Wednesday, 5 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

** मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आणि मागास आयोगाच्या अहवालावरुन मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं न्यायालयाचं मत

** न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाच्यादृष्टीनं दुर्देवी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच ठेवण्याचा निर्धार

** आरक्षणाचा बचाव करण्यात सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश - चंद्रकांत पाटील

णि

** शिक्षण हक्क कायद्यांतर्गंत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यावर राबवणार- शिक्षण संचालनालयाचं स्पष्टीकरण

****

मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवले जाऊ शकत नाही, ‌असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा कायदा रद्द ठरवला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा अहवाल यावरुन मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे.

१९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला विविध याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं आज हा निकाल दिला.

५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासारखी परिस्थिती नाही असं सांगत इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश न्यायालयानं वैध ठरवले आहे.

****

न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाच्यादृष्टीनं दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याआधी शहाबानो प्रकरण, ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात तसं३७०कलम काढण्यासंदर्भात, केंद्रानं तत्पर निर्णय घेन न्याय प्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी,” स ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्ताने कुणी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये. जनतेनं उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील, संही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

****

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा लढा संपला नसून या पुढची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आम्ही आजपर्यंत संवैधानिक प्रक्रियेनं आणि पूर्ण क्षमतेनं हा विषय मांडल्याचं सांगितलं. ते म्हणाले…..

केंद्र सरकारच्या अखत्यारित हा विषय आहे. त्यांनी ही जबाबदारी घ्यावी. केंद्र सरकार म्हणतना की आता केंद्रसरकारच्या अखत्यारित हा ‍विषय आहे. राष्ट्रपतींकडे हा अधिकार आहे. राज्यांनी तो शिफारस करुन पाठवावा. आम्ही सर्व ही प्रकीया पूर्ण करायला तयार आहोत. अजूनही हा लढा संपलेला नाही असं आमचं स्पष्ट मत आहे.

****

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने याचिका दाखल केलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले……

न्यायालयाच्या विरोधात आम्हाला बोलायचं नाही, परंतू हा निर्णय दुर्दैवी आहे. याचा परिणाम संपूर्ण तरुण पिढीवर होणार आहे. आणि याच्या बद्दल सुमारे एक हजार पेक्षा अधिक पानांची याची कॉपी आहे. ही पूर्ण फाइडिंगस आल्यानंतर, डिटेल्स ऑर्डर आल्यानंतर वकीलांसोबत चर्चा करुन समाजाच्या वतीने, तरुणांच्या वतीने काय पाऊल उचलायचं आणि कशा पद्धतीने पूढं जायचं याचा निर्णय आम्ही ऑर्डर आल्यानंतर घेऊ.

****

मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आलं असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजानं शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण गमावलं आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं सातत्यानं चुका केल्या. परिणामी गेल्या वर्षी आधी सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती आली आणि आता तर ते रद्दच झाले आहे असं ते म्हणाले.

****

राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चानं खंत व्यक्त करत, या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं.  औरंगाबाद इथं रमेश केरे पाटील आणि अप्पासाहेब कुढेकर यांनी क्रांती चौकात आत्मक्लेश आंदोलन केलं. परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जालना इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, अंबड तालुक्यातल्या साष्टपिंपळगाव इथं राष्ट्रीय महामार्ग ५२ वर ठिय्या आंदोलन सुरू केल्यानं महामार्गावर अनेक वाहने अडकून पडली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात सामूहिक मुंडण करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

नाशिक शहरातील पंचवटी कारंजा इथं शिव पुतळ्या समोर समाजाच्या स्थानिक नेत्यांनी आरक्षणाचा लढा पुन्हा नव्या जोमाने लढण्याची शपथ घेत, आज रात्री समाजाची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येईल असं मराठा क्रांती समाजाचे समन्वयक करण गायकर यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलनं केलं. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्य भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर भाजपाचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी नागपुरात टिळक पुतळा इथं आज सकाळी आंदोलन केलं. औरंगाबाद शहरात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुलजी सावे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. वैजापूर इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार दीपाली खेडकर यांना याबाबतचे निवेदन सादर केलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही आज बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त केला. उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. नाशिक इथं भाजपच्या खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, भाजप नेते विजय साने यांच्या उपस्थितीत तर धुळे शहरात खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं. सोलापूर इथं आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. 

****

शिक्षण हक्क कायदा- आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यावरच राबवण्यात येणार असल्याचं शिक्षण संचालनालयानं स्पष्ट केलं आहे. आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ उपलब्ध जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज दाखल झाले होते. शिक्षण संचालनालयानं ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली होती, त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातुळजापूर तालुक्यातील काटगाव इथल्या घट्टेवाडी शिवारात आज दुपारी वीज पडुन ३० शेळ्यांसह एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. धर्मेश कोळी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.

//*********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...