Saturday, 27 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.05.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 MAY 2017

Time - 1.00 to 1.05 pm

Language – Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मे २०१७ दुपारी १ वा

****

जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला आणि उरी क्षेत्राजवळ रामपूर सेक्टरमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. या चकमकीत आतापर्यंत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. आज सकाळी जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावल्यानंतर ही चकमक झाली.

रम्यान, पुलवामा इथल्या त्राल भागात हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. सब्जार भट आणि फैजान भट असं या दोन दहशतवाद्याचं नावं आहे.

****

श्रीलंकेतल्या पूरग्रस्तांना भारतानं आज मदत पाठवली आहे. नौदलाच्या एका जहाजातून ही मदत सामग्री रवाना झाली आहे. श्रीलंकेत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला असून भूस्सखलनाच्या घटनाही घडल्या आहेत. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटात श्रीलंकेला सहकार्य करण्याचा निर्णय घेत आज मदतसामग्री घेऊन एक जहाज रवाना झालं असून दुसर जहाज उद्या जाणार आहे. या संकटाच्या घडीत भारत श्रीलंकन जनतेच्या पाठिशी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात दक्षिणेतल्या केरळ - कर्नाटक राज्याच्या अनेक भागातही काल जोरदार पाऊस झाला. कर्नाटकात पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागात वृक्ष उन्मळून पडल्याचं वृत्त आहे.

****

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आज भारत दौऱ्यावर आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी राजघाट इथल्या महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहीली. आज पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर बैठक होणार असून, यावेळी विविध करार होण्याची शक्यता आहे. 

****

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची आज पुण्यतिथि. यानिमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यासाठी सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात, जवारहलाल नेहरु यांना आदरांजली अर्पण केली आहे.

****

देशातल्या ९१ मोठ्या जलाशयांमधला पाणीसाठा एकूण क्षमतेच्या २२ टक्के राहीला असल्याचं केंद्रीय जल संसाधन मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या आठवडाभरात पाणी पातळीत एक टक्क्यानं घट झाली आहे. नागार्जुन सागर, इंदिरा सागर आणि भाक्रा नांगल धरणात २५ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ३५ अब्ज घनमीटर जलसाठ्याची नोंद झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पाणीपातळी १२७ टक्के आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातला पाणीसाठा समाधानकारक असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

कुपोषणावर मात करण्यात ११८ विकसनशील देशांच्या यादीत भारत सध्या सत्याण्णवाव्या स्थानी असला तरी, लवकरच ही स्थिती बदलेल असा विश्वास, भारत दौऱ्यावर आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्यक महासचिव गेरडा वेरबर्ग यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांनी २०१० मध्ये सुरु केलेल्या पोषक आहार चळवळीत ५९ देश सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड हे राज्य या चळवळीचे सभासद आहेत. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, या कार्यक्रमाचा दुसरा भागही उद्या प्रसारित होणार आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा, नवीन विद्यापीठ कायद्यातल्या सुधारणा तसंच रोजगारांच्या संधी या विषयांवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तरं देणार आहेत. या दिवशी सकाळी साडेदहाला सह्याद्री वाहिनीवर आणि २९ आणि ३० मे या दोन दिवशी सकाळी सात पंचवीस ते सात चाळीस या वेळात आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे.

****

नाशिक शहराजवळच्या दारणा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे. पळसे या गावातली चार मुलं काल नदीत पोहण्यासाठी गेले होते, ते घरी परत न आल्यानं पालकांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

****

No comments: