Wednesday, 24 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.05.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

१९९२ साली झालेल्या, अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूच्या पतनासंदर्भातल्या खटल्याची सुनावणी आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एका विशेष न्यायालयात होणार आहे. गेल्या महिन्याच्या एकोणीस तारखेला सर्वोच्च न्यायालयानं विशेष न्यायालयाला या खटल्याची सुनावणी एक महिन्याच्या आत सुरू करून दोन वर्षाच्या आत निर्णय द्यावा, असा आदेश दिला होता.

****

मागच्या वर्षी अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या मतदानाला आज सुरूवात झाली असून यात २० प्रभागातल्या ७८ जागांसाठी ४१८ उमेदवार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘मतदान करतानाचा सेल्फी पाठवा’ अशी स्पर्धा निवडणूक यंत्रणेनं जाहीर केली आहे. भिवंडी महापालिकेच्या तेवीस प्रभागांसाठीही मतदान सुरू झालं आहे. मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी परवा, म्हणजे २६ मे ला होणार आहे.

****

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचे आरोप करणाऱ्या सात राष्ट्रीय आणि एकोणपन्नास राज्यस्तरीय पक्षांना, हे आरोप सिद्ध करून दाखवण्यासाठी निवडणूक आयोगानं आमंत्रित केलं आहे.या प्रत्येक पक्षाला पाच राज्यांमधून आपल्या पसंतीची चार यंत्रं निवडता येतील आणि या यंत्रांना हॅक करून दाखवण्यासाठी त्यांना चार तासांचा वेळ दिला जाईल, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. येत्या तीन जूनला या पक्षांना ही संधी दिली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी, नियंत्रण रेषेपलकडूनची घुसखोरी रोखण्यासाठी सैन्यानं केलेल्या कारवाईची प्रशंसा केली आहे. जम्मूकाश्मीर मध्ये शांतता प्रस्थापत करण्यासाठी अशा कारवाईची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकार या कारवाईचं समर्थन करत असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे. माहती आण प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही या कारवाईबद्दल बोलताना, हा एक उत्तम प्रतबंधात्मक उपाय असल्याचं म्हटलं आहे.

****

अहमदनगर - औरंगाबाद मार्गावर धनगरवाडी फाटा इथं काल रात्री बोलेरो जीप आणि ट्रकमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. हे प्रवासी बुलडाण्यातल्या बाबा सैलानी इथं जात होत. हे प्रवासी पुणे जिल्ह्यातल्या यवतचे रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहराहरानं कळवलं आहे.

****

No comments: