Friday, 26 May 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.05.2017 1.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 MAY 2017

Time - 1.00 to 1.05 pm

Language – Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मे २०१७ दुपारी १ वा

****

ढोला सादिया हा पूल ईशान्येकडील राज्यांच्या विकासाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाममधल्या ब्रम्हपुत्रा नदीवरच्या ढोला सादिया या देशातल्या सर्वात मोठ्या पुलाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या पुलाला आसामचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांचं नाव देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. सव्वा नऊ किलोमीटर लांबीचा हा तीन पदरी पुल असून, यामुळे ईशान्येकडील सर्व राज्यांचा संपर्क वाढण्या मदत होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. हा पुल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांनाच जोडणारा पुल नसून, तो जनतेला जोडणारा असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. 

****

पनवेल, भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी परवा झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. काही ठिकाणचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत ७८ जागांपैकी आतापर्यंत ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भारतीय जनता पक्षानं २८, तर शेकाप-राष्ट्रवादी-कॉग्रेस आघाडीला ११ जागा जिंकता आल्या आहेत.

मालेगाव महापालिका निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं अकरा, जनता दलानं पाच तर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या. काँग्रेस ३०, राष्ट्रवादी काँग्रेस २४, शिवसेना नऊ, भाजप तीन तर एमआयएम अकरा आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

भिवंडी निजामपूर महापालिका निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शिवसेनेनं आठ, तर काँग्रेस, भाजप, कोणार्क विकास आघाडी आणि रिपब्लिकन पक्षानं प्रत्येकी चार जागा जिंकल्या.

****

लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आणि औसा नगर परिषदेतल्या प्रभाग क्रमांक -दहा अ मधल्या पोटनिवडणुकीचीही आज मतमोजणी होत आहे. रेणापूर नगर पंचायतीचे निकाल जाहीर झाले असून, एकूण १७ जागांपैकी भाजपनं आठ, काँग्रेसनं सहा, राष्ट्रवादी काँग्रेसनं एक तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या.

****

मतदान यंत्र - ईव्हीएम मध्ये फेरफार करून दाखवण्याचं निवडणूक आयोगानं दिलेलं आव्हान एकाही पक्षानं स्वीकारलं नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल कॉंग्रेस आदी पक्षांनी मतदान यंत्रात फेरफार करणं शक्य असल्याचं वारंवार म्हटलं होतं. त्यानंतर आयोगाकडून तीन जूनपासून यंत्र हॅक करून दाखवण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. आज हे आव्हान स्विकारण्याची अंतिम मुदत आहे, मात्र अद्याप कोणताही पक्ष समोर आलेला नाही.

****

येत्या एक जूनपासून इयत्ता ११ वी च्या ऑनलाईन प्रवेशाला सुरूवात होणार आहे. २९ मे रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी दिली. 

****

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातल्या सहा जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेत आतापर्यंत सुमारे पाच लाख लोकांनी नोंदणी केली असून त्यांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. वीस हुन अधिक विविध आजारांची तपासणी यामध्ये करण्यात येत आहे. ही मोहीम उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानांतर्गत बीड, नाशिक, पालघर, अकोला, चंद्रपूर आणि सांगली या सहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक मे पासून पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम सुरु झाली आहे, त्यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉपी प्रकरणात संस्थाचालक आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं केली आहे. याप्रकरणी केवळ परीक्षा विभागातल्या कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या, असा आरोप करण्यात आला आहे. याबरोबरच खुलताबादचं कोहीनूर महाविद्यालय आणि वैजापूरच्या पद्मावती बी एड महाविद्यालयातही कॉपीच्या अशा घटना घडल्या असून, विद्यापीठानं याबाबतही काही कारवाई केली नाही, असं संघटनेचं म्हणणं आहे. या मागण्यांचं एक निवेदन कुलगुरु बी ए चोपडे यांना देण्यात आलं.

****

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे नजीक खासगी बस उलटून तीन जण ठार तर अनेक प्रवासी जखमी झाले. आज पहाटे चाडे चार वाजेदरम्यान हा अपघात झाला. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींवर डेरवण इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या सुदीराम चषक बॅडमिंटन स्पर्धेत आज उपान्त्य फेरीत भारताचा सामना चीन विरुद्ध होणार आहे. भारतीय पुरुष संघात के श्रीकांत, तर महिला संघात पी व्ही सिंधू आपापले सामने खेळणार आहेत. तर महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि एन सिक्की रेड्डी, तर पुरुष दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि मनु अत्री खेळणार आहे. 

//*********//

No comments: