Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 September 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
एकविसाव्या
शतकाच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी शिक्षण प्रणालीला पुनर्जिवित करणं हा राष्ट्रीय
शिक्षण धोरणाचा उद्देश असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ‘नवीन
उच्च शिक्षण धोरण २०२०’ संदर्भात आयोजित परिषदेचं दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे उदघाटन
करताना ते आज बोलत होते. नवं धोरण केवळ आपल्या युवकांचं भविष्य मजबूत करणार नाही तर
देशाला आत्मनिर्भर बनवण्यातही सहकार्य करेल, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रीय
तपास संस्था – एनआयए नं अलकैदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे. आज पहाटे केरळमधील
एर्णाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं एकाच वेळी कारवाई करत या दहशतवाद्यांना
अटक करण्यात आलं आहे. देशात पश्चिम बंगाल आणि केरळसह विविध ठिकाणी पाकिस्तान प्रायोजित
अलकैदा या दहशतवादी संघटनेच्या कारवाया सुरू असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती,
त्यानुसार छापे टाकून ही अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यातल्या तीन
दहशतवाद्यांना केरळमधून तर सहा दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करून निरपराधांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता
आणि यासाठी निधी मिळवण्यात ते सक्रीय होते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. अटक करण्यात
आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या संख्येनं डिजिटल उपकरणं, दस्तावेज, जिहादी साहित्य,
धारदार शस्त्र, स्वदेशी बनवाटीच्या बंदुका, स्थानिक बनावटीचं चिलखत तसंच घरामधे विस्फोटकं
तयार करण्यासंदर्भातले लेख आणि साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
****
जम्मू काश्मीरमधल्या
राजौरी जिल्ह्यात दहशतवाद विरोधी कारवाई अंतर्गत आज सकाळी तीन संशयीत दहशतवाद्यांना
अटक करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेले एकोणीस ते
पंचवीस वर्षे वयोगटातले असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात
आला आहे.
****
देशात कोरोना
विषाणू संसर्गाच्या नव्या रुग्ण संख्येहून अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे
झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायनं दिली आहे. या संसर्गाचे नवे त्र्याण्णव
हजार तिनशे सदोतीस रुग्ण आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे आढळले असून या
काळात ९५ हजार ८८० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशातली या संसर्गाच्या रुग्णांची
एकूण संख्या ५३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. देशात या संसर्ग तपासणीसाठी कालपर्यंत
सहा कोटी २४ लाख ५४ हजार २५४ नमुने तपासण्यात आले असून यातले आठ लाख ८१ हजार ९११ नमुने
काल तपासण्यात आले असल्याचं वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.
****
मुंबईत गेल्या
चोवीस तासांत सुमारे दोन हजार दोनशे ६७ नव्या कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची नोंद झाली
आहे. एकूण रुग्ण संख्या आता एक लाख ऐंशी हजार ५४२ झाली आहे. एक लाख सदोतीस हजार ६६४
रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. या संसर्गांमुळं आतापर्यंत आठ हजार तीनशे
७२ रुग्णांचा मुंबईत मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबाद
महापालिकेनं शहर प्रवेश नाक्यांवर कोरोना विषाणू संसर्गासाठी घेतलेल्या २१२ चाचण्यांमधे
१९ नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यात हा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता ३०
हजार २१३ झाली आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे १ हजार ५५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. यात
अहमदनगर महापालिका क्षेत्रातले ३५२ तर उर्वरीत रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. अहमदनगर
जिल्ह्यात ३१ हजार १९१ रुग्ण आतापर्यंत संसर्गमुक्त झाले आहेत.
****
पैठणच्या
नाथसागरातल्या पाण्याचा विसर्ग आज सकाळी कमी करण्यात आला आहे. आता छप्पन्न हजार सहाशे
ब्याण्ण्व घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सध्या धरणात
सत्तावन्न हजार २१४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणामधे ९७ पूर्णांक
७४ शतांश टक्के पाणीसाठा असल्याची माहितीही प्रशासनानं दिली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात सततच्या पावसानं सर्वाधिक प्रमाणात लागवड असलेल्या सोयाबिन पिकाचं मोठ्या
प्रमाणात नुकसान झालं आहे. वसमत, सेनगाव, कळमनुरी तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या
उभ्या पिकाला कोंब फुटल्यामुळं त्याचं मोठं नुकसान झालं आहे. काल झालेल्या पावसानं
असना, तोंडपुसी ओढा आणि उघडी नदीला मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या शेतात पाणी साचलेलं
आहे.
****
भाजपचे माजी
आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे
होते. त्यांनी मुंलुंड विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.
****
No comments:
Post a Comment