Sunday, 23 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक: २३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 October 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      दिल्लीत महा रोजगार मेळाव्याला सुरुवात, पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५ हजार बेरोजगारांना नियुक्ती पत्र

·      राज्यातही येत्या वर्षात ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

·      राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ होण्याचे संकेत

·      बीडमधील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

·      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा ते सात आमदार कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा

·      विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाची किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर

·      शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

आणि

·      ऑस्ट्रेलियातील टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारत- पाकिस्तान सामना  

****

सविस्तर बातम्या

****

देशातल्या १० लाख बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या महा रोजगार मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळालेल्या ७५ हजार बेरोजगारांना नियुक्ती पत्र देण्यात आली. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातल्या गट अ, ब आणि क श्रेणी स्तरावर हे युवक रुजू होणार आहेत. निमलष्करी दलं, पोलिस उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लिपिक, आयकर निरीक्षक आणि इतर पदांवर या युवकांची नियुक्ती झाली आहे. गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारनं रोजगार निर्मितीसाठी विविध उपाय योजले आहेत. भारतानं सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. विकसित देश होण्याचं उद्दिष्ट सर्वांच्या प्रयत्नानंच साध्य होणार असल्याचं यावेळी युवकांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितलं.

देशात विविध ठिकाणी एकाचवेळी हा कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईतल्या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ३९५ बेरोजगारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. कामाच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध शिफारशी करा आणि अधिकाधिक काम नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन करा असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. पुण्यातल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले होते. राणे यांच्या हस्ते २०४ तरूण तरूणींना नियुक्तीपत्र देण्यात आली. या मेळाव्याविषयी अहमदनगरच्या लाभार्थी चारुशिला वाकचौरे यांनी आकाशवाणी कडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकंदर मला  हा  जॉब  भेटल्यानंतर मला  खूप आनंद झाला  आणि  ते  पण  दिवाळीच्या  शुभ मुहुर्तावरती  मला  हे  अपॉइंटमेंट  लेटर  भेटलं  त्याचा  सगळ्यात  जास्त  आनंद  झाला . कारण  की  मी  या  गोष्टीसाठी खूप  जास्त  वेट  केलाय   त्यामुळे  मला  ही  दिवाळी खूपच  छान  जाणारे.

****

राज्यातही येत्या वर्षात ७५ हजार युवकांना नोकरी दिली जाणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारकडून पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे, दीपोत्सवाच्या औचित्यावर काल झालेल्या या रोजगार मेळाव्यात २१३ युवकांना नियुक्तीपत्रं देण्यात आली.

दरम्यान, लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवडाभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले.......

७५ हजार लोकांची भरती येत्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू. पुढच्या आठ दिवसांमध्ये १८ हजार पोलिसांच्या भरतीची आम्ही त्या ठिकाणी जाहिरात काढतो आहोत. त्याचप्रमाणे ग्रामविकासामध्ये दहा हजारांची भरती करणार आहोत. वेगवेगळ्या विभागांमधली भरती ते आता आम्ही सुरु केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीमध्येही आमच्या तरुणाईला संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रात आपण करतो आहोत.

****

राज्यात प्राथमिक तसंच माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ होण्याचे संकेत आहेत. सध्या राज्यातील प्राथमिक शिक्षण सेवकांना ६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना ८ हजार रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना ९ हजार रुपये मानधन दिलं जातं, यात दुपटीपेक्षा अधिक वाढ होणार असल्याचं यासंबंधीच्या बातमीत म्हटलं आहे. प्राथमिक शिक्षण सेवकांना १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना १८ हजार रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना २० हजार रुपये प्रस्तावित सुधारित मानधन देण्यात येणार आहे. शिक्षण सेवकांचे मानधन वाढवून २० हजार रुपये करण्यात यावं, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेनं केली होती. या मागणीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचं, संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगितलं.

****

नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकानं काल जळगाव इथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेच्या एका हस्तकाला अटक केली आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केलेल्या ‘पीएफआय’ च्या पाच सदस्यांच्या मोबाइलमधील संभाषणाचा डेटा नष्ट केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. उनैस उमर खय्याम पटेल असं या आरोपीचं नाव असून, त्याला काल जिल्हा - सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे.

****

बीडमधील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी ही घोषणा केली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो कोणत्याही कार्यक्रमात न वापरणं आणि शिंदे गटाशी जवळीक वाढवणं, यामुळेच क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचं धोंडीराम पाटील यांनी सांगितलं आहे. ठाकरे गटाशी क्षीरसागर यांचा आता काहीही संबंध नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा ते सात आमदार कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. ते काल पुण्यात बोलत होते. महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरल्याचा आरोप राणे यांनी फेटाळून लावला. काही लोक टिंगल टवाळी करत आहेत, त्यांचा स्तर घसरला असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली.

