Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
देशात
आजपासून २५ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्कृत सारख्या
प्राचीन भाषेला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय बनवण्यासाठी या सप्ताहाअंतर्गत विविध
कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी, संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भाषातज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या
आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्कृत भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत
असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं.
****
गुजरातमधील
सोमनाथ मंदिर इथं ८३ कोटी रुपये खर्चांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या
हस्ते उद्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये तीन प्रकल्पांचा समावेश
असल्याचं या ट्रस्टचे सचिव प्रविण लाहेरी यांनी सांगितलं. एक किलोमीटर लांबीचा समुद्रदर्शन
पथ, नूतनीकरण करण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर मंदिर आणि नव्यानं बांधण्यात आलेल्या
संग्रहालयाचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेनं ५६ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात ५६ लाख ३६
हजार ३३६ नागरीकांना लस देण्यात आली. आतापर्यंत या लसीच्या ५६ कोटी ६४ लाख ८८ हजार
४३३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या ३६ हजार ४०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५३० रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या तीन कोटी २३ लाख २२ हजार २५८
झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल ३९ हजार १५७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण,
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यात
यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करायला तत्वत: मान्यता दिली असल्याचं, कामगार
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. राज्यात सुमारे साडेचार लाख यंत्रमाग कामगार
आहेत. ते असंघटीत कामगार असल्यानं त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. म्हणून यंत्रमाग
कामगारांचं महामंडळ व्हावं, अशी मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती. त्याबाबत
काल मंत्रालयात वस्त्रोद्योग विभागातले लोकप्रतिनिधी, यंत्रमाग मालक संघटना, कामगार
संघटना, तसंच तज्ञ मंडळीसोबत मुश्रीफ यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
दोन
ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी कोवॅक्सीन ही लस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होईल, असं
राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या संचालक, प्रिया अब्राहम यांनी सांगितलं आहे. कोव्हॅक्सीनच्या
पहिल्या आणि दुसऱ्या चाचण्यांचे अहवाल लवकरंच नियंत्रकांना सादर केले जातील, असंही
त्यांनी सांगितलं. डेल्टा प्लसवर ही लस कदाचित तेवढी परिणामकारक नसेल, पण कोरोनाच्या
सर्व प्रकारावर संरक्षक असेल, असंही त्या म्हणाल्या.
****
लातूर
जिल्ह्यातल्या औसा नगरपरिषदेला शहराच्या विकासात निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी
ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. औसा शहरातल्या विविध विकासकामांचं
उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यांनी औसा शहरवासियांशी ऑनलाईन संवाद
साधला. औसा नगर परिषदेनं औसा शहर स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे,
असं ते म्हणाले. कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी नगरपरिषदेनं संभाव्य तिसऱ्या लाटेची
शक्यता गृहीत धरुन सर्व उपाययोजना राबवाव्यात, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं. सर्वांनी
मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
लसीकरण
पूर्ण करण्याच्या अटीवर काही पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची तयारी रेल्वेनं केली आहे.
त्यानुसार मिरज- परळी पॅसेंजर गाडीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. मुंबईत ज्याप्रमाणे
कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे, त्याच पद्धतीने पॅसेंजर
गाड्या रेल्वेने सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून होत आहे.
****
उस्मानाबाद,
बीड आणि लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी, काल तुळजापूर नगर परिषद
प्राथमिक शाळा क्रमांक तीन, या शाळेला भेट देऊन, शाळेतील संगणक प्रयोगशाळा, विज्ञान
प्रयोगशाळा, सेंद्रीय खत, गांडूळ खत परसबाग या उपक्रमांना भेटी देऊन, ऑनलाईन शिक्षणाची
पाहणी करून शाळेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांच्या वाढत्या
संख्येमुळं शाळेची इमारत कमी पडत असल्यामुळं शाळेची इमारत बांधकामासाठी तातडीने २०
लाख रुपये देण्याचं आश्वासन धस यांनी दिलं.
****
No comments:
Post a Comment