Friday, 21 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

आज पोलिस स्मृती दिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलिस स्मृति स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. मुंबईत नायगाव पोलिस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा पोलिसांच्या स्मृतीस अभिवादन केलं.

****

वसुबारसेनं आज दिवाळीची सुरु वात झाली. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसेला या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.

****

सध्याच्या सणासुदीच्या काळात डाळी आणि कांद्याचे भाव वाढणार नाहीत, असा विश्वास ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी व्यक्त केला. देशात डाळी आणि कांद्याचा पुरेसा साठा असून दराची स्थिती, उत्पादन, आयात, निर्यात आणि जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता यावर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद महापालिकेचा कर्मचारी ईस्माईल शमशू पठाण याला सहा हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. पठाण यांनं सफाई कामगाराची गैरहजेरी सफाई निरीक्षकांना न पाठवण्यासाठी ही लाच मागितली होती.

****

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रण दिनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त काल औरंगाबाद विमानतळावर सहायक सर व्यवस्थापक विनायक कटके यांनी हवाई नियंत्रणाच्या इतिहासाची माहिती दिली. प्रभारी विमानतळ संचालक शरद येवले, केंद्रीय राखीव दलाचे कमांडर पवन कुमार तसंच नीलम गौर यावेळी प्रमुख उपस्थित होते.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. नांदेड- औरंगाबाद मार्गावर चोंडी इथं पुलाखालचा भाग पाण्यामुळे निखळून पडल्यानं रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...