Friday, 26 May 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.05.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज 'मन की बात - रेडिओवरील एक सामाजिक क्रांती' या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आकाशवाणीवरून दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम श्रृंखलेअंतर्गत प्रसारित भागांचं राजेश जैन यांनी संकलन करून हे पुस्तक साकारलं आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

****

दरम्यान, पंतप्रधान परवा रविवारी, ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज आसाममधल्या ब्रम्हपुत्रा नदीवरच्या ढोला सादिया या देशातल्या सर्वात मोठ्या पुलाचं उद्घाटन होणार आहे. सव्वा नऊ किलोमीटर लांबीचा हा तीन पदरी पुल असून, यामुळे ईशान्येकडील सर्व राज्यांचा संपर्क वाढण्या मदत होणार आहे.

****

पनवेल, भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी परवा झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून, इथं सरासरी ५५ टक्के मतदान झालं होतं.

लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आणि औसा नगर परिषदेतल्या प्रभाग क्रमांक -दहा अ मधल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

//*******//

No comments: