Thursday, 22 September 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 September 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.

****

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा, सक्तवसुली संचालनालय आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये छापे मारले. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दहा राज्यांमधल्या कार्यालयातून १०६ सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेडसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव याठिकाणी हे छापे मारण्यात आलं. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांसह, औरंगाबाद, नांदेड आणि मालेगावमधून देखील संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना  शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आल्याचं पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होत आहे.

****

गोरेगावमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यापाठोपाठ मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जिंकण्याची रणनिती ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आजपासून दोन दिवसीय चिंतन शिबीर मुंबईतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनिमध्ये आयोजित केलं आहे. भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या शिबीरात सहभागी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या शिबिराचा उद्या समारोप होणार आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १५ लाख ८५ हजार ३४३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१७ कोटी ११ लाख ३६ हजार ९३४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या पाच हजार ४४३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच हजार २९१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४६ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

गायवर्गीय जनावरांमधल्या संसर्गजन्य लम्पी आजाराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करायला केंद्र सरकारची तयारी आहे, मात्र त्याआधी राज्य सरकारांनी या आजाराला राज्य आपत्ती म्हणून घोषित करणं आवश्यक आहे, अशी माहिती केंद्रीय पशुपालन राज्यमंत्री संजीव बलियान यांनी केलं आहे. केंद्र सरकार मदतीसाठी सर्वतोपरी तयार असल्याचं त्यांनी जयपूर मध्ये वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या प्रदेशात लसीकरण आणि पशूंसाठी विलगीकरण केंद्र तयार करायला हवी, त्यासाठी केंद्र सरकार निधी पुरवेल असं ते म्हणाले.

****

आधार ओळखपत्रावर भारताची डिजिटल अर्थव्यवस्था चालत असल्याचं यु आय डी ए आय चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सौरभ गर्ग यांनी म्हटलं आहे. जागतिक फिनटेक महोत्सवात ते काल मुंबईत बोलत होते. भारतामध्ये १०० टक्के प्रौढ नागरिकांकडे आधार असून, दोन ते १८ वयोगटातल्या नागरिकांकडे आधार असण्याचं प्रमाण ८० टक्के आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

राज्यातल्या बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना रोजगार आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एच सी एल कंपनीसोबत करार झालेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाअंतर्गत २५ हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने या दोन करारांद्वारे ४० हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथल्या जायकवाडी धरणाच्या विसर्गात आज सकाळी वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे आता दोन फुट उंचीवर स्थिर करुन ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे पाटबंधारे विभागाच्या वतीनं नदी काठच्या जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या वतीनं आज अनेक युद्धात हुतात्मा झालेल्या वीर सैनिकांच्या कुटुंबियांचा औरंगाबाद इथं गौरव करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज दुपारी तीन वाजता होणाऱ्या ‘शहिदों को शत शत नमन’ या सोहळ्यात औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या २१ कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आलेल्या गौरव स्मृतीचिन्हानं गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ब्रिगेडियर एम एम विटेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि कुलगुरु प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती असेल.

//***********//

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...