Saturday, 22 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहिमेचा दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रारंभ करणार आहेत. पहिल्या टप्प्यात देशभरातल्या ७५ हजार युवक-युवतींना नियुक्तीची पत्र सुपूर्द केली जातील. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पंतप्रधान संबोधितही करणार आहेत. देशातल्या ५० ठिकाणांहून लोकप्रतिनिधी आणि युवक युवती या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

****

सवत्स धेनू अर्थात गाय वासराच्या पूजेनं कालपासून दीपावलीला प्रारंभ झाला. आज धनत्रयोदशी. निरोगी दीर्घायुष्यासाठी आज धन्वंतरी पूजन तसंच यम दीप दानाची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विविध साहित्य खरेदीसाठी काल बाजारपेठांमधून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.

धनोत्रयोदशी हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला आहे.

****

भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र व्यवस्था उभारणं हीच भारतीय लष्कराच्या वाटचालीची पुढची दिशा असेल, असं लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटलं आहे. शस्त्रास्त्रांसाठी इतर कोणत्याही देशावरचं अवलंबित्व संपुष्टात आणून, याबाबतीत आत्मनिर्भर बनायला हवं, हेच रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धानं शिकवलं, असं ते म्हणाले. शस्त्रास्त्र व्यवस्थेचं भारतीयीकरण म्हणजे यापुढच्या वाटचालीतला अडथळा नाही, तर ही नवी संधी असल्याचं लष्कर प्रमुखांनी नमूद केलं.

****

देशभरातल्या सुमारे ३० लाख सरकारी अधिकाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकाचं प्रशिक्षण, डिजिटल नोंदवही अशा नवीन तंत्रज्ञानांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशासनाची परिणामकारकता वाढवण्यासाठी आणि सेवा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेत बोलताना ही घोषणा केली.

****

आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेनं काल औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीसमोर ठेचा भाकर खाऊन निषेध आंदोलन केलं. किमान वेतनाच्या फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी अदा न केल्याबद्दल हे आंदोलन केल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं.

//***********//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 04 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...