Thursday, 23 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.12.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणात बनास दुग्धव्यवसाय संकुलाची पायाभरणी ते करतील. या प्रकल्पासाठी सुमारे ४७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दररोज पाच लाख लीटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता या डेअरीत असेल.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठीच्या समितीची दुसरी बैठक काल पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं पार पडली. कोरोना संकटानं आपल्याला नवी शिकवण देऊन सध्याच्या यंत्रणा मोडीत काढल्यामुळे, कोरोनानंतरच्या काळात एक नवी जागतिक यंत्रणा उभी राहील, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

ओडिशातल्या अब्दुल कलाम बेटावर काल ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओनं तयार केलेलं हे क्षेपणास्त्र, ५०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. हे क्षेपणास्त्र एक हजार किलो वजनापर्यंतची स्फोटकं वाहून नेण्यास सक्षम आहे.

****

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर अधिकाऱ्यांनी सौरभ त्रिपाठीला लखनौमधून अटक केली. त्रिपाठी विनर कंपनीचा संचालक असून सध्या याच कंपनीकडे उत्तर प्रदेशातल्या शिक्षण विभागाच्या परीक्षा घेण्याचं कंत्राट आहे.

दरम्यान, पुणे सायबर विभागात काल एका व्यक्तीने दहा लाख रुपये रोकड आणून दिली आणि राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त तुकाराम सुपे यांनी ते ठेवायला दिले होते, असा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

****

ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रसार पाहता, स्थिती नियंत्रणात आली नाही, तर पुन्हा शाळा बंद कराव्या लागतील, असं राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोविडस्थिती पूर्व पदावर आल्यानंतर राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. वाढत्या प्रसारावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं काल राज्यभरात “नो रिजर्व्हेशन - नो इलेक्शन” आंदोलन करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...