Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत राज्य सरकारचा बालचिकित्सा विशेष कृती दल स्थापन
करण्याचा निर्णय
**
येत्या २६ मेपर्यंत राज्यात १८ ते ४४ वयोगटाचं कोविड लसीकरण शक्य नाही -आरोग्यमंत्री
राजेश टोपे
** औरंगाबाद इथं १५ तर जालन्यात आज १० कोविडग्रस्तांचा
मृत्यू
आणि
** परभणी जिल्ह्यात कोविड
रुग्णांसाठी 'पीबीएन लाईव्ह बेड्स' हे मोबाईल
ॲप विकसित
****
कोविड
प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत राज्य सरकारने बालचिकित्सा विशेष कृती दल स्थापन करण्याचा
निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते आज आज ऑनलाईन
माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधत होते.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमधेही संसर्गाचं प्रमाण वाढल असल्याचं आढळलं, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. या कृती
दलाच्या शिफारसी नुसार लहान मुलांसाठीच्या रुग्णखाटा, अतिदक्षता
विभाग, व्हेंटिलेटर्स अशा सुविधा उभारल्या जाणार असल्याची
माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
दरम्यान, येत्या २६ मेपर्यंत राज्यातल्या १८ ते ४४ वयोगटाल्या
नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण करणं शक्य नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांनी म्हटलं आहे. १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्याला कोविड
लसीच्या १७ लाख ३९ हजार मात्रा मिळाल्या. मात्र
आता लसींचा पुरेसा साठा नसल्यानं सध्या लसीकरण होऊ शकत नसल्याचं टोपे म्हणाले.
केंद्र सरकारनं राज्याला कोविड लसीच्या
पुरेशा मात्रा द्याव्यात अशी मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
आत्तापर्यंत राज्यातल्या एकूण १ कोटी ७३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं कोविड
प्रतिबंधक लसीकरण झालं असून, २८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना
लसीची दुसरी मात्रा दिली आहे, मात्र अजूनही अनेक नागरिक लसीच्या दुसऱ्या
मात्रेच्या प्रतिक्षेत असल्याकडे टोपे यांनी लक्ष वेधलं.
कोविड लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र, देशात पहिल्या
क्रमांकावर आहे मात्र, राज्यात ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या
नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी लसींचा, विशेषतः कोव्हॅक्सिन
या लसीच्या मात्रांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचं त्यांनी
सांगितलं.
राज्याला सध्या सतराशे मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायूची गरज आहे. सध्या राज्यात
हवेतून प्राणवायू निर्मिती करायचे ३८ प्रकल्प सुरु झाले असल्याचं
टोपे यांनी सांगितलं.
केंद्राकडून राज्याला रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा होणारा
पुरवठा वाढवावा अशी मागणी टोपे यांनी केली आहे. या इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर
नियंत्रण ठेवायची गरज आहे असं टोपे म्हणाले. राज्याला ३ लाख
रेमेडिसिव्हीर इंजेक्शन खरेदीसाठी मान्यता मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, केंद्र सरकारने रेमडेसिवीर औषध वाटपासाठी विशेष योजना
सुरू केली आहे. केंद्रीय रसायन आणि खतं मंत्री सदानंद गौडा यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रासह
इतर अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीरच्या पुरवठ्यात अधिक सुलभता आणि वाढ होईल, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा समाजातील प्रस्थापित सुभेदारांनीच समाजाचं नुकसान केलं असून
त्यांच्यामुळेच आरक्षण रद्द झाल्याची टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. गरीब मराठा समाजाला
आरक्षण दिलं तर ते मोठे होतील या भीतीनं मराठा समाजाच्या सरदारांनी जाणीव पूर्वक
आरक्षण दिलं नाही, असं सांगत सदाभाऊ खोत यांनी आघाडी
सरकारच्या नेत्यांवर गंभीर टीका केली. येत्या सोमवारी सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत 'माझे आंगण हेच रणांगण' हे आंदोलन होणार असल्याचं
त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
मुंबईत मनोरा
आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचं कंत्राट सहाशे कोटी रुपयांवरून नऊशे कोटी केल्यानं हे कंत्राट तत्काळ रद्द करुन या प्रकरणाची सखोल चौकशी
करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अवघ्या दोन वर्षाच्या काळात हा खर्च ६६
टक्क्यांनी कसा वाढला, असा प्रश्न करत, हा तीनशे कोटींचा घोटाळा कोणाचा आहे, असंही भातखळकर यांनी विचारलं आहे.
