Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 30
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३०
मे २०१७ सकाळी ६.५०
****
·
विद्यापीठं, तसंच उच्चशिक्षण
संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे - राज्यपालांचं प्रतिपादन
·
मुंबई ते नागपूर समृद्धी
महामार्ग होऊ देणार नाही - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
·
बारावीचा
निकाल आज जाहीर होणार
·
देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा
आज एक दिवसाचा लाक्षणिक संप
आणि
·
येत्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी
पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रबोधन करावं, - सहाव्या संत साहित्य संमेलनात वन मंत्र्यांचं
आवाहन
****
विद्यापीठं, तसंच उच्चशिक्षण क्षेत्रातल्या संस्थांनी सहिष्णुता,
आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण केलं पाहिजे, असं प्रतिपादन, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे. ते काल पुण्यात
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. माजी गृह सचिव डॉ.
माधव गोडबोले यांना राज्यपालांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शास्त्रीय गायक महेश काळे, उद्योजिका लीला पुनावाला, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर,
मरणोत्तर कीर्तीचक्र विजेते सेकंड लेफ्टनंट ऋषी मल्होत्रा, यांनाही फर्ग्युसन अभिमान
पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आत्मक्लेश यात्रेच्या
अनुषंगानं, ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. हा महामार्ग अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी
असल्याचा आरोप करत शेट्टी यांनी, या संदर्भात आज लालबाग ते राजभवन असा मोर्चा काढून
शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन राज्यपालांना सादर करणार असल्याचं सांगितलं. स्वाभिमानी
शेतकरी संघटनेला सरकारच्या उत्तराची अपेक्षा नाही, असं सांगतानाच शेट्टी यांनी, संघटना
कुणा एका व्यक्तीमुळे थांबत नसल्याचं नमूद केलं.
****
विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा सकारात्मक कामात सहभागी व्हावं,
असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल सातारा जिल्ह्यात मलकापूर
इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना पाणी, तसंच वीज वेळेवर देण्यासाठी
राज्यशासन कटिबध्द आहे, सोलर फीडर उभारून शेती पंपासाठी १२ तास वीज दिली जाणार आहे,
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ठिबक, तसंच यांत्रिकीकरणावर भर दिला असून, गट शेतीसाठी
५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रत्येक
प्रश्न सकारात्मकपणे सोडावण्याचा आपला प्रयत्न असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल जळगाव जिल्ह्यातल्या
चोपडा इथं, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सपत्निक
सत्कार करण्यात आला. माणूस भाषणानं नव्हे, तर आचरणानं मोठा होतो, हे अरुणभाई गुजराथी
यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.
माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार या कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते,
एकही आरोप नसलेले नेते म्हणून अरुणभाईंचा नावलौकीक आहे, अभ्यासूवृत्ती आणि नम्र स्वभावामुळे
त्यांनी अनेक ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी
काढले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, यांच्यासह
अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावून गुजराथी यांना शुभेच्छा दिल्या.
****
आरोग्य विभागानं झिका आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह
आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक
सावंत यांनी काल मुंबईत दिली. झिका आजारावर कोणतंही विशिष्ट औषध, अथवा लस उपलब्ध नसली
तरीही, पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, असं सावंत
यांनी सांगितलं. डेंग्यू आजारासारखी याची लक्षणं असून, संशयितांनी तत्काळ रोगनिदान
केंद्राशी संपर्क साधून या रोगावर उपचार घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं.
****
रॅगिंग विरुद्ध तक्रार करण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित करण्यात
आलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीनं तयार करण्यात आलेल्या या ॲपचं, केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत लोकार्पण करण्यात
आलं.पूर्वी विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधात संकेत स्थळावर तक्रार नोंदवता येत असे, आता
या ॲपच्या माध्यमातून भ्रमणध्वनीवरूनही तक्रार करता येईल.
****
राज्य
माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल आज
जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार असल्याचं, मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. डॉट. एम.
ए. एच. रिझल्ट डॉट एन. आय. सी. डॉट आय. एन. या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. परीक्षार्थींना
एस.
एम.
एस.
द्वारे ही निकाल
जाणून घेता येणार आहे. त्यासाठी ५७७६६ या मोबाईल क्रमांकावर
एम. एच. एच. एस. सी. स्पेस आसनक्रमांक असा एस एम एस पाठवावा लागेल.
दरम्यान, आयसीएसई अभ्यासक्रमाच्या दहावी, तसंच बारावी परीक्षेचा
निकाल काल जाहीर झाला. बारावीत ९६ पूर्णांक ४७ शतांश, तर दहावीत ९८ पूर्णांक ५३ शतांश
विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. ई पोर्टलच्या
माध्यमातून औषधांची विक्री करणं, आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात
किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला आहे. राज्य केमिस्ट संघटनेचे ५५
हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होतील, अशी माहिती संघटनेचे सचिव अनिल नावंदर
यांनी दिली आहे.
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनानं हा संप मागे घेण्याचं आवाहन केलं असून, सर्व
शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरेसा साठा असेल याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे.
****
पंढरपूरच्या येत्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात
प्रबोधन करावं, असं आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ते काल लातूर
इथं सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत होते. संत
साहित्य संमेलनं निरंतर सुरु राहावीत यासाठी राज्य सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी
यावेळी दिलं. समाजातला द्वेष कमी करण्यासाठी वारकरी संप्रदायाची मोठी भूमिका असल्याचं
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल
पाटील यांनी, साहित्य संमेलनाला राज्य सरकारानं कायमस्वरुपी पन्नास लाख रुपये दर वर्षी
मदत करण्याची मागणी केली.
****
राज्यातल्या चार कृषी विद्यापीठांनी संशोधन क्षेत्रात समन्वयानं
काम केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असं मत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी
व्यक्त केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन
आणि विकास समितीच्या बैठकीचं उदघाटन
काल फुंडकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी बोलत होते. या चारही विद्यापीठांनी केलेलं
सशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल, असं सांगून, विद्यापीठांनी हवामान बदलाचा विचार करुन पिकांची
नवीन वाणं विकसित करावित, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
सत्तावन्नावा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला आहे. माजी विदेश सचिव निरुपमा
मेनन राव या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरु डॉक्टर
बी.ए.चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात
आयोजित या समारंभात सुमारे १६ हजारावर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येतील.
****
ग्रामीण भागात सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी
विविध घरकुल योजनांमध्ये ‘निर्मल शोषखड्डे’ ही योजना राबवण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.
ग्रामविकास मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा
आढावा घेण्यासाठी, राज्यस्तरीय दक्षता, आणि
सनियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याचा
गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला.
//*******//
No comments:
Post a Comment