आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
देशातली १२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या घटत
असल्याचे संकेत मिळत आहेत, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर
प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड आणि लड्डाखचा समावेश असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे
सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
****
देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या १६ कोटी २४ लाखांहून अधिक मात्रा देण्यात
आल्या. १३ कोटींहून अधिक नागरिकांना लसीची पहिली मात्रा, तर तीन कोटींपेक्षा जास्त
व्यक्तींना दुसरी मात्रा मिळाली आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या दोन लाख २९ हजार नागरिकांचं
काल लसीकरण झालं.
****
माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय लोक दलचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं आज कोविड
संसर्गानं निधन झालं. चौधरी अजित सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंह
राव आणि डॉ मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रालयं हाताळली होती. चौधरी
अजित सिंह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र होत.
****
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातल्या कनिगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये
झालेल्या चकमकीत अलबद्र संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. यावेळी एका दहशतवाद्याने
आत्मसमर्पण केलं. आज सकाळी शोधमोहीमेदरम्यान ही चकमक झाली.
****
आयडीबीआय बँकेमधून धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याला आणि व्यवस्थापनावर असलेल्या
नियंत्रणाचं हस्तांतरण करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल तत्त्वत: मंजुरी दिली.
भारत सरकार आणि एलआयसी किती समभागांची निर्गुंतवणूक करणार हे रिझर्व्ह बँकेशी विचार
विनिमय करून निश्चित केलं जाईल.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यातील डोंगरी भागात सध्या मोहफुले
संकलनाचं काम जोरात सुरू आहे. शासनानं मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्यानं
अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या
रद्द केल्या आहेत. मुंबई-जालना-मुंबई ही रेल्वे गाडी १० मे ते एक जुलैपर्यंत, कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर
ही रेल्वे गाडी, १० मे ते २८ जूनपर्यंत, तर लातूर - मुंबई रेल्वे ३० जूनपर्यंत धावणार
नसल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment