Tuesday, 4 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** देशात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला स्थगिती.

** कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळं या महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षा स्थगित.

** कोरोनाच्या संकटानं सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळं राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन.

आणि

** कोविड उपचारासाठीचे रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात ३५ हजार रुपयांमध्ये विकणाऱ्या दोघांना औरंगाबादमध्ये अटक.

 

****

देशात सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे. आयपीएलची कार्यकारी परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आपत्कालीन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या काही खेळाडूंना कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळं आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या राज्यपालांशी चर्चा केली आहे. तसंच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पश्चिम बंगालच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आज पोहोचले.

पश्चिम बंगालमध्ये महिलांना मारहाण करण्यात येत असल्याचं छायाचित्रण समाजमाध्यमावर प्रसिद्ध होत आहे. या घटनांवर पोलिसांनी मुकदर्शक न बनता कारवाई करावी, अशा सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचलकांना केल्या आहेत.

****

केरळ विधानसभेच्या निवडणूकीत यश मिळविलेल्या डाव्या पक्षांच्या आघाडीकडून सरकार स्थापनेसाठी पावले उचलण्यात येत आहेत. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या राज्य पॉलिट ब्यूरोची बैठक सुरू असून, यात मुख्यमंत्री पिनाराई विजयन, राज्य सचिव विजय राघवन सहभागी झाले आहेत. सरकार स्थापनेविषयीचा अंतिम निर्णय मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोच्या बैठकीत उद्या घेतला जाणार आहे. याशिवाय डाव्या आघाडीतील घटक पक्षांच्याही बैठका सुरू आहेत.

****

देशभरात वाढत असलेल्या कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळं या महिन्यात होणारी जेईईची मुख्य परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटी ही परीक्षा होणार होती. गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये होणारी परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. कोविड-१९ची सध्याची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे. परीक्षेसंदर्भातल्या पुढील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या संकेस्थळावर भेट द्यावी असंही निशंक यांनी सांगितलं आहे.

****

देशाच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा जवळपास १४ टक्के वाटा तर देशाच्या एकूण उत्पादनात १५ टक्के इतका वाटा आहे. उद्योग क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी वेळोवेळी आढावा घेवून योग्य नियोजन करावं लागत. यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची अचूक माहित असणं आवश्यक असतं, ही अचूक माहिती वेबपोर्टलच्या माध्यमातून आता सहज उपलब्ध होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

राज्याचं औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेबपोर्टलचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं आज झालं. त्यावेळी ते बोलत होते.

****

कोविड-१९ च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचं समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास १०९८ या हेल्पलाईनशी संपर्क साधावा किंवा स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सीच्या ८३२९०४१५३१ या क्रमांकावर माहिती द्यावी, असं आवाहन महिला आणि बालविकास आयुक्तालयानं केलं आहे. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असंही विभागानं कळवलं आहे.

****

देशातल्या पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचं आज मुंबईत खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रात जाण्यास अडचणी येत असताना देशातील पहिली ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रसुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यक्तींना गाडीतून लसीकरण केंद्रावर आणून गाडीतच लस दिली जाते आणि गाडीतून घरी सोडण्यात येतं. आजपासून हे लसीकरण सुरु करण्यात आलं असून समाजातील सर्व घटकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

****

कोविड १९ च्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत सांगितले. पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ठाकरे बोलत होते.

विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोविड-१९ ची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या २१ रुग्णांचा आज शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसंच अहमदनगर इथल्या पाच, जालना दोन आणि बुलडाणा, परभणी इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा आज घाटीत मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोविड विषाणू संसर्गानं दोन हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

कोविड उपचारासाठीचे रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात ३५ हजार रुपयांमध्ये विकणाऱ्या दोघांना आज औरंगाबाद शहर पोलिसांनी अटक केली. पोलिस आणि औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून या दोघांना अटक केली. परभणी इथून शेळके नामक व्यक्तिकडून ही औषधं घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रेमडेसिवीर औषधांसह एक लाख ८७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

संचारबंदी काळात औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यानं, पोलिस आयुक्त निखील गुप्ता हे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी आज विविध नाकाबंदीच्या ठिकाणावर जाऊन आढावा घेतला. तसंच त्यांनी स्वत: वाहनधारकांची चौकशी केली. औरंगाबाद शहरातील नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करत घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

जालना जिल्ह्यातल्या जालना, अंबड, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योनजेअंतर्गत ७३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. १६ रस्त्यांचा समावेश असलेल्या या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचं दानवे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.

****

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी नवीन आदेश लागू केले आहेत. या आदेशान्वये आजपासून १० मे रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व किराणा सामान, भाजीपाला, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई घर, खाद्य दुकाने यासह इतर प्रकारची दुकाने आणि आस्थापना बंद राहतील असे नमूद केलं आहे. वैद्यकीय सुविधा रुग्णालय आणि औषध विक्रेते यांना यातून सूट मिळाली आहे.

****

बीड जिल्ह्यात खरीप हंगामात खते, बियाणे यांचा काळाबाजार होऊ नये, शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे देत आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी खते आणि बियाण्यांच्या विक्री पुरवठ्यावर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय पथक तसंच प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वात हे पथक काम पाहणार आहे, असं कृषी विकास अधिकारी एस.एम.साळवे यांनी प्रसिध्दी पत्रकद्वारे कळवलं आहे.

****

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामूळे नांदेड शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. खाजगी रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारापोटी जे पैसे आकारले जात आहेत, ते शासनाच्या नियमानुसार वाजवी आहेत का ? कसं याची तपासणी करण्यासाठी शासनाकडून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी गरज भासल्यास संबंधित नोडल अधिकाऱ्याकडून बिलांची तपासणी करावी, असं नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कळविलं आहे.

****

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्ह्यातल्या कोरोना विषाणूच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांना तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा आणि उपकरणांसह विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आल्याचं सांगितलं. ही सर्व उपकरणे सुस्थितीत राहिली तरच त्याचा सामान्य नागरिकांना लाभ होईल असं स्पष्ट करुन वेळप्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करण्याचे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले.

//**************//

  

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 20 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...