Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०५ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं.
नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने
धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित
रहा.
****
·
मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता.
·
ऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रीक टनांची वाढ करण्याची राज्याची केंद्र सरकारकडे
मागणी.
·
इंडियन प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
होणारी, संयुक्त प्रवेश मुख्य परीक्षा स्थगित.
·
राज्यात ५१ हजार ८८० नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १६० जणांचा मृत्यू
तर सहा हजार १८८ बाधित.
आणि
·
औरंगाबाद शहरात १६ मे पासून हेल्मेट सक्ती.
****
मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानं
संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मराठा आरक्षण
कायदा पारित केला असल्याचं, मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रीमंडळ
उपसमितीचे अध्यक्ष, अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल समाज माध्यमांवरून बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयात एकशे दोनावी घटनादुरूस्ती आणि ५० टक्के आरक्षण मर्यादा या दोन्ही
प्रमुख मुद्यांवर राज्य सरकार आणि आरक्षण समर्थक खासगी याचिकाकर्त्यांकडून प्रभावी
युक्तिवाद झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. गुणवत्तेच्या आधारे मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्राला
न्याय मिळेल, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली, ते म्हणाले –
मराठा आरक्षण संदर्भातला निकाल जो आहे हा सुप्रीम कोर्ट देणार असल्याची माहिती
मिळालेली आहे. मराठी आरक्षणाच्या बाजुनेच हा निकाल सुप्रीम कोर्टात लागेल असं माझं
ठाम मत आहे. याला कारणं अशी आहेत की, सर्व संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच मराठा आरक्षणाच्या
समर्थनार्थ सगळी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे.
****
राज्यात ऑक्सिजनची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सध्या केंद्र शासनाकडून
होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रीक टनांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्य
सरकारनं केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट
सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवलं आहे. राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये
वेगानं वाढ होत आहे, त्यामुळे ऑक्सीजनचा कोटा वाढवण्याची गरज असल्याचं, त्यांनी या
पत्रात स्पष्ट केलं. लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध
करून द्यावेत, ऑक्सिजन लिफ्टींगची सुविधा राज्याच्या सोयीची असावी, अशी मागणीही कुंटे
यांनी या पत्रात केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मिशन ऑक्सिजनची घोषणा केली. राज्यातली
ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनापर्यंत वाढवण्याचं नियोजन असून, कोविड केंद्रांचीही
संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पेटीएम फाऊंडेशनच्या वतीनं राज्यात ऑक्सिजन
निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात
येणार आहे, त्या अंनुषंगानं आयोजित ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. कोविड-19
च्या संकटानं सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे, त्यामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था
आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
देशात सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेला स्थगिती
देण्यात आली आहे. आयपीएलची कार्यकारी परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आपत्कालीन
बैठकीत, काल हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या काही खेळाडूंना
कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे, आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात
आलं होतं, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
देशभरात वाढत असलेल्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे, या महिन्यात अभियांत्रिकी
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी, संयुक्त प्रवेश परीक्षा-जे ई ई ची मुख्य परीक्षा,
स्थगित करण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटी ही परीक्षा होणार होती. गेल्या महिन्यात
म्हणजे एप्रिलमध्ये होणारी परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. कोविड-19 ची सध्याची
परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचं,
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ट्विट संदेशात सांगितलं. परीक्षेसंदर्भातल्या
पुढील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या संकेस्थळावर भेट द्यावी, असंही निशंक यांनी
म्हटलं आहे.
****
कोविड-19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना, बेकायदेशीररित्या
दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचं, समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता
दिसून येत आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास, १०९८, या हेल्पलाईनशी
संपर्क साधावा, किंवा स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सीच्या, ८३ २९ ०४ १५ ३१, या क्रमांकावर
माहिती द्यावी, असं आवाहन, महिला आणि बालविकास आयुक्तालयानं केलं आहे. समाज कंटकांकडून
अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून, त्यावर कायद्यानुसार
कठोर कारवाई केली जाईल, असंही विभागानं कळवलं आहे.
