Thursday, 25 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यातली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पाणलोटांचा विकास करणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या हलगरा इथं आयोजित श्रमदान कार्यक्रमानंतर ते बोलत होते. पालकमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड यावेळ. उपस्थित होते. राज्यातल्या पाणलोटांचा विकास केला, तर राज्यात कधीही दुष्काळ पडणार नाही असं ते म्हणाले.
हलगरा इथून आज मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संवाद सभा अभियानाची सुरुवात केली. हलगरा हे गाव दत्तक घेण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसंच औराद शहाजानी इथल्या तेरणा नदीवरच्या कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात आलेल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. 
दरम्यान, मुख्यमंत्री निलंग्याहून मुंबईकडे जाताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलीकॉप्टरच्या पंख्यात बिघाड झाल्यामुळे ते पुन्हा खाली कोसळलं. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. आपण सुखरुप असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनीही दूरधवनीवरुन त्यांची चौकशी केली. 

****

आयुष मंत्रालय देशात शाश्वत योग वातावरण तयार करण्यास कटीबद्ध असल्याचं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. २१ जून हा दिवस योगा दिन म्हणून पाळण्यात येतो. हा दिवस यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करणार असल्याचं ते म्हणाले. नागरिकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. योगाच्या प्रचारासाठी योगदान दिलेल्या संस्था आणि व्यक्तींना आयुष मंत्रालय पुरस्कार देऊन गौरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.   

****

दूरसंचार क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्याचं आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिलं आहे. केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. दूरसंचार क्षेत्राशी देशातले सव्वा लाख कोटी नागरिक जोडले गेले असल्याचं ते म्हणाले. या क्षेत्रताल्या गुंतवणुकदारांवर आपला विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.    

****

बिहारमधल्या मुंगेर जिल्हा न्यायालयानं पाच नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता, तर १० जण जखमी झाले होते. या नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.  

****

कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सीमा भागात जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, असं वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या वतीनं बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन केलं होतं. या मोर्चाला पाठिंबा देण्याकरता परिवहन मंत्री दिवाकर रावते बेळगावला जात असताना, कर्नाटक पोलिसांनी त्यांना कोगनोळी पथकर नाक्यावर अडवून त्यांच्यावर तीन दिवसांसाठी जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश बजावला. याठिकाणी शिवसैनिकांनी जय महाराष्ट्रचा नारा दिल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेपासून जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते परकीय गुंतवणुकीच्या शक्यता आजमावण्यावर लक्ष केंद्रीत करतील, असा अंदाज आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांच्या दौऱ्याची माहिती दिली. 
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी २८ मे रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहीन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

पनवेल, भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांमध्ये उद्या मतमोजणी होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. काल याठिकाणी मतदान झालं असून, सरासरी ५५ टक्के मतदान झाल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि औसा नगर परिषदेतल्या प्रभाग क्रमांक -दहा अ मधल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं असून, उद्या मतमोजणी होणार आहे. या सर्व ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

****

No comments: