Sunday, 23 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 October 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.

****

दीपावलीच्या औचित्यानं दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दीपोत्सव आज अयोध्येत साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येतला दीपोत्सवाचा  मुख्य समारंभ सायंकाळी होईल. श्रीरामाचं दर्शन आणि पूजन केल्यानंतर पंतप्रधान श्रीरामजन्मभूमीच्या तीर्थक्षेत्राच्या कामाची पाहणी करतील आणि श्रीरामाचा प्रतिकात्मक राज्याभिषेक करतील. त्यानंतर शरयु घाटावर आरतीसाठीदेखील पंतप्रधान उपस्थित राहतील. गेल्या ६ वर्षांपासून या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. 

****

प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी योजनेमुळे रुग्णांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात घट झाली असून या योजनेमुळे गेल्या ८ वर्षात नागरिकांची सुमारे १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया यांनी एका ट्वीट संदेशादवारे दिली आहे. केंद्र सरकार जनतेला स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याप्रती समर्पित असून देशभरातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ८ हजार ७०० हून अधिक जन औषधी केंद्र सुरु करण्यात आले असल्याचं डॉक्टर मांडवीया यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.  २०२५ पर्यंत देशभरात १० हजार प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र सुरु करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो, जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करणार आहे. चांद्रयान ३ जवळपास पूर्ण तयार असून त्याच्या प्रक्षेपणासंबंधीच्या पूर्व चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचं इस्रो चे प्रमुख डॉक्टर सोमनाथ यांनी सांगितलं आहे. ३६ व्या व्यावसायिक उपग्रहाचं काल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं औरंगाबाद शहरात आगमन झालं आहे, त्यानंतर ते गंगापूरकडे रवाना झाले आहेत. गंगापूर तालुक्यातील दहेगाव तसंच पेंढारीमधील शेतकऱ्यांच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. 

दरम्यान, ठाकरे यांना मराठवाडा दौरा करण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांचा हा दौरा राजकीय नाटक असल्याची  टीका भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मागच्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली, जनावरे वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या तेंव्हा ते स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातील नुकसानीचे पंचनामे अजूनही धुळखात पडून आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना मदत तर केलीच नाही, शिवाय एक रुपयाही विमा मिळवून दिला नाही. आजचा दौरा हे त्यांचं नाटक असून पुतना मावशीचं प्रेम असल्याची खोचक टीका राम कुलकर्णी यांनी केली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २ लाख १० हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत २१९ कोटी ५५ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १ हजार ९९४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ६०० रुग्ण बरे झाले. देशात सध्या २३ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं येत्या शनिवारी २९ तारखेला शिर्डी इथं सहावं पर्यावरण संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल.

****

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होत आहे. थोड्याच वेळात म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या सामन्याचं धावतं समालोचन, हे बातमीपत्र संपल्यानंतर  आकाशवाणीवर लगेच ऐकता येईल.

****

मुंबई , पुणे सह राज्यातून तर देशाच्या काही भागातून ही नैऋत्य मौसमी मान्सून परतला आहे. काल आणि आज राज्यात तुरळक ठिकाणं वगळता कुठेही पावसाची नोंद झालेली नाही.

****

दिवाळी निमित्त राज्य शासनाच्या वतीनं वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...