एवढ्या वाढीव दराचं कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तत्काळ रद्द करावं
अन्यथा भारतीय जनता पक्ष या विरोधात आंदोलन करेल असा इशारा, भातखळकर यांनी दिला आहे.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या १३ आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या
दोन अशा एकूण १५ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोविड विषाणू संसर्गानं
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ६९६ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ८४० झाली आहे.
दरम्यान, आज ६८८ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५१ हजार ५८५
झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ८०५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.
आजपर्यंत जिल्ह्यातले ४४ हजार ३५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित
असलेल्या ६ हजार ७१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड
मध्ये आज एक हजार ३१४ नवे कोविड बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक ४१९ रुग्ण
हे बीड तालुक्यातले असून अंबाजोगाई इथले २४२, परळी १२३, केज १००, धारुर ९१, माजलगाव
७६, शिरुर ६७, पाटोदा ६६, गेवराई ५४, आष्टी ४२ आणि वडवणी इथल्या ३४ जणांचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या चांधई ठोंबरे इथले शाहीर गणपतराव
ठोंबरे यांचं आज अल्पशा आजारानं निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. ठोंबरे यांनी
अनेक लोकनाट्य, नाटके, शाहिरी
कार्यक्रमांमधून विविध भूमिका केल्या आहेत.
****
परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांच्या संकल्पनेतून 'पीबीएन लाईव्ह बेड्स' हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं आहे. या ॲपद्वारे जिल्ह्यातल्या सर्व कोविड रुग्णालयातल्या रिक्त रुग्णखाटांची माहिती उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून
नागरीकांना हे ॲप विनामूल्य डाऊनलोड करता येईल तसंच लवकरच हे ॲप गूगल ॲप स्टोअरवरून सुद्धा विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या बिडकीन इथे आज सकाळी ११ वाजेनंतरही दुकान सुरु ठेवणाऱ्यांवर प्रशासनानं
दंडात्मक कारवाई केली. यामध्ये चार दुकानदारांसह ग्राहकांनाही दंड करण्यात आला, या
कारवाईत एकूण ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच या चारही दुकानांना सील ठोकण्यात
आल्याचं प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. महसूल प्रशासन, मंडळ अधिकारी, तलाठी,
पोलीस प्रशासन, आणि ग्रामपंचायतीने संयुक्त रित्या ही कारवाई केली.
****
परभणी शहरातल्या एका दुकानदाराविरुध्द
अत्यल्प दंड आकारल्याबद्दल महापालिका प्रशासनानं पथकातील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावली आहे. दोन दिवसांपूर्वी
महापालिकेच्या पथकानं संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन
केल्याप्रकरणी या दुकानावर छापा टाकला होता, त्यावेळी दुकानदाराला अत्यल्प रकमेचा
दंड ठोठावल्याबद्दल पथकातील कर्मचाऱ्यांविरुध्द ही कारवाई करण्यात आली.
****
उस्मानाबाद तालुक्यातील तेर इथं श्री संत गोरोबा काका यांच्या
वार्षिक यात्रा सोहळा आज भाविकांविना साजरा झाला. दरवर्षी दशमीपासून अक्षय तृतीया पर्यंत
ही यात्रा भरते. आज एकादशी निमित्त धनंजय पुजारी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
****
रेमडेसिवीर
इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी परभणी इथल्या माधव अशोक शेळके
याला औरंगाबाद पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सोलापूर-धुळे
महामार्गावर अटक केली. जप्त केलेल्या या इंजेक्शनवर 'फक्त महाराष्ट्र सरकारसाठी'
असा उल्लेख आहे. शेळके याची पत्नी परभणी
जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी असल्यानं, तिच्यामार्फत शेळके यानं हे इंजेक्शन
मिळवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी शेळके पाठोपाठ त्याच्या
पत्नीचाही जबाब नोंदवण्याच्या हालचाली सुरू केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या
दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. वसमत, औंढा,
कळमनुरी तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्यानं,
विजेचे खांब आणि तारा तुटून पडल्या. या पावसाने आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
****
औरंगाबादचे
माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी वाढदिवस साजरा करतांना गर्दी जमवल्यामुळे आणि कोविड
प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यासह २५ ते ३० जणांविरोधात आज गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
//*********//
No comments:
Post a Comment