Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून, राज्यातल्या तीन हजार ४०० कोटी
रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते आज करण्यात आली. गौरीकुंड
ते केदारनाथ आणि गोविंदघाट ते हेमकुंड साहिब या दोन नवीन रोप वे अर्थात रज्जूमार्ग
प्रकल्पांचाही यात समावेश आहे.
****
आज
पोलिस स्मृती दिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चीनच्या सैनिकासोबत लढतांना
केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून २१
ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलिस स्मृति स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन
अभिवादन केलं. मुंबईत नायगाव पोलिस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा
पोलिसांच्या स्मृतीस अभिवादन केलं.
****
वसुबारसेनं
आज दिवाळीची सुरुवात झाली. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला
आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसेला या दिवशी गाय आणि तिच्या
वासराची पूजा केली जाते.
****
केंद्रीय
शिक्षक पात्रता चाचणी सी टी ईटी ची १६ वी परीक्षा या वर्षी डिसेंबर ते पुढील वर्षी
जानेवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीनं घेतली जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -
सीबीएसईनं ही घोषणा केली. यासाठी ३१ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान डब्ल्यू
डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता
येतील.
****
नांदेड
जिल्ह्यात हंगामातल्या प्रतिकूल परिस्थितीनुसार नुकसानीच्या पंचवीस टक्के आगाऊ पीक
विमा मंजूर झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान
पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांसाठी जवळपास ४०० कोटी
रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही राऊत यांनी
म्हटलं आहे.
****
दिवाळी
दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेतर्फे येत्या २३
तारखेला हुजूर साहिब नांदेड ते हडपसर दरम्यान एक विशेष गाडी सोडली जाणार आहे. ही
गाडी २३ तारखेला रविवारी रात्री साडे नऊ वाजता नांदेडहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी
सकाळी पावणे अकरा वाजता हडपसरला पोहचेल. त्यानंतर परतीच्या प्रवासात दुपारी अकरा
वाजून पन्नास मिनिटांनी हडपसर इथून निघून रात्री पावणे बारा वाजता नांदेडला
पोहचेल.
****
औरंगाबाद
महापालिकेतर्फे शहरातल्या बचत गट आणि महिला व्यावसायिकांना त्यांची उत्पादनं
विक्री आणि प्रदर्शनाकरता शहरातल्या शहानुरमियाँ दर्गा इथं श्रीहरी
पॅव्हेलीयनमध्ये मेळावा सुरू आहे. हे विक्री आणि प्रदर्शन आज, उद्या खुलं राहणार
असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.
****
हिंगोली
शहरात रामलीला मैदानाच्या परिसरात असलेल्या केजीएन होलसेल किराणा दुकानाला मध्यरात्री
आग लागली. या भीषण आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झालं. घटनेची माहिती
मिळताच हिंगोली पालिकेचे अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आली.
****
डेन्मार्क
ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
यांच्या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या एकेरी गटात
किदाम्बी श्रीकांतचा सामना आज सिंगापूरच्या लोह कीन यव याच्याशी होणार आहे.
****
स्पेन
मध्ये सुरु असलेल्या तेवीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला
काल आणखी दोन कांस्य पदकं मिळाली. भारताच्या नितेशनं ९७ किलो वजनी गटात
ब्राझीलच्या मल्लाला पराभूत केलं. तर ७२ किलो वजनी गटात विकास यानं जपानी
प्रतिस्पर्ध्याला पराजित केलं.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या अनेक भागात आज मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादक
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. औंढा नागनाथ तालुक्यात येळेगाव सोळंके, जवळा
बाजार, शीरड शहापूर, पिंपळदरी, पोटा या भागात ढगफुटीदसृश पाऊस झाला. नांदेड-
औरंगाबाद मार्गावर चोंडी इथं पुलाखालचा भाग पाण्यामुळे निखळून पडल्यानं रस्त्याला
भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
****
बंगालच्या
उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सूनच्या
परतीच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले असून, १४ तारखेपासून त्याचा हा प्रवास
थांबलेला आहे. बंगालच्या उपसागरावरचा कमी दाबाचा पट्टा जसजसा उत्तरेकडे सरकत जाईल
तसतसा मान्सूनच्या परतीचा मार्ग मोकळा होत जाईल. येत्या सोमवारपर्यंत मान्सूननं
संपूर्ण महाराष्ट्राचा निरोप घेतलेला असेल अशी अपेक्षा आहे. दरम्यानच्या काळात
बंगालच्या उपसागारावरचा कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या दिशेनं
सरकत असून त्याची तीव्रता वाढत जाऊन २४ तारखेपर्यंत त्याचं 'सितरंग' या
चक्रीवादळात रुपांतर होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment