Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३०
मे २०१७ दुपारी १ वा
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल नुकताच
जाहीर झाला. डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. डॉट. एम. ए. एच. रिझल्ट डॉट एन.
आय. सी. डॉट आय. एन. या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. परीक्षार्थींना एस.
एम.
एस.
द्वारे ही निकाल
जाणून घेता येणार आहे. त्यासाठी पाच सात सात सहा सहा या मोबाईल क्रमांकावर एम. एच. एच.
एस. सी. स्पेस आसन क्रमांक असा एस एम एस पाठवावा लागेल.
दरम्यान, यंदा बारावीचा राज्याचा निकाल ८९ पूर्णांक ५० टक्के
लागला असल्याचं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी आज वार्ताहर परिषदेत
सांगितलं. सर्वात जास्त ९५ पूर्णांक २० टक्के निकाल कोकण विभागाचा, तर सर्वात कमी ८८
पूर्णांक २१ टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा ८९ पूर्णांक
८३ टक्के, नागपूर ८९ पूर्णांक पाच, पुणे ९१ पूर्णांक १६, कोल्हापूर ९१ पूर्णांक ४०,
अमरावती ८९ पूर्णांक १२, तर लातूर आणि नाशिक विभागाचा निकाल ८८ पूर्णांक २२ टक्के इतका
लागला आहे.
****
केरळमध्ये आज पावसाचं आगमन झालं असून, येत्या २४ तासात तामिळनाडूच्या
किनारपट्टीच्या भागातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान,
राज्यातही मान्सून वेगानं दाखल होईल अशी चिन्हं आहेत. येत्या दोन, तीन आणि चार जून
रोजी पावसाची शक्यता असल्याचं कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं.
****
राज्यात ग्रामीण स्वच्छता
अभियानानं मोठी गती घेतली असून, राज्यातले ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. या
जिल्ह्यांचा तसंच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात, जिल्हा स्तरावर प्रथम
आलेल्या ग्रामपंचायतींचा आज मुंबई इथं सत्कार करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पुणे, वर्धा, भंडारा, नागपूर
आणि गोंदीया या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. स्वच्छतेत चांगलं काम केलेल्या जिल्ह्यांचा आणि गावांचा
गौरव व्हावा, तसंच उर्वरीत गावांना त्यातून प्रेरणा मिळावी, या
उद्देशानं या स्वच्छता मेळावा आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं
लोणीकर यांनी सांगितलं.
****
झिका आजाराचा विषाणू भारतात आढळून
आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह
झिका आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, असं
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं आहे.
ते मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते. आरोग्य विभागानं त्यासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या
उपाययोजना केल्या असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्ली इथली राष्ट्रीय
रोगनिदान संस्था आणि पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत झिका आजाराच्या
निदानाची सुविधा मोफत उपलब्ध असून, संशयित रुग्णांनी तात्काळ या ठिकाणाच्या
रोगनिदान केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं. अहमदाबाद इथं झिका
आजाराचे तीन रुग्ण आढळले आहेत.
****
कौशल्य विकासाअंतर्गत येणाऱ्या, सामंजस्य
करारातील अडचणी दूर करण्यासाठी ‘महामैत्री’ नावाचं संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे.
कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ही माहिती दिली. ‘महामैत्री’ संकेत
स्थळावर उद्योग संस्थांना संबंधित अधिकारी वर्गाबरोबर थेट संवाद साधता येईल असं सांगतानाच
निलंगेकर यांनी, उद्योग संस्थांमधलं गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठीही समुपदेशन कार्यक्रम
राबवणार असल्याची माहिती दिली. प्राथमिक स्तरावर नागपूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये
हे समुपदेशन सुरू करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या शिधापत्रिकाधारकांनी
येत्या १५ जूनपर्यंत आपले आधार क्रमांक पुरवठा विभागास सादर करावे, असे निर्देश जिल्हा
पुरवठा विभागानं दिले आहेत. शिधापत्रिकाधारकांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी
आधार क्रमांक सादर करण्याचे निर्देश सरकारनं गेल्या आठ फेब्रुवारीला एका अध्यादेशाद्वारे
दिले होते.
****
पंडित दीनदयाल
उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाच्या पहिल्या टप्प्यात, राज्यभरात बीड सह सहा जिल्ह्यांमध्ये साडे नऊ
लाखावर रुग्णांची मोफत तपासणी, आणि नोंदणी करण्यात आली आहे. या अंतर्गत सुमारे वीस हून अधिक आजारांबाबत तपासणी करण्यात
आली असून, पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन आणि मदत करण्यात येणार आहे.
****
थायलंड ग्रां प्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु
होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी साई प्रणित आज आपापले सामने खेळणार
आहेत.
****
No comments:
Post a Comment