Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २४
मे २०१७ दुपारी १ वा
****
लंडनजवळच्या मँचेस्टर इथे
शक्तीशाली बाँबस्फोट करणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोराची ओळख मँचेस्टर पोलिसांनी पटवली
आहे. हा हल्लेखोर मूळ लीबिया देशाचा असून, सलमान अबिदी असं त्याचं नाव असल्याचं स्पष्ट
झालं आहे.माध्यमांमधली वृत्तं आणि काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार हा हल्लेखोर
ब्रिटिश नागरिक आहे. दरम्यान आयसिस या अतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं
वृत्त आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
उत्तराखंड राज्यातल्या उत्तरकाशी इथं बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबद्दल तीव्र
दुःख व्यक्त केलं असून, जखमी लोकांसाठी प्रार्थना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी
दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदतही पंतप्रधानांनी जाहीर
केली आहे.
****
श्रीनगरमध्ये मेजर गोगोई यांच्या विरोधात निदर्शनं केली जात असल्याचं वृत्त
आहे. दगडफेक करणाऱ्या एका युवकाला जीपसमोर बांधून काही सैनिकांच्या रक्षणासाठी गेल्याद्दल
सैन्यानं मेजर गोगोई यांचा नुकताच सन्मान केला असून, हा सन्मान केल्याच्या निषेधार्थ
ही निदर्शनं सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी काल नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय
वस्तू संग्रहालयामध्ये ‘स्वच्छ भारत ॲप’चं उद्घाटन केलं. स्वच्छ भारत अभियानामध्ये
लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी हे ॲप सुरु करण्यात आलं आहे. ऐतिहासिक स्थळी किंवा वस्तूसंग्रहालयात
असणाऱ्या लोकांना या ॲपद्वारे स्वच्छ भारत अभियानाबद्दल संदेश पाठवला जाईल आणि तिथे
अस्वच्छता दिसून आल्यास त्याबद्दल कळवण्याची विनंती केली जाईल. अस्वच्छतेबद्दल कळवल्यानंतर
ही बाबत संबंधित यंत्रणेला कळवली जाईल आणि योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती
या वृत्तात दिली आहे.
****
पनवेल, मालेगाव आणि भिवंडी
महानगरपालिकांसाठीचं मतदान आज सकाळी साडेसातपासून सुरू झालं आहे. पनवेल इथे पहिल्या
दोन तासात, म्हणजे सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दहा टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
यावर्षीच्या एप्रिल आणि मे या महिन्यात राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी
पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य
शासनानं घेतला आहे. यानुसार पिकांचं ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांनुसार संबंधित विमा कंपनीकडून मदत मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांनाही सहभागी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या
रकमेच्या निम्मी रक्कम मिळणार आहे. ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी मिळणार आहे.
****
राज्यातल्या अल्पसंख्यांक बहुल भागात वास्तव्य करणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातल्या
महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं या महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट स्थापल करण्याला
राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे या महिलांना उद्योजकतेविषयी आवश्यक
प्रशिक्षण देऊन त्यांना पतपुरवठा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या
टप्प्यात राज्यातल्या बारा शहरांमध्ये हे बचत गट उभारले जाणार असून त्यामध्ये मराठवाड्यातल्या
नांदेड, परभणी आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे.
****
कर्नाटक राज्यातल्या काही जिल्ह्यासांठी कोयना धरणातून कालपासून पुन्हा पाणी
सोडण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली
असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या निंबा या गावात वनरक्षकाची हत्या करण्यात आल्याचं वृत्त
आहे. रविंद्रसिंग जचपेटे असं या वनरक्षकाचं नाव असून, हत्येचं कारण स्पष्ट न झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शीना बोरा हत्याकांड प्रकरणाची
चौकशी करणारे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची हत्या करण्यात आल्याचं
वृत्त आहे. गणोरे यांचा एकवीस वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याचंही वृत्त आहे. यासंदर्भात
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या हत्येप्रकरणी तपास सुरू
केला आहे.
****
नक्षलवाद्यांना आर्थिक मदत देण्याच्या तयारीत असलेल्या गडचिरोली इथल्या तीन
तेंदू कत्राटदारांकडून पोलिसांनी आणखी एक कोटी एक लाख रुपये जप्त केले आहेत. या तिघांकडून
गेल्या २२ तारखेला ७५ लाख रुपये जप्त केले होते. ही रक्कम त्यांनी बोटलाचेरु गावात
लपवून ठेवली होती.
****
रुग्णांची रक्त मिळवण्यासाठी
होणारी धावपळ लक्षात घेत जालना इथल्या जनकल्याण रक्तपेढीनं कुरियर रक्त सेवा अशी योजना
सुरू केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विविध रक्तघटक एकाच ठिकाणी उपलब्ध करून
देण्यात आले असून,या रक्तपेढीच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षात एक लाखांहून जास्त
रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आल्याची तसंच थॅलेसेमया या रोगानं ग्रस्त असलेल्या त्र्याण्णव
रुग्णांना नि:शुल्क रक्त पुरवण्यात येत असल्याची माहितीही या रक्तपेढीनं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment