Thursday, 19 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** राज्यात कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या जिल्ह्यांत सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज - केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांचं प्रतिपादन 

** कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेनं ५६ कोटीचा टप्पा ओलांडला

** देशात आजपासून संस्कृत सप्ताहाचं आयोजन

आणि

** टाळेबंदीचे निर्बंध शिथील करण्यात आलेल्या जिल्ह्यांत शैक्षणिक संस्था सुरू करण्याची परवानगी द्यावी - आमदार  हरीभाऊ बागडे यांची मागणी

****

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थीती अद्यापही चिंताजनक आहे त्या जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या `जनआशीर्वाद` यात्रेदरम्यान त्या आज नंदुरबार इथं पोहचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्राणवायू अभावी कोरोना विषाणू बाधित किती रुग्णांचा मृत्यु झाला याबाबत राज्याकडुन केंद्राला अद्याप माहीती मिळालेली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या सर्वाधिक मात्रा महाराष्ट्राला देण्यात आल्या असून राज्यातल्या एक लाख मात्रा वाया गेल्याचंही त्या म्हणाल्या. आजच्या छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकारांची छायाचित्र काढून मंत्री पवार यांनी त्यांना सन्मानित केलं.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला आज मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनआशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला. यात्रेदरम्यान राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेनं ५६ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात ५६ लाख ३६ हजार ३३६ नागरीकांना लस देण्यात आली. आतापर्यंत या लसीच्या ५६ कोटी ६४ लाख ८८ हजार ४३३ मात्रा देण्यात आल्या आहेत.  दरम्यान, देशात काल नव्या ३६ हजार ४०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या तीन कोटी २३ लाख २२ हजार २५८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३९ हजार १५७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण दाखल झाला. तर बीड जिल्ह्यातल्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७९९ झाली असून एक लाख ४४ हजार १०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ५२३ रुग्ण दगावले आहेत.

****

देशात आजपासून येत्या २५ तारखेपर्यंत संस्कृत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्कृत सारख्या प्राचीन भाषेला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय बनवण्यासाठी या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भाषातज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्कृत भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं.

****

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची आज शपथ घेतली. राजभवन इथं आज एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती एम एल तहलियानी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये संपल्यापासून हे पद रिक्त होतं.

****

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळं या पक्षांचा अवकाश कमी होऊन त्यांचा श्वास कोंडला गेला आहे तर दुसरीकडे आपल्या पक्षाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासानं काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी आज पुण्यात एका पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी व्यक्त केला. शिवसेनेसोबत युतीमध्ये असताना पक्षाला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

****

औरंगाबादचे मेजर साकेत पाठक यांना सेनादलाचं प्रतिष्ठेचं पदक जाहीर झालं आहे. पुलवामा इथं गेल्या ८ एप्रिलला दहशवाद्यांसमवेत झालेल्या कारवाई दरम्यान मेजर पाठक यांनी दाखवलेल्या शौर्याची नोंद घेत भारतीय लष्करातर्फे त्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली असून लवकरच हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मेजर पाठक त्या कारवाईमध्ये जखमीही झाले होते.

****

राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर, भोकर या महसुल मंडळात मुसळधार तर बिलोली, अर्धापूर, मुदखेड, मुखेड या महसुल मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर ऊमरी, नायगाव, हिमायतनगर, लोहा, धर्माबाद, कंधार या महसुल मंडळात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरातही सकाळपासून संततधार सुरु आहे. दौलताबाद परिसरातही दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. पावसामुळे घाट परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.

****

राज्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयं आणि खाजगी शिकवणी सुरू करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा येत्या सोमवारपासून स्वनियमावली तयार करून सुरक्षित अंतर आणि पन्नास टक्के क्षमतेसह शाळा महाविद्यालयं सुरू करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते, संस्थाचालक आमदार हरीभाऊ बागडे यांनी दिला आहे. त्यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्य, गोरगरीब खेड्यापाड्यापर्यंत पोहचत नसून टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांना मोबाईल घ्यायला, इंटरनेट चालवायला पैसाच उपलब्ध नाही, असं ते म्हणाले. राज्य शासनानं निदान इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे तीन विषय पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना `ऑफलाईन` शिकवण्याची परवानगी द्यावी असंही त्यांनी सांगितलं. या संदर्भातलं मागणीचं निवेदन सरकारकडे पाठवलं असल्याचं बागडे यांनी नमुद केलं.

****

राज्य सरकारनं मराठा समाजासंदर्भात आतापर्यंत काढलेल्या विविध योजनांच्या शासन निर्णयाची औरंगाबाद इथं आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं होळी करण्यात आली. शासनानं काढलेले हे सर्व निर्णय फसवे असून समाजाची दिशाभुल केली जात असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी यावेळी केला. मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी रमेश केरे यांच्यासह काही आंदोलनकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं.

                                   ****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित उन्नत भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय स्तरावरच्या कोविड जनजागृती भित्ती पत्रक आणि चित्रिकरण स्पर्धांचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भितीपत्रक स्पर्धेतील प्रथम पारितोषिक बरलीन फर्नांडिस यांना तर द्वितीय पारितोषिक मानसी बोरा आणि तृतीय पारितोषिक ऐश्वर्या येमुल यांना जाहीर झालं आहे. चित्रिकरण स्पर्धेत प्रथम पारितोषिक रवींद्रकुमार एन टी यांना तर द्वितीय पारितोषिक रामय्या तनवी आणि तृतीय पारितोषिक शुभम केंद्रे यांना जाहीर झालं आहे.

                                    ****

येत्या २४ तारखेपासून पाच सप्टेंबर दरम्यान आयोजित टोक्यो पॅरालिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या अभियानाला २५ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल. त्यादिवशी पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत भावना पटेल आणि सोनल पटेल सहभागी होतील. ध्वजवाहक थंगावेलू मरियप्पन याच्यासह ५४ सदस्यांचं पथक या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करणार असून हे पथक काल संध्याकाळी टोक्योला रवाना झालं. 

//********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...