****
राज्यात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा कायम आहे, मात्र लसीकरणाबाबत कसलीही तडजोड
केली जाणार नसल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
यासाठी बाहेरूनही लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. केंद्राकडून मिळालेल्या
कोविशिल्ड लशीच्या नऊ लाख मात्रा ४५ वर्षांवरच्या नागरिकांना दिल्या जाणार असल्याचं
टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले–
कोविशिल्डचे नऊ लाख डोसेज
आलेत. त्यामुळे ४५ वर्षाच्या वरील लोकांच्या व्हॅक्सिनसाठी हे नऊ लाख डोसेज आता आपल्याला
पूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आणि प्रत्येक सेंटरवर पाठवावे लागतील
आणि ते आपल्याला द्यायचे आहेत. ४५ वर्षाच्या वरच्या एक कोटी ७५ लाख लोकांना आपण व्हॅक्सिनेट
केलेलं आहे. एकूण साधारणपणे साडेतीन कोटी लोकांपैकी ही पर्सेंटेज अंदाज ४५ टक्क्याच्या
दरम्यान आहे. कुठल्याही परिस्थितीत लसीकरण करणं महामारीचा सगळ्यात उत्तम उपाय आहे.
****
राज्यात काल ५१ हजार ८८० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या ४८ लाख २२ हजार ९०२ झाली आहे. काल ८९१ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७१ हजार ७४२
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ६५ हजार ९३४ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४१ लाख सात हजार ९२ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक १६ शतांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात सहा लाख ४१ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा हजार १८८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
१६० जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला.
मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४३, लातूर ३५, परभणी २०, बीड १९, नांदेड
१५, जालना १३, उस्मानाबाद ११ तर हिंगोली जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात एक हजार ४९९ रुग्ण आढळले. लातूर १ हजार २१७, औरंगाबाद जिल्ह्यात
काल ९८१, परभणी ८४४, उस्मानाबाद ७८६, नांदेड ४९०, जालना ३०६, तर हिंगोली जिल्ह्यात
६५नवे रुग्ण आढळून आले.
****
अत्यावश्यक नसलेल्या आणि अधिक मनुष्यबळाची उपस्थिती आवश्यक असलेल्या सर्व आर्थिक
घडामोडी, पुढील दोन आठवड्यांसाठी कमी कराव्यात, अशी सूचना, भारतीय उद्योग संघटना -
सीआयआयनं उद्योगांना केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक
असल्याचं, सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
उद्योगांनी आपल्या कामकाजाचा आढावा घेत, कमीत कमी मनुष्यबळ वापरून व्यवहार सुरू ठेवावेत,
असं आवाहन कोटक यांनी केलं आहे.
****
कोविड बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयांमधल्या
रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव यासंदर्भात खासदार इम्तियाज जलिल यांनी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती
एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस डी कुलकर्णी यांनी, रिक्त पदं कशी भरणार आणि
वैद्यकीय सुविधा कशा उभारणार, याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश, केंद्र आणि राज्य
सरकारला दिले आहेत. या याचिकेची पुढची सुनावणी सात मे रोजी होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
वाढत असून, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी,
वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मराठवाडा
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे
केली आहे.
आमदार चव्हाण यांनी काल लोहाराच्या ग्रामीण रूग्णालय आणि उमरग्याच्या उपजिल्हा
रूग्णालयाला भेट देऊन, परिस्थितीचा आढावा घेतला. इथल्या रूग्णालयाकडे आवश्यक वैद्यकीय
यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्यानं, गंभीर रूग्ण तुळजापूर किंवा उस्मानाबाद याठिकाणी उपचारासाठी
जात आहेत, मात्र त्याठिकाणी देखील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्यानं, रूग्णांची
मोठी गैरसोय होत असल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं.
****
पवित्र रमजान महिन्यात पुढील दहा दिवसांत मुस्लिम बांधवांना, ईद निमित्त साहित्य
खरेदीसाठी, दुपारी तीन ते सहा या कालावधीत सूट द्यावी, अशी मागणी, परभणीच्या महापौर
अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे आणि सभागृह नेता सय्यद समी सय्यद साहेबजान
लाला यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना एक निवेदन
सादर केलं.
