Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 October 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गाचे ६९ लाख ४८ हजार रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं
प्रमाण ८९ पूर्णांक ५३ शतांश टक्के झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे. देशात या संसर्गामुळे होत असलेल्या मृत्यूचा दर सातत्यानं कमी होत असून सध्या
तो एक पूर्णांक एकावन्न शतांश टक्के आहे. गेल्या चोवीस तासांमधे ७३ हजारांहून अधिक
रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं वाढत असून
नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे. एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत फक्त आठ पूर्णांक ९६ शतांश टक्के रुग्ण सध्या
उपचार घेत आहेत. सध्या सहा लाख ९५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात गेल्या चोवीस
तासांमधे ५४ हजार ३६६ नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या
सत्त्याहत्तर लाखांहून अधिक आहे. गेल्या चोवीस तासांमधे ६९० रुग्णांचा या संसर्गामुळे
मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख १७ हजार ३०६ झाली
आहे.
****
देशात
गेल्या चोवीस तासांमधे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी १४ लाख ४२ हजारांहून अधिक रुग्णांच्या
नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं
दिली आहे. आतापर्यंत दहा कोटी पेक्षा जास्त नमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असल्याचंही
या परिषदेनं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे ३७ हजार एकशे चार रुग्ण आढळले आहेत. सध्या
एक हजार पाचशे ४९ रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू
झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ४७ झाली आहे.
****
भारतीय
संस्कृतीतून आलेली त्याग, समर्पण आणि संन्यस्त वृत्ती हीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची
पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना असल्याचं, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय
पाचपोर यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानबाद इथं अभाविप पूर्णवेळ कार्यकर्ता निरोप स्वागत
आणि शुभेच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘मी समाजाचा - समाज माझा’ या
भावनेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार अभाविप विविध कार्यक्रमातून
करत असल्याचं पाचपोर यांनी यावेळी नमूद केलं.
****
मिरज
मार्गे धावणाऱ्या चार पॅसेंजर गाड्यांचे रुपांतर एक्सप्रेसमध्ये करण्यात येणार आहे.
यामध्ये कोल्हापूर - पुणे, मिरज- हुबळी, मिरज- परळी आणि मिरज कॅसलरॉक पॅसेंजरचा समावेश
आहे. या गाड्यांचे थांबे देखील कमी करण्यात येणार आहेत. पॅसेंजर गाड्यांना निश्चित
ठिकाणी पोहोचण्यास विलंब लागत होता. या गाड्यांना प्रवासातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च
यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे या गाड्या एक्सप्रेस करण्यात येत आहेत.
****
देवीच्या
साडेतीन शक्तीपीठांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या
शारदीय नवरात्रोत्सवात आज भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांना माता तुळजाभवानी तलवार प्रदान करते, अशा स्वरुपात ही पूजा बांधण्यात येते.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार हे सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत: गृहविलगीकरणात असले तरीही ‘देवगिरी’
या शासकीय निवासस्थानातून त्यांचं कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री
हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध
असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही निर्णय प्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता
घेण्यात आली आहे असं उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
माजी
मंत्री एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी दोन
वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करतील. खडसे यांनी परवा भारतीय जनता पक्षाच्या
सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
****
जालना
जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या वाटूर इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची
भिंत फोडून चोरट्यांनी सहा लाख ६२ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली तिजोरी चोरून नेली.
बँकेतले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर, प्रिंटर, संगणक, पंखे आदी साहित्यही चोरट्यांनी
चोरून नेलं. या प्रकरणी बँक व्यवस्थापक शिवाजी
सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
धुळे
शहरातल्या जुन्या जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणी केली जात आहे. चारही तालुक्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची
तपासणी करण्यात येत असून, पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची
तपासणी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment