Tuesday, 22 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दि. 22.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘लिजन ऑफ मेरीट’ या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. भारत आणि अमेरिकेतली भागीदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंध वृद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोविड प्रादुर्भावामुळे पंतप्रधानांना विदेश दौरा शक्य नसल्यामुळे अमेरिकेतले भारतीय राजदूत संधु तरनजीत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

****

राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काल बैठक घेतली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. पाच जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.

****

सुधारित कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्यातले शेतकरी काल नाशिकहून दिल्लीकडे रवाना झाले. यामध्ये सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, महाड, मुंबई ठाणे यासह विविध जिल्ह्यातले सुमारे तीन हजार शेतकरी आणि कामगारांचा समावेश आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि केरळचे खासदार के. के. रागेश यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काल दिल्लीकडे रवाना झाला.

****

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोविड लसीकरणाची पूर्वतयारी वेगानं करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्राच्या कृती दलाची पहिली बैठक पार पडल्यानंतर या कार्यवाहीला वेग आला आहे. महापालिकेनं ८ लसीकरण केंद्रं निर्धारित केली आहेत.

****

नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

****

नागपूरचे महापौर भाजप नेते संदीप जोशी यांनी काल महापौर पदाचा राजीनामा दिला. महापालिका आयुक्त बी राधाकृष्ण यांच्याकडे त्यांनी महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द केला. ठरल्याप्रमाणे १३ महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं जोशी यांनी राजीनामा दिल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...