Saturday, 23 December 2023

TEXT - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.12.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 December 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं भिडे वाड्यातील नियोजित स्मारक आकर्षक आणि भव्य असावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना

·      मराठा आरक्षणासाठी २० जानेवारी पासून मुंबईत आमरण उपोषणाचा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

·      विकसित भारत संकल्प यात्रेसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

आणि

·      सोलापूरच्या लोकमंगल फाऊंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर;येत्या सात जानेवारीला वितरण

****

पुण्यातल्या भिडेवाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी आज पुण्यात स्मारकासंदर्भात आढावा बैठक घेतली, या स्मारकाच्या विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, असं पवार यांनी सांगितलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी तसंच या वास्तूचे 'सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा' असं नामकरण करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. या बैठकीपूर्वी पवार यांनी भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेवर आज सकाळी भेट देऊन पाहणी केली.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २० जानेवारी पासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आज बीड इथं झालेल्या सभेत जरांगे बोलत होते. सर्वांनी शांततेत कामं करा, आता मुंबईत भेटू, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असा इशारा मराठा योध्दा जरांगे यांनी बीडमधील निर्णयाक इशारा सभेतून दिला. या सभेला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या सभेसाठी बीड शहरात जरांगे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. २०१ जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

****

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना विदेशातून धमकीचे फोन आल्याने नांदेड इथल्या त्यांच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमकी बाबत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन माहिती दिली आहे. इंग्रजीत बोलणाऱ्या 'पन्नू' नामक व्यक्तीने येत्या २६ जानेवारीला देशात बॉम्बस्फोट घडवून आणले जातील अशी धमकीही दिली आहे. खासदार पाटील यांना पहिला धमकीचा फोन गेल्या १४ ला डिसेंबर रोजी आला होता. त्यानंतर २० डिसेंबर रोजी पुन्हा धमकीचे दोन फोन कॉल आले. दुसऱ्यांदा आलेला फोन कॉल हा इजिप्त या देशातून आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरणसिंग यांच्या स्मरणार्थ २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन दरवर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. मातीत खपून जगासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग तसंच मंत्र्यांनी शेतकरी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौधरी चरणसिंग जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

****

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा प्रश्न, समन्यायी पाणी वाटप धोरण, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, मराठवाडा तसंच विदर्भातल्या मागासलेपणाची स्थिती, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान आणि नुकसान भरपाई, आदी प्रश्न सदनात उपस्थित केल्याचं दानवे यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतंत्र पथक नेमून शासकीय आरोग्य संस्थांमधील साहित्याची तपासणी करावी, असे निर्देश क्रीडा आणि युवक मंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या उपचारासाठी ५० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही कोविड चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून, संभाव्य रुग्णांवर उपचारासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचं, महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

****

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह ते विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित असतील. उद्या सकाळच्या सत्रात शहरातील जयभवानी परिसरात तर दुपारच्या सत्रात सातारा परिसरात सर्व मान्यवर मंत्री या यात्रेत सहभागी होतील. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून योजनांची नोंदणी करून लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे.

दरम्यान, या यात्रेने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात भराडी, फुलंब्री तालुक्यात आळंद, पैठण तालुक्यात कावसान, सोयगाव तालुक्यात घोसला तर गंगापूर तालुक्यात धानोरी खुर्द इथं जनजागृती केली.

ही यात्रा उद्यापासून लातूर जिल्ह्यातल्या २४ गावांमध्ये जाणार आहे. २६ तारखेपर्यंत विविध गावांमध्ये फिरणाऱ्या या यात्रेतील उपक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला झालेल्या लाभाची माहिती देत आहेत. धाराशिव जिल्ह्यात गुळहळ्ळी इथले रामकिसन काळे तसंच कुंदन हळकुंभे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

रामकिसन काळे आणि कुंदन हळकुंबे, गुळहल्ली, ता.तुळजापूर, जि.धाराशिव

****

धुळे तालुक्यातील जुने भदाणे इथं आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. खासदार डॉ.सुभाष भामरे यावेळी उपस्थिते होते. अक्कलपाडा प्रकल्पात सध्या ६० ते ७० टक्के जलसाठा असून या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावे आजही सिंचनापासून वंचित आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये निधीची मागणी केली असून, त्यातून प्रकल्पात आणखी दीड घनफूट जलसाठा वाढविण्यात येणार असल्याचं भामरे यांनी सांगितलं.

****

सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल फाऊंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे या पुरस्काराचं ९ वं वर्ष आहे. शांता गोखले लिखित निर्मला पाटील यांचं आत्मकथन, राजू बाविस्कर यांच्या काळ्यानिळ्या रेषा आणि वसंत गायकवाड यांच्या गौतमबुद्ध या कादंबरीला यावर्षीचे पुरस्कार घोषित झाले आहेत. रोख २५ हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या सात जानेवारीला सायंकाळी सहा वाजता सोलापुरात हिराचंद नेमचंद वाचनालयातल्या किर्लोस्कर सभागृहात होणार आहे.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त परवा २५ तारखेला धाराशिव इथं मराठवाडा स्तरीय लोकसेवा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुरुड इथले कृषी संशोधक विद्यासागर कोळी,उपेक्षित आणि निराधार मुलांचं संगोपन करणारे औसा तालुक्यातील बुधोडा इथले शरद झरे आणि परंडा तालुक्यातील जगन्नाथ साळुंखे यांना मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.

****

 

नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माळेगाव यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक तसंच तेलंगणातील अनेक भक्त हजेरी लावत असतात. या यात्रेत सुरक्षेच्यादृष्टीनं पोलिस विभागानं एक हजार ३३८ पोलिस कर्मचारी नेमले असून यात ४०० गृहरक्षकांचा समावेश आहे. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीनं काल माळेगाव इथं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितील बैठक झाली. या बैठकीला खासदार सुधाकर श्रृंगारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...