****
लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर शहर तसंच महानगरपालिका, जिल्हा
परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोविडचा
प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या, तसंच रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या
कामी सर्वानी सक्रिय होण्याचं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनानं
जिल्ह्यातल्या प्रत्येकाचं लसीकरण करण्यावर भर देताना, १०० दिवसांच्या लसीकरणबाबतचा
आराखडा तयार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या कुपटा या गावात, कोरोना विषाणू संसर्गानं
सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील ४९ बाधितांवर उपचार सुरु असल्याची महिती, उपविभागीय
अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली. विशेष तपासणी मोहिमअंतर्गत काल गावातल्या ५५० जणांची
कोविड चाचणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितंलं.
****
जालना जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या एकूण लसीकरणामध्ये, दोन लाख ९२० नागरिकांनी
कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १८ ते ४४ वयोगटातल्या, दोन
हजार ४६४ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. शहरातल्या पाणीवेस भागातल्या नगरपालिकेच्या
प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर, काल लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली होती, यामध्ये तरुणांचं
प्रमाण अधिक आहे. मात्र, लसीचा तुटवडा असल्यानं अनेकांना रांगेत उभं राहूनही लस न घेताच
माघारी जावं लागत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेअंतर्गत विविध विभागात वर्षानुवर्षापासून रोजंदारीवर काम
करणाऱ्या ६७ कर्मचाऱ्यांना, काल राज्य सरकारच्या मान्यतेनं, महापालिका सेवेत कायम करण्यात
आलं. याचबरोबर ११ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात राज्य कृती दल समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार, बाधित रुग्णांवर
उपचारासाठी रेमडिसीवीर या औषधाचा वापर करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या डॉक्टरांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत
होते. रेमडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नसून, ते फक्त कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा, रुग्णालयातला
कालावधी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे बाधित रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी
याबाबत आग्रह धरु नये, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
कोविड उपचारासाठीचे रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात ३५ हजार रुपयांमध्ये विकणाऱ्या
दोघांना, काल औरंगाबाद शहर पोलिसांनी अटक केली. पोलीस आणि औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी
सापळा लावून या दोघांना अटक केली. परभणी इथून शेळके नामक व्यक्तिकडून ही औषधं घेतल्याचं
त्यांनी सांगितलं आहे. रेमडेसिवीर औषधांसह एक लाख ८७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल,
त्यांच्याकडून जप्त करण्यात आला असून, त्यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
****
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर, काल दुपारी नवीन आदेश लागू केले. या आदेशान्वये १० मे रोजी सायंकाळी
७ वाजेपर्यंत जिल्ह्यातले सर्व किराणा सामान, भाजीपाला, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई,
खाद्य दुकाने यासह इतर प्रकारची दुकानं आणि आस्थापना, बंद राहतील, असं नमूद केलं आहे.
वैद्यकीय सुविधा, रुग्णालय आणि औषध विक्रेते यांना यातून सूट राहणार आहे. कालपासून
हा आदेश लागू झाला.
****
औरंगाबाद शहरात १६ मे पासून हेल्मेट सक्तीचे आदेश पोलिस विभागानं काल जारी केले.
कोविड बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधांबाबत औरंगाबाद खंडपीठानं
स्वत:हून दाखल करुन घेतलेल्या सुमोटो याचिकेत मास्कचा वापर, आधारकार्ड सोबत बाळगणं
आणि दुचाकीधारांना तसंच मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले
होते. मात्र त्यावर काहीच अंमलबजावणी न झाल्याचं निदर्शनास आल्यानं, यासंदर्भात काय
कारवाई केली अशी विचारणा खंडपीठानं केली होती. त्यानंतर काल हेल्मेट सक्तीचे आदेश जारी
करण्यात आले.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ
काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती
भगतसिंह कोश्यारी होते. यावेळी बोलतांना कोश्यारी यांनी, एक विकसीत देश घडवण्याच्या
दृष्टीनं विद्यार्थ्यांनी शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासावी, असं आवाहन केलं.
****
No comments:
Post a Comment