Sunday, 14 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 14 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये १८ हजार ५३० कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. पहिला कार्यक्रम दरांग इथं होणार असून, पंतप्रधान दरांग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जी.एन.एम. आणि बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज अशा आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यानंतर पंतप्रधान गुवाहाटीत वळणरस्ता प्रकल्पाचं भुमीपूजन करतील. याशिवाय ब्रह्मपूत्र नदीवर कुरुवा-नरेंगी पुलाचं भूमिपूजनही होणार आहे. या प्रकल्पांमुळे संपर्क वाढून या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. यानंतर पंतप्रधान गोलाघाट इथल्या नुमालीगड रिफायनरीत असम बायो-इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडमधील पॉलीप्रॉपिलीन प्रकल्पाचीही पायाभरणी करतील, या प्रकल्पांमुळे आसामच्या पेट्रोकेमिकल क्षेत्राचं महत्त्व वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

****

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर आचार्य देवव्रत आज सकाळी अहमदाबादहून मुंबईला रवाना झाले. त्यांचा शपथविधी समारंभ उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील राजभवनात पार पडणार आहे.

****

आज हिंदी दिवस आहे. १९४९ साली आजच्याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतली हिंदी देशाची राजभाषा म्हणून स्वीकारली होती. आज हिंदी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. तब्बल ५२ कोटींहून अधिक लोकांची ती पहिली भाषा आहे. हिंदी दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी देशातील विविध भाषा आणि बोलींमध्ये सेतूचं काम करते, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. हिंदी राष्ट्रीय एकतेला बळकटी देते आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि संशोधनाची भाषा म्हणूनही पुढं येते आहे, असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य संग्रामापासून आपत्कालीन काळापर्यंत देशवासीयांना एका सूत्रात बांधण्यात हिंदीनं महत्वाची भूमिका बजावली, असं शाह यांनी नमूद केलं. सर्व भाषांना सोबत घेऊन विकसित आणि भाषिकदृष्ट्या आत्मनिर्भर भारत घडवण्यात हिंदी पुढंही महत्वाची भूमिका निभावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं महात्मा मंदिरात पाचव्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित राहणार आहेत.

****

तिरुपती इथं आज संसद, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळातील महिला सशक्तीकरण समितीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते या परिषदेचं उदघाटन होईल. या दोन दिवसीय परिषदेत राज्यसभेचे उपसभापती, आंध्र प्रदेश विधानपरिषदचे सभापती, विधानसभा अध्यक्ष, संसद आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांमधल्या महिला सशक्तीकरण समित्यांचे अध्यक्ष तसच इतर मान्यवर सहभागी होतील. देशभरातून शंभरहून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

****

भारताच्या जैस्मीन लँबोरियानं ब्रिटनच्या लिव्हरपूल इथं झालेल्या मुष्टियुद्ध विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती असलेल्या जैस्मीननं महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोलंडच्या जूलिया सेरेमेटाला ४-१ ने पराभूत केलं. भारताच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत एकूण तीन पदकं जिंकली. नुपूर श्योराणला ८० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोलंडच्या अगाता काझ्मार्स्का ने ३-२ असे पराभूत केलं. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर पूजा राणीने कांस्य पदक पटकावलं. मात्र, पुरुष खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही.

****

हाँगकाँग ओपन सुपर- बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना चीनच्या ली-शी-फेंगशी होणार आहे. लक्ष्यनं काल उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या चाऊ-तिएन-चेनला २३-२१, २२-२० अशा सरळ गेममध्ये पराभूत केलं. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताची सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग-वेई-केंग आणि वांग-चांग या जोडीविरुद्ध खेळणार आहे.

****

मराठवाड्यात अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे काही धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पैठणचं जयकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे २७ दरवाजे चार फूट उघडून ९४ हजार ३२० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

**

लातूर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तावरजा प्रकल्पाचे १७, मांजरा दोन तर रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे काल रात्री उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

**

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, पाच हजार ९५२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वडवणी तालुक्यातल्या उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातूनही एक हजार ६८२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी कुंडलिका नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

इसापूर धरणाच्या पाच दरवाजातून पाच हजार १०७, तर सिद्धेश्वर धरणातून चार हजार ९४३ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...