आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ ऑगस्ट
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलांमध्ये काल धोरणात्मक भागीदारी करार करण्यात
आला. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातल्या आणि जागतिक सुरक्षा आव्हानांचा एकत्रितपणे
सामना करण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला.
****
कोरोना टाळेबंदीच्या काळातील उत्पादित दूध भूकटी आणि बटर, महाराष्ट्र
राज्य सहकारी दूध महासंघ -महानंद यांना, वर्कींग स्टॉक म्हणून देण्याचा निर्णय, काल
झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. टाळेबंदीच्या काळात प्रतिदिन १०
लाख लीटर दूध शेतकऱ्यांकडून घेऊन त्याची भूकटी करण्यात आली होती.
****
२०२०चा डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ
साहित्यिक आणि समीक्षक डॉ.तारा भवाळकर यांना, तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील
राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार, मुंबई इथल्या गणेश चंदनशिवे यांना जाहीर झाला आहे. पद्मश्री
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीदिनाच्या निमित्तानं दरवर्षी हे पुरस्कार दिले
जातात.
****
औरंगाबाद शहर आणि परिसरात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. शहरातल्या अनेक
भागात पाणी साचलं आहे. औरंगाबाद शहरानजिकच्या लासूर स्टेशन जवळील मार्तंड नदी दुथडी
भरुन वाहत आहे. गंगापूर तालुक्यातल्या बाभूळगाव इथं शेतात पाणी साचल्याचं आमच्या प्रतिनिधीनी
कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वरीष्ठ
सहायक चंद्रशेखर वाजपेयी याला तीस हजारांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. हिंगोली
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्याकडून बदली
करण्यासाठी वाजपेयी यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात १३ लाख २१ हजार ८०३ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची
पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातल्या सहा लाख ६० हजार
९६३ आणि शहरी भागातल्या सहा लाख ६० हजार ८४० जणांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment