Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
देशात आतापर्यंत
कोविड प्रतिबंधक लसींच्या १६ कोटी २४ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. १३ कोटींहून
अधिक नागरिकांना लसीची पहिली मात्रा, तर तीन कोटींपेक्षा जास्त व्यक्तींना दुसरी मात्रा
मिळाली आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या दोन लाख २९ हजार नागरिकांचं काल लसीकरण झालं.
****
देशातली १२ राज्य
आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या घटत असल्याचे संकेत मिळत
आहेत, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड,
गुजरात, झारखंड आणि लड्डाखचा समावेश असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल
यांनी सांगितलं.
****
माजी केंद्रीय
मंत्री, राष्ट्रीय लोक दलचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं आज कोविड संसर्गानं निधन
झालं. चौधरी अजित सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंह राव आणि डॉ मनमोहन
सिंह यांच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रालयं हाताळली होती. चौधरी अजित सिंह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह
यांचे पुत्र होत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी
अजित सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
पश्चिम बंगालमध्ये
विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं
चार सदस्यांचं पथक पश्चिम बंगालमध्ये पाठवलं आहे. हे पथक हिंसाचाराच्या घटनांची माहिती
घेणार घेऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
****
सामाजिक सुधारणांचे
पुरस्कर्ते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन
करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे.
शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यांसह कृषी- सिंचन, औद्योगिक क्षेत्रांतील
विकासात्मक दृष्टी यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही
दिशादर्शक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या
सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या सुरक्षेची, राष्ट्रीय सुरक्षा
परिषद तपासणी करणार असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांत रुग्णालयात होणारे अपघात लक्षात घेता रुग्णालयाची सुरक्षा तपासणी
गरजेची असून, ही प्रक्रिया लवकरचं सुरु होईल, असं ते म्हणाले. सुरक्षेची तपासणी ही
रुग्णालयाची गुणवत्ता, रुग्णांचं सरंक्षण आणि मनुष्यबळाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असल्याचं
देशमुख यांनी सांगितलं. संपूर्ण प्रकियेसाठी जवळपास ३७ लाख २२ हजार रुपये खर्च येणार
असल्याचं ते म्हणाले.
****
शिक्षण हक्क
कायदा-आरटीई अंतर्गत, खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया,
संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यावरच राबवण्यात येणार असल्याचं, शिक्षण संचालनालयानं
स्पष्ट केलं आहे. आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी, राज्यात नऊ हजार ४३२ शाळांमध्ये
९६ हजार ६८४ उपलब्ध जागांसाठी, दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज दाखल झाले होते. शिक्षण संचालनालयानं
सात एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली होती, त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना
प्रवेश जाहीर झाले आहेत.
****
निलंबित मुंबई
पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे आणि रियाझुद्दीन काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत
विशेष न्यायालयानं या १९ मे पर्यंत वाढ केली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर
बॉम्ब ठेवल्याप्रकरणी या दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली असून, बेकायदेशीर
कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर विविध गुन्हे नोंदवले आहेत.
****
चार हजार ३५५
कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या तीन माजी संचालकांना
काल मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. न्यायाधीश पी.डी.नाईक यांनी रोख एक लाख
रुपयांच्या करारनाम्यावर मुक्ती बाविसी, तृप्ती बने आणि रणजीत तारा सिंह यांचा जामीन
मंजूर केला असून, त्यांना त्यांचे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान,
बँकेचे मूल्यनिर्धारक डॉक्टर विश्वनाथ प्रभू यांची जामीन याचिका न्यायालयानं फेटाळली
आहे.
****
तात्पुरती स्थगित
झालेली १४ वी आयपीएल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय प्रशासन सध्या पर्यायी मार्गाच्या
शोधात आहे. आतापर्यंत ६० पैकी २९ सामने खेळले गेले असून, राहिलेले ३१ सामने येत्या
सप्टेंबरमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अगोदर नियोजित करण्याचा, बीसीसीआयचा
विचार आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सप्टेंबरचा पर्याय नाकारला नसून, आंतरराष्ट्रीय
क्रिकेट मंडळ आणि इतर देशांच्या समितीसाठी प्रतीक्षा करण्याचं सांगितलं आहे. टी-20
विश्वचषक १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अनिश्चिततेसह पार पडणार असून, भारत
यंदाचा आयोजक आहे. ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे संयुक्त अमिरातीमध्ये होण्याची शक्यता
वर्तवली जात आहे.
****
No comments:
Post a Comment