Friday, 12 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ सी पी राधाकृष्णन यांच्याकडून ग्रहण

·      राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचं आरक्षण जाहीर

·      विद्यापीठं आणि महाविद्यालयांतल्या तासिका तत्त्वावरील ७९४ प्राध्यापकांचे प्रस्ताव मार्गी

·      राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ७३ कोटी ५४ लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर

आणि

·      फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती दिव्या देशमुखला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश

****

माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.

 

या शपथग्रहण सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, एम. वेंकय्या नायडू, मोहम्मद हमीद अन्सारी हे तीन माजी उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते.

शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी संसद परिसरात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केलं तसंच राजघाट इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

राधाकृष्णन यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सूपूर्द केला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सध्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

****

अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा सोबत राज्यशासनाने आज एक सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कृषी तसंच कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रात दोन्ही राज्यं काम करतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. यादीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद- सर्वसाधारण, जालना- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिलांसाठी राखीव, बीड - अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव, परभणी -अनुसुचित जाती, हिंगोली-नागरिकांचा मागास प्रवर्ग, नांदेड-नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिलांसाठी राखीव तर लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे.

****

मराठा आरक्षण देताना सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यात आणणं ही बाब आपल्याला मान्य नसल्याचं, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान, रेणापूर तालुक्यात वांगदरी गावातल्या भरत महादेव कराड या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ यांनी आज भेट घेऊन कुटुंबाचं सांत्वन केलं.

****

मराठा समाजाला आरक्षण जरुर द्यावं मात्र ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये आणि राज्य सरकारने जारी केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील तीन सप्टेंबर रोजीचा जीआर रद्द करावा, या मागणीसाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

****

मराठवाड्यातील बंजारा अर्थात लमाण समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटियर नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत एक निवेदन त्यांनी सादर केलं. तेलगंणा आणि आंध्रप्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला, याकडे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या निवेदनातून लक्ष वेधलं आहे.

****

राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावरील ७९४ प्राध्यापकांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले असून, उर्वरित १५५ प्रस्ताव येत्या दोन ते तीन दिवसांत मार्गी लावले जाणार आहेत. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ही माहिती दिली. सीएचबी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची प्रत्येक वर्षी नियुक्ती करण्यासंदर्भात १७ ऑक्टोबर २०२२च्या शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठांच्याच स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्याचं उच्च शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आल्याचं देवळाणकर यांनी सांगितलं.

****

यंदाच्या जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं ७३ कोटी ५४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. ८४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे.

****

कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. या मागण्यांसाठी आमदार चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशीही संवाद साधला.

****

 

 

सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे.

****

वस्तू आणि सेवा कर-जीएसटी पुनर्रचनेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील करात मोठी कपात होणार आहे. येत्या दसरा दिवाळीला या वस्तूंची खरेदी नियोजित असलेल्या ग्राहकांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले विक्रेते पंकज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे

बाईट – पंकज अग्रवाल, विक्रेते

****

लोकसहभाग, पारदर्शकता, आणि समान संधी यांच्या जोरावर प्रत्येक गाव आत्मनिर्भर, सुसंस्कृत आणि प्रगत होईल, असं प्रतिपादन आमदार नारायण कुचे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत आज ते बोलत होते. विकासाच्या विविध मुद्यांवर आमदार कुचे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरं, पर्यावरणपूरक आणि शून्य कचरा उत्सव, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या कालावधीत विशेष ग्रामसभांचं आयोजन करून, स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचं उद्दिष्ट नांदेड प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलं आहे.

****

उजबेकिस्तान इथे सुरु असलेल्या फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश मिळाला असून तिचा सामना थेट आठव्या फेरीत भारताचाच ग्रँडमास्टर डी गुकेश याच्याशी होणार आहे. दरम्यान, डी गुकेशला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील. भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मगसूदलू वर विजय मिळवला आहे.

****

परभणी जिल्ह्यात आज सकाळी पासूनच विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकं पाण्याखाली गेल्याने काढणीला आलेले उडीद, मूग, तसंच सोयाबीन पिकाचं नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळा तसंच मदरशांमधील ५ ते १५ वयोगटातील बालकांसाठी १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मोफत गोवर आणि रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व निवासी आश्रम शाळा तसंच सर्व मदरशांनी या मोहीमेचा लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

****

पैठणचं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे १२ दरवाजे अर्धा फूट उघडून सहा हजार २०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. विभागात सिद्धेश्वर धरणातून सध्या आठ हजार २२४ तर ईसापूर धरणातून साडे तीन हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

****

हवामान

राज्यात आज विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...