Thursday, 6 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** आरोग्य विभागाच्या १६ हजार पदांची तातडीनं भरती करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

** प्राणवायू, रेमडेसिवीरचा योग्य पुरवठा करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं नियोजन

** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे २४ रुग्णांचा मृत्यू तर बीड जिल्ह्यात एक हजार ४३७ नवे रुग्ण

आणि

** मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळं राज्यातल्या आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेवेळी मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती तातडीनं करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले...

साधारणपणे दोन हजार डॉक्टर्स ‘एम ओ’ ज्याला म्हणू आपण मेडिकल ऑफिसर आणि दोन हजार ‘स्पेशालिस्ट’ आणि जवळ जवळ बारा हजार ‘क’ आणि ‘ड’ वर्ग म्हणजे टेक्नीशियन, नर्सेस आणि वार्ड बॉय पासून ते शिपाया पर्यंतचे सर्व ड्रायव्हर आणि सगळे लोक हे सुद्धा आपण भरण्याचा निर्णय घेत आहोत. अॅडमिनीस्ट्रेशनचे, प्रशासनातले अन्य लोक असतील त्यांच्या सुद्धा जागा भरण्याच्या संदर्भातील निर्णय झालेला आहे. त्याची संपूर्ण शासन स्तरावरील कारवाई आम्ही आठवडा भराच्या आत पूर्ण करु, कारण आता फक्त मुख्यमंत्री स्तरावरवरच निर्णय घ्यायचा आहे. कॅबिनेटला जाण्याची गरज नाही.

नव्या प्राणवायू प्रकल्पांचे प्रस्ताव तपासण्याचं काम कृती दलाला दिलं असल्याचं सांगतानाच कर्नाटकातल्या बेळ्ळारी प्रकल्पातून महाराष्ट्राला होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणीही टोपे यांनी यावेळी केली.

****

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्राणवायूचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीनं त्याच प्रमाणं रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न आणि औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्यानं वाढलेली असून  या रूग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय प्राणवायू अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाद्वारे राज्यातल्या द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती प्राणवायू पुरवावा यासाठी पुरवठ्या बाबतचं विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येतं. त्याअंतर्गत आज प्रशासनानं उत्पादकांना १७१३ टन प्राणवायू पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यासाठी गेल्या २१ एप्रिलपासून आतापर्यंत आठ लाख नऊ हजार पाचशे रेमडेसिवीरचा साठा मंजूर झाला असल्याची माहितीही डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीच्या सर्वाधिक मात्रा देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातल्या २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही मात्रा देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत एक कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ मात्रा देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत एक कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. 

****

घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत असलेल्या सौम्य आणि लक्षणविरहित कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यानं रुग्ण वैद्यकीय दृष्ट्या सौम्य किंवा लक्षणविरहीत असल्याचं प्रमाणित करावं लागेल. ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या किंवा सहव्याधी असलेल्या रुग्णांना डॉक्टरकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच गृह विलगीकरणात राहून उपचार घ्यायची परवानगी दिली जाऊ शकते, याशिवाय ज्या रुग्णांना रोगप्रतिकारशक्तीवर आघात करणारे एड्स, कर्करोगासारखे आजार आहेत किंवा ज्यांचं अवयव प्रत्यारोपण झालेलं आहे अशा रूग्णांना गृह विलगीकरणात ठेवू नये अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची शिफारस आहे. मात्र डॉक्टरकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतर अशा रुग्णांना गृह विलगीकरणात राहून उपचार घ्यायची परवानगी दिली जाऊ शकते, असं या सूचनांमधे म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय -घाटीमध्ये आज कोरोना विषाणू संसर्गामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पंधरा आणि अहमदनगर इथल्या सात तसंच जालना आणि जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत दोन हजार ६७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घाटीत या संसर्गाचे ७८ नवे रुग्ण आज दाखल झाले तर २२ रुग्णांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली. 

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार ४३७ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३४५ रुग्ण हे बीड तालुक्यात, अंबाजोगाई २४२, केज १९५, पाटोदा १२६, गेवराई १०७, शिरुर ९०,  धारुर ८५, आष्टी ८४, माजलगाव आणि परळी प्रत्येकी ५८ आणि वडवणी इथल्या ४७ रुग्णांचा समावेश आहे.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना अटकेपासून हंगामी संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या विभागानं देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवला आहे. तो रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज त्याची सुनावणी करताना न्यायालयानं त्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाकडून जाब मागितला आणि सुनावणी उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत तहकूब केली. यावेळी हंगामी संरक्षणाचा आदेश द्यायला न्यायालयानं नकार दिला असून अगदीच तातडी असेल तर त्यासाठी देशमुख सुट्टीकालीन पीठाकडे जाऊ शकतात, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं आहे. दुष्काळमुक्ती आणि समतेचा मार्ग दाखविणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना शत शत नमन, या शब्दांमध्ये विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

****

उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजू मांडण्यात भारतीय जनता पक्ष महायुतीचं तत्कालीन सरकार यशस्वी झालं असताना महाविकास आघाडी सरकार मात्र सर्वोच्च न्यायालयात अपयशी ठरल्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी स्वीकारावी, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या निकालाचे आज ठिकठिकाणी पडसाद उमटले. हिंगोली जिल्ह्यातल्या नांदेड - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा इथं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ `रस्ता बंद` आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी पोलीसांना निवेदन सादर केलं. नांदेड इथं युवक नेते मारुती वाघ मित्र मंडळानं आसना चौरस्ता इथं `चक्काजाम` आंदोलन केलं. यावेळी आसना पुलाच्या दुतर्फा वाहतूक एक ते दीड तास खोळंबली होती. लोहा इथंही आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर केंद्र सरकार आणि  राज्य सरकारचा निषेध करणारं आंदोलन करण्यात आलं.

****

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आजपासून तीन दिवस मराठवाड्यातल्या सर्व  जिल्ह्यात  तुरळक ठिकाणी वादळीवारा,  विजांचा कडकडाट आणि  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात आगामी खरीप पेरणी हंगाम पुर्व तयारी लक्षात घेऊन आजपासून सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळात कृषी साहित्य विक्री दुकानं सुरू ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. यात बि-बियाणं, खतं, किटक नाशक, औजारं दुरूस्ती आणि विक्री यांचा समावेश आहे.

****

नांदेड इथले जुन्या पिढीतले काँग्रेस पक्षाचे नेते मधुकरराव जालनेकर यांचं आज सकाळी वृध्दापकाळानं निधन झाले. ते ८८ वर्षे वयाचे होते. जालनेकर हे नांदेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष तसंच नांदेड मंर्चट्स् को- ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष होते.

****

परभणी इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या कोविड केंद्रांच्या प्राणवायू प्रकल्पामध्ये गळतीच्यावेळी मोठी समयसूचकता, धाडस दाखवून प्राणवायूची गळती रोखल्याबद्दल अभियंता सुनील कुलकर्णी यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी आज कौतूक केलं आहे. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी खान यांनी आज भेट दिली. त्यांच्यामुळं रुग्णालयातील १९ रुग्णांचे जीव धोक्यात जाण्यापासून वाचले. हे काम निश्चितच प्रेरणादायी आणि अभिनंदनीय असल्याचं खासदार खान यांनी म्हटल आहे.

//***********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...