Saturday, 13 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून प्रत्येक भारतीयांच्या उत्थानासाठी  आपण कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मिझोरम, मणिपूर आणि आसाममधील विविध विकास कामांची कोनशीला तसंच लोकर्पणही होत आहे.

थोड्याच वेळेपुर्वी पंतप्रधानांनी मिझोरमच्या आयझवाल इथं नऊ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या योजनांचा दृरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यानिमित्त  आयोजित कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधतही केलं. या योजनांद्वारे मिझोरमच्या रेल्वे, रस्ते, ऊर्जा आणि क्रिडा क्षेत्राला मोठा लाभ मिळणार आहे.

****

कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात काल संध्याकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या गर्दीत एक मालवाहू ट्रक घुसून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-३७३ वर ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला टाळतानाहा अपघात झाला. या अपघातात चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींना लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली. या दुर्घटनेबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

****

म्यूच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारे कमाल शुल्क 5 टक्क्यांवरून 3 टक्के करण्याचा निर्णय भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीनं घेतला आहे. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्यूच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना हे शुल्क भारावं लागतं.

****

नवी मुंबईतील विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक-उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी काल ही माहिती दिली. हे विमानतळ येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथून विमानतळाकडे जलवाहतूकीद्वारे जाणं शक्य होणार आहे.

****

नागपूर-अमरावती महामार्गावरील जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या नवीन चारपदरी पुलाचं उद्घघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीत यांत्रिकीकरणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता-एआयचा वापर करणं अत्यंत गरजेचं असून ए.आय ही शेती - शेतकरी दोघांनाही स्वयंपूर्ण करू शकते असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपुर इथं पत्रकारांशी बोलत होते. येत्या २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान नागपूर इथं आयोजित 'ॲग्रोव्हिजन २०२५'  कृषी प्रदर्शनाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार, वीस सदस्यीय नगर पथविक्रेता समिती स्थापन केली जाणार आहे. यात आठ सदस्य हे पथविक्रेत्यांमधून निवडून द्यायचे आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं या निवडणुकीतील आरक्षण निश्चित करण्यासाठी महापालिकेत परवा १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सोडत काढली जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवासी आश्रमशाळा तसंच मदरशांमधील ५ ते १५ वयोगटातील बालकांसाठी परवा सोमवारपासून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत मोफत गोवर आणि रुबेला विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

****

नांदेड इथं विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक काल झाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत विविध रेल्वे स्थानकांवरच्या समस्यांसह, नवीन रेल्वेगाड्या सुरू करणं, सध्याच्या रेल्वेगाड्यांची प्रवासी वहन क्षमता वाढवणं, आदी विषयांवर चर्चा झाली.

****

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या जास्मिन लम्बोरिया आणि नुपूर शेओरन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लडच्या लिव्हरपूल, इथं झालेल्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत जास्मिननं व्हेनेझुएलाच्या ओमेलिन अल्कालाचा पाच विरुद्ध शुन्य असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या ज्युलिया सेरेमेटाशी होईल. ८० किलोपेक्षा जास्त वजनी गटात नुपूरने तुर्कीच्या दुजतास सेमाचा पाच विरुद्ध शुन्य असा पराभव केला. उद्याच्या अंतिम फेरीत तिचा सामना पोलंडच्या अगाता काझमार्स्काशी होईल. ४८ किलो वजनी गटात मीनाक्षी हुडाने उपांत्य फेरीत प्रवेश करून महिला गटात भारतासाठी चौथं पदक निश्चित केलं आहे. आता तिचा सामना मंगोलियाच्या लुत्सैखानी अल्तांटसेत्सेगशी होईल.

****

आज दिवसभरात राज्याच्या सर्वच विभागांमध्ये पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...