Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 21
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१
मे २०१७ दुपारी १ वा
****
ऑनलाईन
मतदान पद्धत व्यवहार्य नसल्याचं, मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात अभ्यासासाठी निवडणूक आयोगानं नेमलेल्या समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालय
तसंच कायदे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला असल्याचं, झैदी यांनी सांगितलं. मतदान प्रक्रिया
सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं सद्यस्थितीत ऑनलाईन मतदान पद्धत व्यवहार्य नसल्याचं,
आयोगाला आढळलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
****
देशात उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण साहित्याच्या उत्पादनाला
चालना देण्याकरता खासगी क्षेत्रासाठी आखण्यात आलेल्या धोरणाच्या रुपरेषेला संरक्षण
साहित्य परिषदेनं मान्यता दिली आहे. संरक्षण मंत्री अरुण जेटली या परिषदेचे अध्यक्ष
आहेत. पात्र भारतीय उद्योगांसाठी दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीचा या धोरणात समावेश आहे, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं
हे धोरण महत्वाचं असून, सुरक्षा क्षेत्रात मेक इन इंडिया धोरणाला यामुळे प्रोत्साहन
मिळणार आहे. संरक्षण साहित्य खरेदी परिषदेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती
देण्यात आली.
****
वैज्ञानिक शोधनिबंध प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध करायला पाहिजे,
असं केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ज्येष्ठ
राजनैतिक ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तकाचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. प्रादेशिक
भाषेतल्या शोधनिबंधामुळे त्यांची लोकप्रियता वाढते, असं ते म्हणाले. प्रादेशिक भाषांमध्ये
लिहीले गेलेले शोधनिबंध अधिक परिपूर्ण होतील, असं ते म्हणाले.
****
छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस बल
- सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात १८ नक्षलवाद्यांना चौकशीसाठी ताब्यात
घेण्यात आलं आहे. या हल्ल्यात २५ जनावांचा मृत्यू झाला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या
नक्षलवाद्यांपैकी काही जणांचा या हल्ल्यात समावेश असल्याचं सुकमा इथले पोलिस महानिरिक्षक
अभिषेक मीणा यांनी सांगितलं.
****
मुस्लीम समाजानं तिहेरी तलाकची प्रथा बंद केली नाही, तर सरकार
ही प्रथा बंद करण्यासाठी कायदा करू शकतं, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या
नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ते बोलत होते. सरकार कोणाच्याही व्यक्तिगत प्रकरणात हस्तक्षेप करत नसून, मुस्लिम महिलांना न्याय देण्याचा
प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
****
वस्तू
आणि सेवा कर विधेयकावर राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज चर्चा होणं अपेक्षित
आहे. विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात काल स्थानिक प्राधिकरण
भरपाई विधेयक विधानसभेनं एकमतानं मंजूर केलं.
****
कोयना धरणातून कर्नाटकसाठी
चार हजार चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग आजपासून सुरू करण्यात आला आहे. सलग १२ दिवस हा
विसर्ग सुरू राहणार आहे, त्यामुळे पाटण, कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातल्या
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मुंबई इथं येत्या ३० मे
रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात मराठवाडयातल्या विविध गावांमध्ये
बैठका घेतल्या जात आहेत.
****
उत्तराखंडात बद्रीनाथ परिसरात दरड कोसळल्यामुळे
अडकलेले मराठवाड्यातले सुमारे अडीचशे यात्रेकरू आज हरिद्वारला सुखरूप पोहचले. औरंगाबाद
इथले यात्रा व्यवस्थापक मंगेश कपोते यांनी ही माहिती दिली. बद्रीनाथ मार्गावर कोसळलेला
मलबा हटवून वाहतूक सुरू झाल्यानं यात्रेकरूंना टप्प्याटप्यानं परतीकडे सोडण्यात येत
असल्याचं कपोते यांनी सांगितलं.
****
मुंबई गोवा अतिजलद तेजस रेल्वे गाडी
अत्याधुनिक सुविधेसह सज्ज असून, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या गाडीमुळे
मुंबई गोवा प्रवास साडे आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. आठवड्यातून पाच दिवस ही रेल्वे
चालणार आहे. या गाडीला रायगड जिल्ह्यात पेण किंवा रोहा इथं थांबा द्यावा,
अशी मागणी या भागातल्या नागरिकांकडून केली जात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे
रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या
मालिकेचा हा ३२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक
आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, तसंच माय जी ओ व्ही
ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment