Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 23 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी पुणे इथल्या राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले
वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस आज सकाळी भेट देऊन पाहणी
केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य लक्षात राहावं आणि भिडेवाडा इथं
मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे पुढच्या पिढीला कळावं या पद्धतीनं सर्व स्मारकाची
रचना करण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
फुलेवाडा आणि
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हे दोन्ही भाग एकत्र करून जागतिक दर्जाचं स्मारक
उभारण्याचा शासनाचा मनोदय असून स्थानिक रहिवाशांचं चांगलं पुनर्वसन करून त्यांना त्रास
होणार नाही,
याची दक्षता घेण्यात येईल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या
पुंछ जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी सुरक्षा दलांनी २० संशयितांना
ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप असून सैन्याकडून या
लोकांची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानची जिहादी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित
एँटी फॅसीस फ्रंट नामक दहशतवादी टोळी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेरा की गली
भागात दबा धरून बसली होती, या परिसरात गुरुवारी सैन्याची तुकडी
शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला होता.
****
विकसित भारत संकल्प
यात्रा कार्यक्रामांतर्गत एक कोटीहून अधिक आयुष्मान कार्ड बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही कामगिरी अतिशय उत्साहवर्धक असल्याचं पंतप्रधानांनी
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. देशभरातील गरिबांपर्यंत लोककल्याणकारी योजनांचा
लाभ पोहचवणं हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या
अमृतकाळात भारताचं स्वतःचं अंतरिक्ष केंद्र असेल असा विश्वास भारतीय अंतराळ संशोधन
संस्था - इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे. ते काल अहमदाबादच्या
विज्ञान नगर इथं आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात देशातील युवा वैज्ञानिकांना संबोधित
करत होते. पुढील २५ वर्षात भारतीय शास्त्रज्ञ चंद्रावर जातील, असंही ते यावेळी
म्हणाले. विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाची भुमिका महत्वपूर्ण
असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी वर्षात
फ्रान्स इथं जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहे. २३ वर्षाखालील तरुणांमध्ये कौशल्य गुणांची
जोपासना करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. जिल्हा, राज्य आणि देश
स्तरावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतून देशातील प्रतिभासंपन्न आणि कुशल
स्पर्धकांचं नामांकन करण्याच्या दृष्टीनं युवक-युवतींना विविध ५२ प्रकारात होणाऱ्या
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयंम् या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन
याबाबतच्या वृत्तात करण्यात आलं आहे.
***
नांदेड जिल्ह्यातील
श्री क्षेत्र माळेगाव यात्रेसाठी राज्यासह कर्नाटक तसंच तेलंगणातील अनेक भक्तांचा ओढा
माळेगावकडं असतो. या यात्रेत सुरक्षेच्यादृष्टीनं पोलिस विभागानं एक हजार ३३८ पोलिस
कर्मचारी नेमले असून यात ४०० गृहरक्षकांचा समावेश आहे. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी
सुरक्षिततेच्या दृष्टिनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
यात्रेच्या पूर्वतयारीसाठी
स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजन
करणेचं दृष्टीनं काल माळेगाव इथं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितील
बैठक झाली. या बैठकीला खासदार सुधाकर श्रृंगारे, जिल्हाधिकारी
अभिजित राऊत यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
सोलापूर जिल्ह्यातील
लोकमंगल फाऊंडेशन आयोजित, लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार
घोषित करण्यात आले आहेत. हे या पुरस्काराचं ९ वं वर्ष आहे. शांता गोखले लिखित निर्मला
पाटील यांचं आत्मकथन, राजू बाविस्कर यांच्या काळ्यानिळ्या
रेषा आणि वसंत गायकवाड यांच्या गौतमबुद्ध या कादंबरीला यावर्षीचे पुरस्कार घोषित झाले
आहेत. रोख २५ हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या सात जानेवारीला सायंकाळी सहा वाजता सोलापुरात किर्लोस्कर सभागृह, हिरानंदानी नेमचंद वाचनालयात
होणार आहे.
****
राज्यात कोरोनाच्या
‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी
घाबरून न जाता कोविड प्रतिबंधासाठीच्या वर्तणुकीचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन सार्वजनिक
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल पुण्यात
आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
No comments:
Post a Comment