****

विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षानं बीड जिल्ह्यातील किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. मात्र, या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी असून ते पक्ष राजकीयदृष्ट्या स्वतःहून बुडतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

****

धनत्रयोदशी काल साजरी झाली. निरोगी दीर्घायुष्याच्या कामनेसाठी या दिवशी धन्वंतरी पूजन तसंच यम दीप दानाची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर फटाके, कपडे, फराळाचे जिन्नस तसंच गृहसजावटीसह विविध साहित्य खरेदीसाठी काल सकाळपासूनच बाजारपेठांमधून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. सायंकाळी पारंपरिक पद्धतीनं पूजा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचं पर्व घेऊन येवो. आपल्या आशा-आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो,' असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. गंगापूर तालुक्यातल्या दहेगाव आणि पेंढापूर इथल्या पीक नुकसानीची पाहणी करुन ते तिथेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील. शेतकऱ्यांना तातडीची शासकीय मदत मिळवून देण्याच्या प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं पक्षप्रमुख ठाकरे यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला असल्याचं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीनं शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.

****

पालकमंत्री अतुल सावे यांनी काल बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा मंडळात ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसानंतर झालेल्या  घटनेतील पिडीत कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली, भानकवाडी, दगडवाडी, तसंच माजलगाव तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागांनाही त्यांनी भेट दिली. भानकवाडी आणि दगडवाडी इथल्या पिडीत कुटुंबांना शासकीय मदतीचा धनादेश पालकमंत्री सावे यांच्या हस्ते देण्यात आला.

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिला आहे. परळी तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या गावांची काल मुंडे यांनी पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या तीन महिन्यात नुकसान भरपाईच्या निर्णयात बीड जिल्ह्याला वारंवार वगळण्यात आल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांची आताची परिस्थिती पाहून तरी राज्य सरकारला पाझर फुटेल का, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी केला आहे.

****

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या “आनंदाचा शिधा किटच्या वाटपाला औरंगाबाद जिल्ह्यात कालपासून सुरवात झाली. आनंदाच्या शिधा या उपक्रमातून सर्वसामान्यांची दिवाळी आनंदाची व्हावी अशा शुभेच्छा शिधा वाटप कार्यक्रमात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिल्या. आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवाळी निमित्त जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा किटचं वाटप करण्यात येत आहे. शंभर रुपयांच्या या किट मध्ये एक किलो चनादाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक लीटर पामतेल याचा समावेश आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या भेंडोळी उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील उपदैवत असलेल्या काळभैरव मंदिरापासून हा उत्सव सुरु होईल. मंदिर समितीच्या वतीनं सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून, कालभैरव मंदिरापासून प्रज्वलित करण्यात आलेली भेंडोळी डुल्या मारुती मंदिरात विसर्जित केली जाईल.

****

क्रिकेट

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या सामन्याचं समालोचन दुपारी १ वाजेपासून आकाशवाणीवर ऐकता येईल.

काल सिडनी इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं यजमान ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला. अन्य एका सामन्यात इंग्लंडनं अफगाणिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला.

****

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिंकलेला चषक घेऊन महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेनं काल धनत्रयोदशीला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या युवा खेळाडूंनी १४० विक्रमी पदकांची कमाई करत उपविजेतेपद पटकावलं. काल धनत्रयोदशीच्या निमित्तानं खेळाडूंनी हे यश शिवरायांना अर्पण करून मानवंदना दिली.

****

लातूर जिल्ह्यात संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत मार्च २०२२ अखेर दाखल केलेल्या पात्र लाभार्थींचं ऑक्टोबर अखेरपर्यंतचं अनुदान मंजूर झालं आहे. ग्रामीण भागातील लाभार्थींचे अनुदानापोटी ७ कोटी ८७ लाख ३३ हजार ८०० रुपये तर लातूर शहरातील पात्र लाभार्थींचे ४ कोटी ५८ लाख ९ हजार ४०० रुपये इतकं अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात आलं आहे. सर्व लाभार्थ्यांनी आपापल्या खात्यावर जमा करण्यात आलेली अनुदान रक्कम उचलून घ्यावी, असं आवाहन संजय गांधी निराधार योजना समिती तसंच तहसील प्रशासनानं केलं आहे.

****

लातूर इथं सुमारे तीन कोटीचा दरोडा घालणाऱ्या टोळीपैकी पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केलं असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ७९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कातपूर शिवारात १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडखोरांनी एका व्यावसायिकाच्या घरात घुसून पिस्तुल तसंच चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे तीन कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या टोळीतल्या अन्य साथीदारांचा तपास सुरू असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी इथं महाराष्ट्र बँकेच्या शाखेला काल सकाळी अचानक आग लागली. नगर परिषद, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अग्निशमन दलानं तत्काळ कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळवलं, या आगीत बँकेची स्ट्राँगरुम सुरक्षित आहे मात्र जवळपास सर्व कागदपत्रं तसंच संगणक नष्ट झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...