Tuesday, 30 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशाचा विकास वेगानं होत असताना आगामी काळात पर्यावरणाचे प्रश्नही गंभीर होत जाणार आहेत, यावर उपाय म्हणून आतापासूनच पर्यावरणपूरक विकास प्रकल्प कटाक्षानं राबवायला हवे, असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबई इथं ‘हरित बंदरे आणि तेलगळती व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
दरम्यान, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट इथं रस्ते, रेल्वे आणि सागरी वाहतूकीला जोडणाऱ्या एकूण एक हजार ११७ कोटी रुपये किमतीच्या आठ विविध प्रकल्पांचा कोनशिला समारंभही गडकरी यांच्या हस्ते आज झाला. पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले. 

****

देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. ई पोर्टलच्या माध्यमातून औषधांची विक्री करणं, आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला आहे. या बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आलं. सातारा, लातूर, उस्मानाबाद, नाशिक इथं जवळजवळ सर्व औषध विक्रेत्यांची दुकानं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक इथं औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

****

राज्याच्या नवीन ऊर्जा संरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापुढे आता केंद्राचा ऊर्जा संवर्धन कायदा २००१ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करणं शक्य होणार आहे. या धोरणामुळे पुढील पाच वर्षात एक हजार मेगावॅट ऊर्जेची बचत होईल. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत ही महिती दिली.

****

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्यातून ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना नऊ जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळणार आहेत. या परिक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरपरिक्षा देता येणार आहे. एक जुनला या परिक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार असून, ११ जुलैला ही परिक्षा होणार आहे. गुण पडताळणीसाठी उद्यापासून तीन जुनपर्यंत अर्ज करता येतील, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
निकालासंदर्भात विद्यार्थी, पालक आणि कनिष्ट महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळानं हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. त्यासाठी येत्या सहा जूनपर्यंत सत्ताविस अठ्ठ्यांशी दहा पंचाहत्तर आणि सत्तावीस एकोणनव्वद सदोतीस छप्पन्न या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

****

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सरकार संवेदनशील असून, शेतकऱ्यांनी येत्या एक जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय मागे घेऊन, चर्चेसाठी पुढे यावं, असं आवाहन कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते बोलत होते.

****

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा आज मुंबईत राजभवनाच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी अडवली. तरीही खसदार शेट्टी राज्यपालांची भेट घेणार असून, मागण्यांचं निवेदन देणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. 
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांकडून जमिनी घेऊ नये, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात, आदी मागण्या या यात्रेदरम्यान करण्यात आल्या.

****

औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सत्तावन्नावा दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. माजी विदेश सचिव निरुपमा मेनन राव या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. कुलगुरु डॉ. बी.ए.चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून, यावेळी सुमारे १६ हजारावर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.

****

जागतिक तंबाखू निषेध दिन उद्या ३१ मे रोजी पाळण्यात येतो. या निमित्त औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रूग्णालयाच्यावतीनं जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या औरंगाबाद रेल्वेस्थानक इथं सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचं महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

राज्यात कोकण, रायगड मुंबई या भागात आज पाऊस झाल्यामुळे तापमानात काही अंशी घट झाली आहे. राज्यात आज सर्वात जास्त ४३ अंश सेल्सिअस तापमान वाशिम इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात आज परभणी आणि नांदेड इथं सरासरी ४० अंश आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद इथं सरासरी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनच वर्तवली आहे. 

****

No comments: