेत.
//*************//
No comments:
Post a Comment